नवी दिल्ली – सध्या भारत- अमेरिका व्यापार कराराचा देशभरात विरोध होत आहे. या दरम्यान एक खळबळजन माहिती समोर आली आहे. ती म्हणजे अमेरिकेने १९७१ च्या भारत- पाकिस्तान युद्धात चीनला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले होते. अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी आश्वासन दिले होते की जर चीनने पाकिस्तानशी संघर्ष करणाऱ्या भारतावर हल्ला केला तर वॉशिंग्टन चीनला पूर्ण पाठिंबा देईल. हा खुलासा रिचर्ड निक्सन यांच्या शपथेच्या साक्षी असलेल्या कागदपत्रांमधून झाला आहे. वॉटरगेट ग्रँड ज्युरी रेकॉर्डमध्ये गेल्या पाच दशकांपासून ही कागदपत्रे सीलबंद करण्यात आली होती.
न्यूयॉर्क टाइम्सच्या रिपोर्टनुसार, अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष रिचड निक्सन यांनी आपल्या ग्रँड ज्युरी साक्षीत म्हटले आहे की रशिया भारताला पाठिंबा देत होता. शस्त्रास्त्र बंदी असल्याने पाकिस्तानला कोणताही पाठिंबा मिळत नव्हता. पण आम्ही नैतिक पाठिंबा देत होतो आणि आम्ही चिनला खाजगीरित्या आश्वासन दिले होते की जर भारताने पाकिस्तानवर हल्ला केला आणि चीनने भारतावर कारवाई करण्याचा निर्णय घेतला तर आम्ही त्यांना पाठिंबा देऊ. निक्सन यांनी स्पष्ट केले की हा त्यांचा वैयक्तिक निर्णय होता, हेन्री किसिंजरचा नाही.
निक्सन यांनी किसिंजर यांना भारतावर दबाव आणण्यासाठी चीनला भारतीय सीमेवर लष्करी हालचाली वाढवण्यास प्रोत्साहित करण्याचे निर्देश दिले. मात्र चीनने लष्करी हस्तक्षेप केला नाही. युद्ध १३ दिवसांत संपले, ढाक्यामध्ये पाकिस्तानने शरणागती पत्करली आणि बांगलादेशचा जन्म झाला.
ऑगस्ट १९७१ मध्ये, भारताने सोव्हिएत युनियनशी करार केला, ज्यामुळे निक्सनने भारताला सोव्हिएत समर्थित मानले.
पाकिस्तान अमेरिकेसाठी महत्त्वाचा होता कारण त्यामुळे चीनशी संबंध सुधारण्याचा मार्ग मोकळा झाला (निक्सनची १९७२ ची चीन भेट). भारताच्या निर्णायक हल्ल्यादरम्यान, अमेरिकेने बंगालच्या उपसागरात नौदल टास्क फोर्स पाठवली आणि पाकिस्तानला नैतिक पाठिंबा दिला. निक्सनने युद्धाला शीतयुद्धाच्या दृष्टिकोनातून पाहिले आणि पाकिस्तानचे रक्षण करण्यासाठी चीनला उसकवण्याचा प्रयत्न केला.
या साक्षीमुळे शीतयुद्धादरम्यान अमेरिकेची आकस्मिक योजना उघड होईल आणि त्याचे गंभीर राजनैतिक आणि लष्करी परिणाम होऊ शकतात अशी चिंता होती. त्यातून असे दिसून आले की चालू युद्धादरम्यान भारताविरुद्ध चीनच्या लष्करी कारवाईच्या शक्यतेचा अमेरिकेने शांतपणे विचार केला होता.
निक्सनने स्वतः अभियोक्त्यांना या प्रकरणात अधिक खोलवर न जाण्याचा सल्ला दिला होता, त्यांनी ‘अडचणीचा बॉक्स उघडू नका’, असा इशारा दिला होता. निक्सनने आपल्या साक्षीत म्हटले होते की या भूमिकेसाठी अमेरिकेला पाकिस्तानची मोठी जबाबदारी वाटत होती. त्यांनी १९७१ च्या युद्धाला शीतयुद्धातील प्रतिस्पर्ध्याच्या दृष्टिकोनातून पाहिले.




