माजी राज्यमंत्री तथा प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल; आमदार प्रवीण तायडे यांच्या भावाच्या हत्येचा कट रचल्या प्रकरणी आरोप

SHARE:

अमरावती – माजी राज्यमंत्री तथा प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्यातील प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख आणि माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्यावर खुनाचा कट रचल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अचलपूरचे आमदार प्रवीण तायडे यांचे बंधू अभिजित तायडे यांना ठार मारण्याचा कट रचल्याचा गंभीर आरोप प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू यांच्यावर करण्यात आला आहे.

तक्रारदार अभिजित दिवाकर तायडे यांनी याप्रकरणी अमरावती ग्रामीण पोलिसांत माजी मंत्री बच्चू कडू यांच्याविरोधात तक्रार नोंदवली आहे. अभिजित तायडे हे आमदार प्रवीण तायडे यांचे बंधू आहेत. त्यांच्या तक्रारीनुसार, माजी मंत्री बच्चू कडू आणि त्यांचे सहकारी शुभम माहोरे यांनी मिळून अभिजित तायडे यांच्या हत्येचा कट रचला होता. घातपात घडवून हा एक अपघात आहे, असा बहाणा करून अभिजित दिवाकरराव तायडे यांना संपवण्याचा हा कट होता, असा दावा तक्रारीत करण्यात आला आहे.

या प्रकरणातील एक पुरावा म्हणजे मोबाईल रेकॉर्डिंग आहे. अभिजित तायडे यांनी अमरावती पोलिसांना या कटाबाबतच्या संभाषणाची ऑडिओ रेकॉर्डिंग एका पेनड्राईव्हमध्ये दिली आहे. या रेकॉर्डिंगमध्ये खुनाचा कट रचला याबाबतचे संभाषण असल्याचे बोलले जात आहे. अमरावती पोलिसांनी हा पेनड्राईव्ह जप्त केला आहे. तर पुढील तपासासाठी तो फॉरेन्सिक टीमकडे पाठवण्यात आला आहे. अमरावतीमधील चांदूर बाजार पोलिसांनी याप्रकरणाचे गांभीर्य ओळखून बच्चू कडू आणि गोलू माहोरे यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिताच्या कलम ५५ , ५८ , आणि ६१ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अचलपूर विधानसभा मतदारसंघात बच्चू कडू आणि तायडे कुटुंब यांच्यात मोठा राजकीय संघर्ष सुरू आहे. आमदार प्रवीण तायडे यांच्या राजकीय पार्श्वभूमीचा उल्लेखही या तक्रारीत करण्यात आला आहे. राजकीय वैमनस्यातून हा कट रचला गेला आहे की, यामागे काही दुसरे कारण आहे, याचा शोध आता अमरावती पोलीस घेत आहेत. या घटनेमुळे अमरावती जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणात अधिक तपास अमरावती पोलिस करत आहेत.

Leave a Comment

अधिक वाचा