श्री कृष्ण जन्माष्टमी निमित्य संत साहित्यिक डॉ. शोभा माधव गायकवाड यांची विशेष कविता वाचकांसाठी येथे प्रकाशित करत आहोत..
वृंदावनाच्या कुंज-गल्लीत,
मी कृष्णासंगे झुलते l
प्राजक्ताच्या सुगंधासंगे,
मन माझे डोलते ll
फुलांनी सजला झुला सोनेरी,
मनोमनी आनंद गडे l
निळासावळा कान्हा शेजारी,
पाहे हळूच मजकडे ll
मोरपीस त्याच्या माथ्यावर,
हास्य गोड, ओठांवर चढे l
त्याच्या दर्शने भक्तिलीन मी,
हृदयास पडले कोड गडे ll
वारा वाहे मंद मंद,
फुले अंगावर पडती l
यमुनेच्या जळावर जणू,
थांबू पाहे वेळ ती ll
काही नको या क्षणापुढे,
बस इतकेच पुरे आहे l
कृष्ण माझा सखा सोबती,
याहून मोठे काय आहे ll
संसाराचे भान हरपले,
राधेसम मी धन्य झाले l
डोळ्यातून आनंदाश्रु,
ओघळ ओघळ वाहू लागले ll
पवित्र झाले जीवन माझे,
कृष्ण चरणी लीन झाले l
वृंदावन हेच माझे घर,
मन इथेच रमून गेले ll
जन्मो जन्मी मागणे हेच,
कृष्णा तुझी साथ हवी l
तुझ्या झुल्याची ही सावली,
माझ्यावर अशीच नित्य राहावी ll
श्री कृष्ण जन्माष्टमी च्या हार्दिक शुभेच्छा..!
लेखिका –
डॉ. शोभा माधव गायकवाड
संत साहित्यिक व कवी, अमरावती.
Author: डॉ. शोभा माधव गायकवाड
लेखिका या एक उत्कृष्ट शिक्षक, प्राध्यापक, विद्यार्थी मार्गदर्शक, संत साहित्याच्या अभ्यासक, कवी, अभंगकार, समाजप्रबोधनकर्त्या, सामाजिक कार्यकर्त्या म्हणून अमरावती शहरातील प्रतिष्ठित नागरिक आहेत. त्यांनी ग्राहक पंचायत, अंधश्रद्धा निर्मूलन, जेष्ट नागरिक मंडळ अश्या विविध संघटनेच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात योगदान दिले आहे तसेच विविध पुरोगामी संघटनेच्या माध्यमातून त्या सामाजिक क्षेत्रात सुद्धा कार्यरत आहेत. त्यांनी M.A., B.Ed., M.Ed., M.Phil., D.S.M., B.J., SET, Post Graduate In Yoga Therapy, P.hd., ग्रामगिताचार्य अश्या विविध विषयांची उपलब्धी प्राप्त केली आहे. त्यांचे असंख्य पुस्तकांचे वाचन असून स्वतः 30 पुस्तकांचे लिखाण करून प्रकाशित केलेले आहे. 2024 साली एकाच दिवशी 10 पुस्तके प्रकाशित करण्याचा विक्रम सुद्धा त्यांच्या नावे आहे. 2010 साली त्यांच्या अतुलनीय कार्याबद्दल 'उत्कृष्ट शिक्षक' म्हणून राष्ट्रपती च्या हस्ते त्यांना पुरस्कार देण्यात आला आहे. त्याच बरोबर विविध पुरस्कारांच्या सुद्धा त्या मानकरी आहेत. मागील गेल्या दोन वर्षांपासून त्या सा. रयत रक्षक, महाराष्ट्र व रयत रक्षक न्यूज, महाराष्ट्र च्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, ऐतिहासिक अश्या विविध विषयांवर लिखाण करून आपले विचार त्या जनतेपुढे मांडत असतात.





