गर्भलिंगनिदान आणि बेकायदेशीर गर्भपात करणाऱ्या टोळीचा भांडाफोड; कंत्राटी कर्मचाऱ्यास अटक

SHARE:

संभाजीनगर – गर्भलिंगनिदान आणि बेकायदेशीर गर्भपात करणाऱ्या टोळीचा भांडाफोड केला आहे. या घटनेने संभाजीनगरात खळबळ उडाली आहे. संभाजीनगरामध्ये गर्भलिंगनिदान आणि बेकायदेशीर गर्भपात करणाऱ्या टोळीचे जाळे शहरात उघडकीस आले आहे. याप्रकरणात कंत्राटी कर्मचार्यास अटक केली आहे. या घटनेत गर्भलिंगनिदान आणि बेकायदेशीर गर्भपात करण्यास तयार असलेल्या कुटुंबास कंत्राटी कर्मचारी डॉ. संतोष सोनवणे यांच्या टोळीचा संपर्क क्रमांक देत असल्याचे उघडकीस झाले आहे.

संभाजीनगरमधील या प्रकरणात संभजीनगर महानगरपालिका रुग्णालयातील कंत्राटी कर्मचाऱ्याचाच सहभाग असल्याचे पोलिस तपासातून समोर आले आहे. सरकारी रुग्णालयात तपासणीसाठी येणाऱ्या गर्भवती महिलांची माहिती गर्भलिंगनिदान आणि बेकायदेशीर गर्भपात करणाऱ्या टोळीपर्यंत पोहोचवण्याचे काम कंत्राटी कर्मचारी करत होता. गर्भलिंगनिदानासाठी प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून शंकर आढाव या संभाजीनगरमधील कंत्राटी कर्मचाऱ्याला संभाजीनगर एमआयडीसी सिडको पोलिसांनी अटक केली आहे.

या रॅकेटचा मुख्य आरोपी रेडिओलॉजिस्ट डॉ. संतोष सोनवणे याच्यासह इतर साथीदार सध्या पळून गेले आहेत. संभाजीनगर पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, रुग्णालयात येणार्या गर्भवती महिलांशी किंवा त्यांच्या कुटुंबीयांशी शंकर आढाव संपर्क साधत करत होता. त्यानंतर गर्भलिंगनिदानाबाबत त्यांची तयारी आहे का? याची विचारणा केली जात होती. संबंधित कुटुंब तयार असल्यास तो त्यांना डॉ. संतोष सोनवणे यांच्या टोळीचा संपर्क क्रमांक देत असल्याचे उघडकीस झाले आहे.

या प्रकरणाची माहिती ७ मार्च रोजी घडलेल्या एका घटनेतून मिळाली आहे. ७  मार्च २०२६ रोजी संभाजीनगर येथील नारेगाव परिसरात एका विवाहितेचा तिच्या घरातच गर्भलिंगनिदान करून तिचा गर्भपात करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेत डॉ. संतोष सोनवणे, जालन्यातील परिचारिका कमळ गोकुळ तिनगोटे आणि मयूरपार्क येथील महालॅब चालक अनिल सपकाळ यांचा सहभाग असल्याचे उघडकीस आले आहे. विवाहितेच्या वडिलांना हा प्रकार लक्षात आल्यानंतर संपूर्ण प्रकरण उघडकीस आले आहे.

या प्रकरणात संभाजीनगर पोलिसांनी शुक्रवारी विवाहितेचा पती अरबाज फेरोज सय्यद, सासू आशिया फेरोज सय्यद आणि सासरे फेरोज मन्सूर सय्यद सर्व रा. नारेगाव यांना अटक करण्यात आली आहे. ३  जणांना पोलिस कोठडीत ठेवण्यात आले आहे. पोलिस निरीक्षक सोमनाथ जाधव आणि सहायक पोलिस निरीक्षक कैलास लहाने यांच्याकडून ३ आरोपींची चौकशी सुरू आहे. पोलिस तपासात असेही समोर आले आहे की, आरोपी अरबाज सय्यद आपल्या गर्भवती पत्नीला नियमित तपासणीसाठी नारेगाव येथील मनपा रुग्णालयात घेऊन जात असे.

त्याच ठिकाणी कंत्राटी कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या शंकर आढावशी त्याची ओळख झाली होती. काही दिवसांपुर्वी दोघांमध्ये गर्भलिंगनिदानाबाबत चर्चा झाली होती. त्यानंतर शंकर आढावने अरबाजची ओळख महालॅब चालक अनिल जाधव याच्याशी करून दिली होती. या संपर्कातून पुढे गर्भलिंगनिदान आणि गर्भपाताचा प्रकार घडला आहे. या प्रकरणात शंकर आढावची भूमिका स्पष्ट झाल्यानंतर सहायक पोलिस निरीक्षक कैलास लहाने यांनी त्याला अटक केली आहे.

राज्य शासनाच्या वतीने शासकीय रुग्णालयांमध्ये रक्त तपासणीचे काम महालॅबमार्फत केले जाते. या महालॅबचे कंत्राट अनिल जाधव यांच्या पत्नीच्या नावावर असल्याची माहिती पोलिस तपासात मिळाली आहे. मात्र प्रत्यक्षात सर्व व्यवहार आणि कामकाज अनिल जाधवच पाहत असल्याचे समोर आले आहे. संभाजीनगर मनपाच्या नारेगाव रुग्णालयातील चाचण्यांचे कामही याच लॅबमार्फत केले जात होते. याचा फायदा घेत अनिल जाधवने शंकर आढावला आपल्या संपर्कात आणल्याचे सांगितले जाते.

संभाजीनगर मनपा रुग्णालयात येणाऱ्या गर्भवती महिलांची माहिती गोळा करून ती पुढे देणे, तसेच त्यांच्या कुटुंबीयांना गर्भलिंगनिदानासाठी तयार करण्याचे काम शंकर आढाव कडून करून घेतले जात होते. या कामासाठी त्याला टक्केवारीवर पैसे मिळत असल्याची माहिती संभाजीनगर पोलिसांनी दिली आहे. संभाजीनगर मनपातील कंत्राटी कर्मचार्याच्या बँक खात्यांची तपासणीही केली जाणार आहे. या प्रकरणात मुख्य आरोपी डॉ. संतोष सोनवणे, महालॅब चालक अनिल जाधव आणि परिचारिका कमळ तिनगोटे हे पळून गेले आहेत. अनिल जाधवची लॅबही अचानक बंद करण्यात आली आहे. डॉ. संतोष सोनवणे यापूर्वी जामिनावर सुटल्यानंतर सतत राहते घर बदलत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्यामुळे पोलिस पळून गेलेल्या आरोपींच्या कुटुंबीयांच्या हालचालीवर लक्ष ठेवत आहे. या प्रकरणात अधिक तपास संभाजीनगर पोलिस करत आहे.

Leave a Comment

अधिक वाचा