पुढील ५ दिवस धोक्याचे असून, राज्यामध्ये वादळी वाऱ्यांसोबत गारांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे, त्यामुळे सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

SHARE:

हवामान : पुढील ५ दिवस राज्याच्या विविध भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने काही जिल्ह्यांसाठी अलर्ट जारी केला आहे. तसेच शेतकऱ्यांना योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

गेल्या दोन दिवसांपासून राज्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. पुणे, नाशिक, धुळे, जळगावसह मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस पडला. या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून शेतमालाचे मोठे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी घरांचेही नुकसान झाले आहे. मात्र अजूनही राज्यावरील संकट टळलेले नाही. पुढील 5 दिवस राज्याच्या विविध भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने काही जिल्ह्यांसाठी अलर्ट जारी केला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

पुढील ५ दिवस धोक्याचे
पुणे हवामान विभागाचे प्रमुख सुदीप कुमार यांनी सांगितले की, पुण्यासह राज्यात पुढचे पाच दिवस पावसाची शक्यता आहे. आजही वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट, तर काही ठिकाणी येलो अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाडा मध्य महाराष्ट्र विदर्भात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

शेतकऱ्यांनी योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन
पुढे बोलताना सुदीप कुमार यांनी सांगितले की, ‘पुण्यासह राज्यभरात काल मुसळधार पाऊस पडला, तर काही भागात गारपीट तसेच काही ठिकाणी गारांचा पाऊस पडला आहे. त्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. आता पुढील पाच दिवस ही पावसाचे असणार आहेत. कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने दररोज दुपारनंतर पाऊस पडेल. 4 तारखेनंतर पावसाचा जोर कमी होऊ शकतो. गारांच्या पावसामुळे शेतीचे नुकसान होऊ शकते, त्यामुळे शेतकऱ्यांनी योग्य ती खबरदारी घ्यावी. विजांच्या कडकडाट हा पाऊस होणारं असल्यानं शेतकऱ्यांनी मोकळ्या जागेत आणि झाडाखाली थांबू नये असं आवाहनही हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.

धाराशिव जिल्ह्यात वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान
धाराशिव जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस कोसळला. या वादळामुळे आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. आंब्याची ५०% फळे वादळामुळे गळून पडल्याने आंबा उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसला आहे. पुढील पाच दिवस धाराशिव जिल्ह्यात हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे, त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत.

 

Leave a Comment

अधिक वाचा