श्रावण आला की निसर्गाला जणू स्वतःचीच नव्याने ओळख होते. कालपर्यंत उन्हाने रखरखलेली माती पावसाच्या पहिल्याच सरीने गंधाळून जाते. झाडांच्या फांद्यांवर नवी पालवी डोलू लागते. आभाळ भरून येते आणि मनही… नकळत कुठल्याशा जुन्या आठवणीने भरून येते.
श्रावणात काहीतरी वेगळेच असते.
पाऊस बाहेर पडतो आणि आत कुठेतरी आठवणी बरसू लागतात.
अशाच या श्रावणात कृष्णजन्माष्टमी येते.
मध्यरात्री कृष्णाचा जन्म झाला, असे आपण म्हणतो. पण मला नेहमी वाटते—कृष्णाचा जन्म फक्त देवकीच्या उदरातून झाला नसावा; तो प्रत्येकाच्या आयुष्यात एखाद्या गडद क्षणी पुन्हा पुन्हा जन्म घेत असावा.
कधी आशेच्या रूपाने…
कधी धैर्याच्या रूपाने…
कधी एखाद्या माणसाच्या निरपेक्ष हाताच्या रूपाने…
आपले आयुष्यही किती ऋतूंमधून जात असते!
बालपणाचा ऋतू तर अगदी वसंतासारखा. सगळेच नवीन, सगळेच सुंदर. पावसात भिजताना आईची हाक, अंगणात साचलेल्या पाण्यात कागदी होड्या सोडताना मिळणारा आनंद, उन्हाळ्याच्या सुट्टीत आंब्याच्या झाडाखाली घालवलेले दुपारचे क्षण… त्या काळाला उद्याची चिंता नसते आणि कालच्या दुःखाची सावलीही नसते.
मग तारुण्य येते, उन्हाळ्यासारखे.
स्वप्नांचा सूर्य डोक्यावर तळपत असतो. काहीतरी मिळवायचे असते, स्वतःला सिद्ध करायचे असते. या उन्हात पाय भाजतात, कधी मनही. काही माणसे सावली देतात, काही सावली काढून घेतात. काही स्वप्ने फुलतात, काही उन्हातच करपतात, पण माणूस जगत राहतो. कारण पुढे कुठेतरी श्रावण येणार असतो.
आयुष्याचा श्रावण म्हणजे कदाचित अशी वेळ, जेव्हा आपण बाहेरच्या जगापेक्षा स्वतःच्या मनाकडे अधिक पाहू लागतो. पूर्वी ज्यांच्याकडून अपेक्षा होत्या, त्यांच्याकडून आता फक्त आपलेपणा हवा असतो. पूर्वी जिंकण्याची धडपड असते; नंतर मन जपण्याची गरज जाणवते.
तेव्हा कळते, जीवन म्हणजे केवळ मिळवणे नाही; काही गोष्टी अलगद सोडून देणेही असते.
कृष्णाच्या जीवनाकडे पाहिले की हेच जाणवते. त्याच्या वाट्याला जन्मापासूनच संकटे आली. जन्म कारागृहात, बालपण गोकुळात, तरुणपण संघर्षात आणि पुढे महाभारतासारख्या विराट प्रसंगाची जबाबदारी. तरीही त्याच्या ओठांवर मुरली होती.
किती विलक्षण आहे ना!
ज्याच्या आयुष्यात इतका संघर्ष होता, त्याने हातात शस्त्रापेक्षा आधी मुरली धरली. कदाचित जीवनाला तो सांगत असावा,
संकट कितीही मोठे असले तरी मनातील माधुर्य मरू देऊ नका.
मुरलीला स्वतःचा सूर नसतो. ती आतून पोकळ असते म्हणून कृष्णाच्या ओठांवर गेल्यावर तिच्यातून संगीत जन्मते.
माणसाचेही तसेच असावे का?
मनातले ‘मी’ थोडे रिकामे केले, अहंकार बाजूला ठेवला, तरच आयुष्याच्या ओठांवरून एखादा सुंदर सूर उमटत असेल.
कृष्णाच्या डोक्यावरचे मोरपीस पाहताना हेही वाटते, जीवनाला कितीही रंग लाभले तरी त्यांचा माज नसावा. रंग असावेत, पण उधळपट्टी नसावी. सौंदर्य असावे, पण अहंकार नसावा आणि कदाचित म्हणूनच कृष्ण आपल्याला देवापेक्षा अधिक ‘जवळचा’ वाटतो.
तो हसतो. खेळतो. प्रेम करतो. मैत्री करतो खोड्या काढतो. विरह सहन करतो. युद्धाच्या रणांगणात उभा राहतो. आणि तरीही जीवनापासून दूर जात नाही.
आपल्याला मात्र एखादा ऋतू मनासारखा नसला की आपण संपूर्ण आयुष्यालाच दोष देतो.
पाऊस जास्त झाला की तक्रार.
उन्हे वाढली की तक्रार.
थंडी पडली तरी तक्रार.
ऋतू बदलत नाहीत म्हणून नव्हे, तर आपली अपेक्षा बदलत नाही म्हणून दुःख वाढते.
