बीड – जिल्ह्यात शिंदे शिवसेनेच्या नेत्याने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे, तर या प्रकरणात गावातील सरपंच आणि ग्रामसेवकांवर गंभीर आरोप केले आहेत. बीडमध्ये शिंदे शिवसेनेचा नेता आत्महत्येचा प्रयत्न करताना थोडक्यात वाचला आहे. बीड जिल्ह्यात एकामागून एक खळबळजनक घटना घडत आहेत. शिंदे शिवसेनेच्या बीड जिल्हा उपतालुका प्रमुखाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. आत्महत्या करण्यामागचे कारण त्यांनी एका चिट्ठीत लिहिले आहे.
बीडमध्ये शिंदे शिवसेनेच्या नेत्याने आत्महत्येचा प्रयत्न करत असताना साडी फाटल्याने ते बचावले आहेत. शिंदे शिवसेनेचे बीड उपतालुका प्रमुख भारत देवकाते यांनी बीड जिल्ह्यातील म्हसोबा फाटा परिसरात आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. गावातील बाभळीच्या झाडाला गळफास घेण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता.
गावातील आसपासच्या नागरिकांनी धावत जाऊन मदत केली आहे. व त्यांना जवळच बीड जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. या घटनेमागील कारणांबाबत शोध घेतला जात आहे. माहितीनुसार भारत देवकाते यांनी हा टोकाचा निर्णय घेण्यापूर्वी आपल्या मोबाइलवर व्हॉटसअप स्टेटस ठेवून व एक चिट्ठी आणि गळ्यात साडी बांधलेला फोटो शेअर केला होता.
शेवटचा जय महाराष्ट्र असा संदेश चिट्ठीत लिहिला होता. त्या चिट्ठीत त्यांनी ढेकणमोहा गावचे सरपंच शिवाजी भगवान गाडीवान आणि ग्रामसेवक बी.जी. तांदळे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. भारत देवकाते यांच्या म्हणण्यानुसार गावातील गाईगोठा, विहीर आणि शेततळे यांसारखी कामे कमी दरात किंवा निःशुल्क करण्याचा त्यांनी निर्णय घेतला होता. मात्र याला गावातीलच काही स्थानिक पातळीवरील लोक विरोध करत होते, असा आरोप भारत देवकाते यांनी केला आहे.
मला सतत मानसिक ताण दिला जात असल्याने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला होता, असे भारत देवकाते यांनी म्हटले आहे. या प्रकरणात बीड मधील संबंधित राजकीय लोकांवर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी आपल्या चिट्ठीतून केली आहे. भारत देवकाते यांनी आपल्या मित्रांना आणि शिवसैनिकांना लिहिलेल्या संदेशात पत्नी, मुलगा किंवा कुटुंबातील कोणालाही जबाबदार धरू नये, अशी विनंती केली आहे. तसेच जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांना शेवटचा जय महाराष्ट्र केला आहे.
या घटनेची माहिती मिळताच बीड ग्रामीण पोलिस आणि स्थानिक प्रशासन सक्रिय झाले आहे. या प्रकरणाची ग्रामीण पोलिसांकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे. भारत देवकाते यांची प्रकृती स्थिर असल्याचे बीड जिल्हा रुग्णालय प्रशासनाने सांगितले आहे. या प्रकरणाने बीड जिल्ह्यात राजकीय आणि प्रशासकीय स्तरावर मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणात अधिक तपास बीड ग्रामीण पोलिस करत आहेत.





