मुंबई – राज्यात सध्या भोंदूबाबा अशोक खरात नंतर असेच एक प्रकरण नवी मुंबईतून समोर आले आहे. येथील एका भामट्याने तब्बल ४० महिलांची फसवणूक आणि लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. हा भामटा स्वतःला कधी इस्त्रोचा शास्त्रज्ञ तर कधी आयपीएस-आयएएस अधिकारी असल्याचे भासवून महिलांना जाळ्यात ओढायचा. आदर्श म्हात्रे असे या आरोपीचे नाव असून त्याच्यावर आतापर्यंत तब्बल ४० गुन्हे दाखल झाले आहे. या घटनेमुळे नवी मुंबईसह संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे.
आदर्श म्हात्रे या भामट्याने राज्यातील आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या महिलांना मॅट्रिमोनी साईटवरून हेरून आपण इस्त्रोचा शास्त्रज्ञ किंवा आयएएएस, आयपीएस अधिकारी असल्याचं भासवून त्यांचं लैंगिक शोषण करून त्यांना लुबाडलं आहे. विशेष म्हणजे, हा भामटा ज्या महिलांचं लग्नाचं वय निघून गेलं अशा महिलांना किंवा वर्षाला २५ ते ३५ लाख रूपये पॅकेज घेणाऱ्या महिलांना मॅट्रिमोनी साईटवरून शोधून काढायचा. तो या महिलांना आलिशान गाड्यांमधून पंचतारांकित हॉटेलमध्ये नेऊन आपला विश्वास संपादन करायचा. त्यानंतर आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून पुढे तो पैसे लुबाडाण्याचा डाव टाकायचा.
पीडित महिला आपल्या जाळ्यात अडकल्यानंतर आदर्श म्हात्रे या महिलांचे लैंगिक शोषण करायचा. भावनिक साद घालून या महिलांना ३५ ते ४० लाख रुपये होम लोन काढायला सांगायचा. पीडितेच्या नावाने होम लोन काढून ते पैसे आपल्या भावाच्या अकाउंटवर घ्यायचा. त्यानंतर पैसे घेऊन हा भामटा पसार व्हायचा आणि आपला मोबाईल बंद करून ठेवायचा. हे पैसे घेऊन हा भामटा मौजमजा करायचा. या विकृताने सर्व महिलांना तो शारीरिक, मानसिक आणि आर्थिकदृष्ट्या हतबल करायचा. यामुळे आजपर्यंत ४० गुन्हे दाखल झाले असले तरी अनेक महिलांनी गुन्हे नोंदवण्यास नवी मुंबई पोलिसांना नकार दिला आहे.
नवी मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार म्हात्रेच्या जाळ्यात अडकलेल्या आणखी ५० महिलांनी सामाजिक प्रतिष्ठेपोटी तक्रार देण्यास नकार दिला आहे. त्याचे गुन्हे केवळ नवी मुंबईपुरते मर्यादित नसून ठाणे, पुणे, नागपूर, नांदेड, नाशिक आणि अगदी कर्नाटक राज्यातही त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत.
तपासादरम्यान समोर आले आहे की आदर्श म्हात्रे हा भामटा स्वप्नील वारूळ, हेमंत गायकर, रुद्रेश गोंधळी, जयेश सोनवणे, जयेश नाईक, आदित्य म्हात्रे आणि तन्मय म्हात्रे अशा विविध बनावट नावांनी वावरायचा. या घटनेमुळे पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. महिलांनी मॅट्रिमोनी साईट्सवर ओळख झालेल्या व्यक्तींची पूर्ण शहानिशा केल्याशिवाय कोणताही आर्थिक व्यवहार करू नये, असा इशारा पोलिसांकडून देण्यात आला आहे.





