नवी दिल्ली – एकीकडे मोदी सरकारचा दावा आहे कि देशातील गरीबी कमी झाली आहे, लोकांचे उत्पन्न वाढले आहे, तर दुसरीकडे लोक आर्थिक संकटांमुळे स्वतःच्या मुलांना विकण्यास मजबूर आहेत. असाच एक प्रकार आंध्र प्रदेशातील अन्नमैया जिल्ह्यातून समोर आला आहे. जेथे आर्थिक अडचणीमुळे एका आईने स्वतःच्या अल्पवयीन मुलीला २ लाख रुपयांना विकावे लागले. ही घटना पुंगनूर बीडी कॉलनीतील असून घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
पुंगनूर बीडी कॉलनीमध्ये रामराजू आणि शोभा चार मुलांसह राहत होते. कुटुंब पूर्वी सामान्य जीवन जगत होते, परंतु जोडप्यातील सततच्या वादांमुळे परिस्थिती बिघडत गेली आणि शोभाने दोन महिन्यांपूर्वी, मुलींसह घर सोडून पुंगनूरच्या टिडको परिसरात वेगळी राहू लागली.
या दरम्यान शोभाला गंभीर आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत होता. या काळात, ती रेड्डीप्पा नावाच्या मध्यस्थांच्या संपर्कात आली. रेड्डाप्पाने तिला सांगितले की कर्नाटक राज्यातील रायलापाडू भागातील रेड्डी राजशेखर हा त्याच्या दुसऱ्या लग्नासाठी मुलगी शोधत आहे. शोभाला आमिष दाखवण्यात आले आणि तिने तिच्या एका मुलीचे लग्न लावल्यास तिला २ लाख रुपये देण्याचे आश्वासन दिले. यानंतर शोभाने मुलीला विकण्याचा निर्णय घेतला. योजनेनुसार, शोभाने भेटायचे आहे, असे सांगून आपल्या मोठ्या मुलीला घरी बोलावले.
त्यानंतर, शोभाचे आपल्या १४ वर्षाच्या मुलीचे लग्न राजशेखरशी लावले. करारानुसार, शोभाला २ लाख रुपयांपैकी सुरुवातीला ५० हजार रुपये देण्यात आले. दरम्यान, राजशेखर मुलीला बेंगळुरूला घेऊन गेला. मात्र, तिथे आल्यानंतर राजशेखर दररोज मुलीचा छळ करत असे. या छळाला कंटाळून मुलीने आपल्या मोठ्या भावाला फोन केला आणि भावाच्या मदतीने ती बेंगळुरूहून पळून गेली. पुंगनूरला पोहोचल्यानंतर मुलीने थेट पोलिसांत तक्रार दाखल केली.
यानंतर, पुंगनूर पोलिसांनी ही घटना कर्नाटकात घडली आहे असे गृहीत धरून गुन्हा दाखल करण्याऐवजी मुलीला राज्याच्या समाज कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांकडे सोपवले. मुलीची चौकशी केल्यानंतर सत्य बाहेर आले. चौकशीदरम्यान, मुलीची आई शोभा हिला विचारपूस केली असता तिने सुरुवातीला पैसे घेण्यास नकार दिला, परंतु शेवटी तिने कबूल केले. अधिकाऱ्यांनी सल्ला दिला की मुलगी शिक्षण घेऊ इच्छिते. तिला शिक्षण घेण्यासाठी मदत करावी.




