नवी दिल्ली – राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातावरून शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार सातत्याने शंका उपस्थित करत आहेत. आता रोहित पवार यांनी विमान कंपनीवर मोठा आरोप केला आहे. ते म्हणाले की व्हीएसआर कंपनीला एका बड्या नेत्याचा पाठिंबा आहे. त्यामुळे त्यांच्याकडून कंपनीला वाचवले जात आहे. त्यामुळे नागरी उड्डाण मंत्री राम मोहन नायडू यांचा राजीनामा घेतला पाहिजे. अशी मागणीही रोहित पवार यांनी केली. ते शनिवारी शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
यावेळी ते म्हणाले की आमच्या कार्यकर्त्यांनी सीसीटीव्ही फुटेज मागितले. पण त्याला सीसीटीव्ही फुटेज देण्यात आले नाही. आम्ही माहिती मागितली की आम्हाला भाजपवाले सोशल मीडियावर ट्रोल करत आहेत. अजितदादांच्या अपघातानंतर लोकांच्या मनात अनेक शंका आहेत त्याचे निरसन झाले पाहिजे, असे रोहित पवार म्हणाले.
पुढे रोहित पवार म्हणाले कि व्हीएसआर कंपनीच्या मागे मोठे लोक आहेत. त्यांच्याकडून कंपनीला वाचवले जात आहे. व्हीएसआर कंपनीला एका बड्या नेत्याचा पाठिंबा आहे. त्यामुळे नागरी उड्डाण मंत्री राम मोहन नायडू यांचा राजीनामा घेतला पाहिजे. याप्रकरणी आता आम्ही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे चौकशीची मागणी करणार आहोत.
पत्रकार परिषदेत आमदार रोहित पवार म्हणाले की सत्तेचा वापर करून चौकशी करा ना, द्या ना प्राथमिक रिपोर्ट. आम्ही सत्तेत नसताना पुरावे देत आहोत. चौकशी का करत नाही याचे कारण सांगा. रिपोर्ट तयार केला जातोय. व्हीएसआर कंपनीला वाचवले जात आहे, असे आमचे मत आहे, असा आरोप त्यांनी केला.
ते म्हणाले कि व्हीएसआर कंपनीवर कारवाई का होत नाही? या कंपनीचे मालक व्हिके सिंग आहेत, त्यांचा मुलगा रोहित सिंग याचे दीड- दोन वर्षांपूर्वी जयपूरमध्ये लग्न झाले, तिथे कोण कोण गेले होते? तर, सत्तेतील काही लोकं, महाराष्ट्रातील माजी मंत्री, आंध्रप्रदेशच्या टीडीपी या पक्षाचे प्रमुख नेते गेले होते.
व्हीएसआरच्या मालकाच्या मुलाच्या लग्नाला जाता, आज जेव्हा व्हीएसआरवर अपघातप्रकरणी कारवाई करायची असते तेव्हा टीडीपीचे नेते म्हणतात की चूक नाही. घात किंवा अपघात झाल्यापासून आतापर्यंत राज्याचे मंत्री व्हीएसआरने प्रवास करत आहेत. इतर राज्यांचे मंत्रीही प्रवास करत आहेत. सत्तेतील लोक व्हीएसआरच्या मालकाशी निगडीत आहेत. हैद्राबादचा बडा नेताही व्हीएसआरच्या मालकाशी निगडीत आहेत, असा दावा रोहित पवार यांनी केला. त्यांच्या या दाव्याने खळबळ उडाली आहे.
या कंपनीवर आज ना उद्या बंदी घातली पाहिजे. याप्रकरणाची चौकशी होईपर्यंत टीडीपीच्या मंत्र्याला वेगळी जबाबदारी द्यावी, त्यांना या पदावरून काढण्यात यावे. यात त्यांचे लिंकिंग असल्याने तपास नीट होत नाही. मंत्र्याचा या घातपातात हात आहे, असे म्हणत नाही. पण व्हीएसआरला तुम्ही वाचवत आहात, असे चित्र या ठिकाणी निर्माण झाले आहे. त्यामुळे चौकशी होईपर्यंत त्या मंत्र्याला बाजूला करावे, अशी मागणी करत रोहित पवार यांनी केली.
व्हीएसआर कंपनीचा मालक भारतात नाही. तो भारत सोडून अमेरिकेतल्या मयामी येथे गेला आहे. मात्र, त्याला कोणी भारताबाहेर जायला मदत केली? कंपनीच्या मालकाला अटक करून चौकशी करायला हवी होती. पण ते भारताबाहेर आहेत. अमेरिकेत मायामीला गेले आहेत. त्यामुळे व्हीएसआर कंपनीला मुद्दाम वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. सत्तेतील लोक मुद्दाम मालकाला वाचवत आहेत, असा खळबळजनक आरोप रोहित पवार यांनी केला आहे.