निसर्गाला ऋतू बदलण्याची घाई नसते. त्याला ठाऊक असते, पानगळीनंतर पालवी येणारच. माणसानेही हे शिकायला हवे. काही नाती पानांसारखी गळतात. काही आठवणी मातीमध्ये मिसळतात. काही स्वप्ने अपूर्ण राहतात. काही वाटा अचानक संपतात. पण म्हणून जीवन संपत नाही.
नव्या पालवीसाठी जुन्या पानांना गळावेच लागते.
कृष्णजन्माष्टमीच्या रात्री घराघरांत पाळणा सजेल. चिमुकल्या पावलांचे ठसे उमटतील. ‘नंदाच्या घरी आनंद झाला’ या भावनेने वातावरण भरून जाईल. पण त्या पाळण्यात आपण आपला कृष्ण ठेवताना एकदा स्वतःच्या मनातही डोकावू या.
तिथे अजून किती अंधार आहे?
किती न बोललेली दुःखे आहेत?
किती जुन्या अपेक्षा आहेत?
किती न भरलेल्या जखमा आहेत?
त्या अंधारात एक छोटासा दिवा लावू या. कुणाला माफ करण्याचा…
कुणाला नव्याने स्वीकारण्याचा…
किंवा कदाचित स्वतःलाच पुन्हा एकदा प्रेमाने कवटाळण्याचा.
बाहेर श्रावण बरसत राहील.
मातीचा गंध दरवळत राहील.
कुठेतरी मंदिरात मध्यरात्री घंटा वाजेल आणि कृष्णाचा जन्म होईल. पण त्या क्षणी जर आपल्या मनातही एखादी नवी आशा जन्माला आली, एखादे जुने दुःख विरघळले, एखाद्या नात्याला पुन्हा हिरवी पालवी फुटली,तर समजावे,
कृष्ण फक्त गोकुळात जन्मलेला नाही…
तो आपल्या मनातही जन्मला आहे. कारण ऋतू बाहेर बदलत राहतात; पण मनातला ऋतू बदलला, की संपूर्ण आयुष्यच नव्याने फुलते.
लेखिका –
ॲड. नीता प्रफुल्ल कचवे
अधिवक्ता, साहित्यिक, समुपदेशक, प्रकाशक
संस्थापक – बांधिलकी प्रतिष्ठान तसेच बांधिलकी बहुउद्देशिय ट्रस्ट, अमरावती.
संपर्क – ८८०५२५८०१६
Author: ॲड. नीता प्रफुल कचवे
लेखिका माजी जिल्हा परिषद शिक्षिका (स्वेच्छा निवृत्त) असून एक उत्कृष्ट साहित्यिक अधिवक्ता, समुपदेशक व वक्ता म्हणून कार्यरत आहेत. बांधिलकी प्रतिष्ठान व बांधिलकी बहुउद्देशीय ट्रस्ट अमरावती च्या संस्थापक अध्यक्षा म्हणून सामाजिक क्षेत्रात कार्य करतात. समाजात वाचनालय, बालसंस्कार केंद्र, महिला व युवतींसाठी विविध उपक्रमे, वृक्षारोपण, प्लास्टिक निर्मूलन कार्यशाळा, शाळा व कॉलेज मधे विविध विषयांवर व्याख्यान हे त्यांचे प्रमुख कार्य आहेत. बांधिलकी प्रतिष्ठान, अखिल भारतीय मराठा महासंघ, मराठी साहित्य मंडळ, भाऊसाहेब उपाख्य पंजाबराव देशमुख शिक्षक परिषद, अखिल भारतीय कुर्मी मराठा समाज संघटना, अखिल भारतीय ग्राहक पंचायत, अखिल भारतीय ग्राहक कल्याण परिषद अश्या विविध संघटनेच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात अग्रेसर आहेत. साहित्य क्षेत्रात त्यांनी ३० पुस्तकांचे प्रस्तावना लेखन केलेले आहे. तीन पुस्तकांचे संपादन केलेले आहे. कथा, कविता व लेखन सारख्या विषयांवर कार्यशाळा घेणे, राज्यस्तरीय साहित्य संमेलनाचे आयोजन केलेले आहे. त्यांनी स्वतः १० पुस्तकांचे प्रकाशन केले असून ५ पुस्तके प्रकाशनाच्या वाटेवर आहेत. राज्यस्तरीय साहित्य सेवा गौरव पुरस्कार २०२५, राष्ट्रीय नारिशक्ती पुरस्कार २०२६ दिल्ली, शब्दवेल नारिशक्ती सन्मान २०२६, खरी कारभारीण नारिशक्ती पुरस्कार २०२६, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले काव्यप्रतिभा पुरस्कार २०२६ च्या त्या मानकरी ठरल्या आहेत. समाज जागृती हा त्यांचा आवडीचा छंद राहिला असून, सा. रयत रक्षक व रयत रक्षक न्यूज, महाराष्ट्र च्या माध्यमातून आपले विचार ते नेहमी वाचकांसाठी मांडत असतात.





