नवी दिल्ली – जेफरी एपस्टीन प्रकरणाशी संबंधित कथित ‘एपस्टीन फाइल्स‘ वरून शुक्रवारी संसदेच्या दोन्ही सभागृहात जोरदार गदारोळ पाहायला मिळाला. विरोधी पक्षांनी या मुद्द्यावरून केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली. या गदारोळामुळे लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांचे कामकाज ९ मार्चपर्यंत स्थगित करण्यात आले असून, यासोबतच अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. आता होळीनंतर १० मार्चपासून संसदेचे कामकाज पुन्हा सुरू होईल.
लोकसभेत विरोधकांची घोषणाबाजी –
शुक्रवारी सकाळी ११ वाजता लोकसभेचे कामकाज सुरू होताच विरोधी पक्षाच्या सदस्यांनी ‘एपस्टीन फाइल्स’ चा मुद्दा उपस्थित करत घोषणाबाजी सुरू केली. केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी आणि जेफरी एपस्टीन यांच्यात कथित संभाषण झाल्याचा दावा करत काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. सभागृहाचे कामकाज सुरू होण्यापूर्वी विरोधकांनी संसद परिसराबाहेरही निदर्शने केली होती. दरम्यान, हरदीप सिंह पुरी यांनी विरोधकांचे हे सर्व दावे पूर्णपणे फेटाळून लावले आहेत.
कोडीन सिरप मृत्यू प्रकरणावरून खडाजंगी –
गदारोळादरम्यान काँग्रेस खासदार उज्ज्वल रमन सिंह यांनी ‘कोडीन सिरप’ च्या सेवनामुळे झालेल्या कथित मृत्यूंचा मुद्दा उपस्थित केला. उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत द्यावी आणि या प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली.
या प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी. नड्डा म्हणाले की, “कोडीन सिरपमुळे कोणताही मृत्यू झालेला नाही, त्यामुळे नुकसान भरपाई देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.”
१० मार्चला पुन्हा रणकंदन?
गदारोळ थांबत नसल्याचे पाहून पीठासीन अधिकारी संध्या राय यांनी लोकसभेचे कामकाज ९ मार्चपर्यंत स्थगित केले. तत्पूर्वी, काही मंत्र्यांनी आपल्या मंत्रालयाशी संबंधित महत्त्वाची कागदपत्रे सभागृहासमोर ठेवली. राज्यसभेचे कामकाजही शुक्रवारी ९ मार्चपर्यंत स्थगित करण्यात आले. आता १० मार्चला जेव्हा दोन्ही सभागृहे पुन्हा भरतील, तेव्हा एपस्टीन प्रकरणावरून विरोधक पुन्हा सरकारला घेरण्याची शक्यता आहे.




