उत्सवांचा आनंद हरवू नये..!

SHARE:

आपले पूर्वज आजच्या तुलनेत तीक्ष्ण बुद्धिमत्ता ठेवणारे नसतील कदाचित परंतु डोकेबाज होते हे मानले पाहिजे. त्यांनी आजच्या तुलनेत कोणत्याही सुविधा नसताना आणि सभोवती मदतीची साधने नसताना सुद्धा स्वतःसोबत इतरांचे जगणे देखील आनंदी कसे होईल याचा विचार करून जगण्याच्या उत्तम आणि कालजयी रचना करून ठेवल्या आहेत. आज आपण जे काही सण, उत्सव, प्रथा, परंपरा पाळतो ना हे सगळे त्यांच्याच डोक्यातून आले आहे. कल्पना करा की घरात वीज नाही, त्यामुळे मनोरंजनाची साधने नाहीत, आरामाच्या, चैनीच्या वस्तू नाहीत, इंटरनेट नावाचा सोबती नाही. वेळ कसा जातो हे बघण्यासाठी कुणाच्या मनगटावर घड्याळ पण नाही तरीही प्रत्येकाचे जगणे सुंदर, निरोगी अन निकोप आहे. भरपूर अंगमेहनत, शेतीत राबणे, मित्र, नातेवाईक, कुटुंब यांच्यासोबत वेळ घालवणे आणि मैदानी खेळांचा मनसोक्त वापर करणे हा दिनक्रम सुरु आहे. दसरा, दिवाळी, राखीपौर्णिमापोळा, भाऊबीज इत्यादी सणांच्या काळात शेती, कामधंदा बंद त्यामुळे पूर्णवेळ उत्सवाला देताना त्यांच्या डोक्यातून कसल्या भन्नाट कल्पना बाहेर पडल्या असतील ?

सणाच्या दिवशी घरे किंवा गाव सजवताना आताच्या पताका, झिलेटीन किंवा फ्लेक्स नव्हते परंतु निसर्ग या कामात येत होत. फुलापानांची तोरणे, आंब्याच्या पानाच्या पताका, नारळ, केळीच्या बुंध्यांची सजावट आणि त्याला अस्सल गावरानी वाद्यांची, भजनाची साथ, सोबतीला, सांघिक खेळ, गाणी, मस्ती, स्पर्धा आणि गोडधोड मेजवानी यातच दिवस मावळतीला आला की सणांचा आनंद शरीरभर सामावत लोक आपापल्या घरट्यात विसावून जात होते. एक निर्भेळ, निर्लेप सुख, वातावरण प्रसन्न कारण कसलेही प्रदूषण नाही, रंग, आवाज, पाणी, स्पर्श हे सगळे एकदम अस्सल, अगदी ओरिजनल होते. म्हणूनच सण किंवा कोणत्याही उत्सवांची मजाच निऱ्हाळी होती, प्रत्येकाला असा निर्भेळ आनंद हवाहवासा होता. शेती, माती, उत्पन्न, हिरवा चारा, गुरेढोरे, प्रासंगिक पिके, भाजीपाला, फळे, वेली, पाने फुले, चिंच, आंबे, बोरे, आवळा, फणस, पेरू या शेतमालाला पंचपक्वानाचा दर्जा होता. म्हणूनच आपल्या कोणत्याही सणात, पूजेत त्यांना मानाचे स्थान आले आहे. आनंद घेण्याच्या पद्धती आणि भूक मर्यादित होती, आनंदात इतरांना सामावून घेण्याचा कल होता, त्यासाठी कुणाला किंचितही त्रास होऊ नये याची काळजी घेतली जात होती.

आता थेट एकविसाव्या शकतात डोकावून बघा, सभोवताल आनंदाच्या नावाखाली काय चालले आहे ? आपण उत्सव कसे त्रासदायक करून ठेवले आहेत. मस्त एकमेकांच्या जिद्दीवर आपले खिसे खाली होत आहेत. जीवघेणी स्पर्धा हिंदू, मुस्लिम, बौद्ध या सगळ्यांनीच लावून टाकली आहे. अलीकडे आपले उत्सव, सण दोनपाच लाखाच्या वर्गणीशिवाय होत नाहीत. कानठळ्या बसवणारा आवाज, डीजेच्या प्रगत मशिनरी आणि डोळे दिपवणारी लायटिंग नसली की उत्सव झाल्यासारखा फील येईनासा झाला आहे. गणपतीचे दहा दिवस,दुर्गादेवीचे नऊ दिवस आणि वर्षभर प्रासंगिक निघणाऱ्या यात्रा, मेळे, पालख्या, मिरवणुका यांच्यात होणारा दणदणाट मुळे आजारी आणि म्हाताऱ्या लोकांना संकट वाटायला का लागली आहेत त्याची कारणे या दिखाऊपणात दडलेली आहेत. परवा पैगंबर यांच्या जयंतीला पुण्यात निघालेल्या एका मिरवणुकीची चित्रफीत सोशल मीडियावर फिरत होती, त्यात वाहनावर लावलेल्या डीजेवर चावट गाणी आणि तरुण मुलांचे अश्लील हावभाव बघितल्यावर मलाच माझी लाज वाटली. हे आचरट धंदे, असले घाणेरडे वर्तन अलीकडे कुण्या एका जात, धर्माचे उरले नाही सगळेच आपापल्या उत्सवात तसे करायला लागले आहेत.

उत्सवांचे ओंगळवाणे स्वरूप एका बाजूला होत असताना अनेक शहरात आदर्श घ्यावा असेही उपक्रम होत असतात मात्र या दिखाऊ ओझ्याखाली असे सुंदर, रचनात्मक उपक्रम दाबून जात आहेत. गावोगाव असणारी भजन मंडळी आपली पारंपरिक वाद्ये बाजूला ठेवत आता ढोल, ताशा पथके नव्याने निर्माण करत आहेत. कारण ढोलाच्या भजनाची मागणी कमी होत आहे, आयोजकांना कानठळ्या बसवणारा दणदणाट हवा आहे. आसमंत दणाणून सोडणारा आवाज कुणाचा ? म्हटल्यावर अमुक मंडळाचा हीच नवी ओळख तयार होऊ पाहत आहे. कारण नसताना डोळ्यांवर थेट पडणारी किरणे, प्रकाशझोत, पाडणाऱ्या महागड्या यंत्रणा आपल्या रथावर हव्यात याचा आग्रह होत आहे. त्याला विरोध करणारे समजदार लोक मंडळाच्या बाहेर फेकली जात आहेत. म्हणूनच उत्सवांचा काळ संपल्यावर रुग्णालयाकडे वळणारी पावले वाढायला लागी आहेत. कुण्यातरी सामाजिक संस्थेने एखादा सर्व्हे करायला हरकत नाही की उत्सव संपल्यावर मंडळाच्या कार्यकत्यांना नेमके कोणते आजार व्हायला लागतात ? यालाही सगळ्याच धर्माचे संदर्भ आहेत.

परवा अकोल्यात गांधी मार्गावर निघालेल्या ईद उल मिलादुनबी मिरवणुकीत मुस्लिमांचा उत्साह भरपूर असला तरी वाहनांवर असणारा डीजेचा दणदणाट चिंताजनक होता, अश्यावेळी आवाजाचे डेसिबल मोजणारे पोलीस कुठे गायब असतात हे काळात नाही. डेसिबल सगळ्याच धर्माच्या मिरवणुकांचे मोजायला हवेत, असे सिलेक्टिव्ह होणे एकूणच शहराच्या प्रकृतीला शोभणारे नसते. सगळ्याच जाती, धर्मात माणसे सफर होत असतात, त्यांचे निकामी होणारे अवयव महत्वाचे आहेत, त्यावर जाती, धर्माचे शिक्के मारता येणार नाहीत याचे भान आपण सगळ्यांनीच ठेवायला हवे. आपले उत्सव हिडीस हवेत की मनाला भरभरून आनंद देणारे हवेत ? याचा विचार करण्याची वेळ नक्कीच आली आहे. अर्थात या विषयात सुद्धा हिंदू-मुस्लिम करणारा एक मोठा वर्ग आपल्याच सभोवती तयार झाला आहे. तुम्हाला आमच्याच उत्सवात आवाज मोठे दिसतात का ? आमच्याच दिवाळीत प्रदूषण होते का ? ते फोडतात तेव्हा प्रदूषण कुठे जाते ? त्यांची बकरे कटाई दिसत नाही का ? अश्या ढाली सतत पुढे केल्या जातात.

मुळात प्रश्न आता कोणत्या एका जाती, धर्माचा राहिलाच नाही, आपण त्याच्या पलीकडे गेलो आहोत. आपण जे काही करीत आहोत त्याचे दूरगामी परिणाम होताना निसर्ग हिंदू, मुस्लिम, इसाई व बौद्ध असा भेदभाव करणार नाही, त्याचा रट्टा मानवावर असेल याचा विसर पडू देऊ नका, वीज, पाणी किंवा नैसर्गिक स्त्रोतांचा जेवढा अनावश्यक वापर आपण करू तेवढी त्याची भयावह परतफेड निसर्ग विनाशाच्या रूपाने करणार आहे याची जाणीव ठेवून आपण सण, उत्सवांचे नियोजन केले पाहिजे अन्यथा दिवस कठीण आहेत. क्षणिक मौजमजा आपल्या असंख्य पिढयांना अपंग बनवणार आहे, आपण त्यांच्यासाठी उत्तम निसर्ग ठेवणार नसू तर किमान रोगट वातावरण तरी त्यांना देऊ नका असे म्हणण्याची हीच वेळ आहे.

 

लेखक –
पुरूषोत्तम आवारे पाटील
लेखक, पत्रकार तथा वक्ता,
अकोला.
संपर्क – ९८९२१६२२४८
(संकलन – विवेक गं. राऊत)

विवेक गंगाधरराव राऊत
Author: विवेक गंगाधरराव राऊत

मुख्य संपादक सा. रयत रक्षक, महाराष्ट्र. रयत रक्षक न्यूज, महाराष्ट्र.

Leave a Comment