ॲलर्जिक राइनायटिस व आयुर्वेद उपचार

SHARE:

प्रसिद्ध आयुर्वेद तज्ञ - डॉ. पंकज कावरे (अमरावती)

ॲलर्जिक राइनायटिस व आयुर्वेद उपचार ■

{सतत सर्दी, ॲलर्जी व आयुर्वेदिक उपचार}

काही व्यक्ती अशा असतात की ज्यांना दैनंदिन जीवनामध्ये सतत सर्दी, अति शिंका, सतत नाक वाहणे, डोळ्यांतून पाणी येणे यासारख्या विकाराचा त्रास असतो.

ही अवस्था बहुधा “ॲलर्जिक राइनायटिस” म्हणून ओळखली जाते. आयुर्वेदात याला जीर्ण प्रातिश्याय किंवा पीनस विकार असे संबोधले जाते.

● जीर्ण प्रातिश्याय किंवा पिनस विकारांची लक्षणे अशी आहेत.सतत शिंका येणे, नाक वाहणे किंवा बंद होणे, डोळ्यांत खाज व पाणी येणे, डोकेदुखी, घशात खवखव, थकवा ही प्रमुख लक्षणे आहेत. काही रुग्णांमध्ये श्वास घेण्यास त्रास, छातीत जडपणा देखील जाणवतो. जीर्ण व्याधी असल्यास दमा व्याधीमध्ये रुपांतरीत झालेला असतो.

● प्रातिश्याय व पिनस या विकाराचा प्रादुर्भाव का होतो ? त्याची कारणे म्हणजे धूळ, धूर, परागकण, थंडी, पाळीव प्राण्यांचे केस, काही विशिष्ट अन्नपदार्थ (दही, थंड पेये) यामुळे ॲलर्जी वाढते. अति पाणी पिणे, सकाळी उठल्याबरोबर किंवा रात्री झोपताना जास्त पाणी पिणे, बदलती जीवनशैली, कमी प्रतिकारशक्ती व प्रदूषण, शीत आहार -विहाराचे जास्त सेवन करणे ही देखील महत्त्वाची कारणे आहेत.

● मॉडर्न वैद्यकीय दृष्टिकोनातून ॲलर्जी ,डीएनएस (नाकाचे हाड वाढणे) किंवा नजल पॉलिप वाढणे असे या आजाराला म्हणता येऊ शकते.
आधुनिक वैद्यकानुसार ही समस्या इम्यून सिस्टीमची अतिसंवेदनशील प्रतिक्रिया आहे. शरीर एखाद्या निरुपद्रवी घटकाला (जसे धूळ) शत्रू मानून त्यावर प्रतिक्रिया देते. त्यासाठी अँटीहिस्टामिन्स, स्टेरॉईड स्प्रे, इम्युनोथेरपी यांचा वापर केला जातो. मात्र या औषधांनी तात्पुरता आराम मिळतो; पूर्णतः मूळ कारणावर उपचार होत नाही. नाकाच्या वाढलेल्या हाडाचे (डीएनएस) ऑपरेशन केले तरी पुन्हा त्रास उद्भवतोच.

आयुर्वेदानुसार हा विकार मुख्यतः कफ दोष वाढल्यामुळे होतो. कफ वाढविणारा आहार-विहार, थंड पदार्थ, रात्र जागरण, धूळ-धूर यामुळे कफ वाढतो व नसामार्गात अडथळा निर्माण होतो.
ॲलर्जीचा प्रादुर्भाव असलेल्या व्यक्तींनी आपला आहार- विहार पुढीलप्रमाणे ठेवला पाहिजे

गरम, ताजे व पचायला हलके अन्न घ्यावे. सूप, उकळलेले पाणी, उपयोगी. हळद, सौंठ, पिंपळी यांचा वापर करावा.
दही, थंड पेये, आईस्क्रीम, बेकरी पदार्थ टाळावेत.
अति प्रमाणात व सकाळी उठल्याबरोबर किंवा रात्री झोपताना पाणी पिणे टाळावे.
मधाचा मर्यादित वापर कफ कमी करण्यासाठी उपयुक्त आहे.
● उपाय ●

रोज प्राणायाम व योग करणे. शक्य असल्यास सकाळी उठल्याबरोबर दोरीवरच्या शंभर ते पाचशे उड्या मारणे. धूळ, धूर टाळणे. नियमित झोप घेणे.नस्य (नाकात औषधी तेल टाकणे) करणे. स्टीम इनहेलेशन (वाफ घेणे).

● ॲलर्जी विकाराचा दोष नाहीसा करण्यासाठी अत्यंत गुणकारी औषध आयुर्वेदात उपलब्ध आहेत. यामध्ये
सितोपलादि चूर्ण, तालीसादी चूर्ण, त्रिकटु चूर्ण, हरिद्रा खंड, अगस्त्य हरितकी
ही औषधे कफ कमी करून श्वसनमार्ग स्वच्छ करतात व रोगप्रतिकारशक्ती वाढवतात. मात्र योग्य वैद्यांच्या सल्ल्यानेच सेवन करावे.

● पंचकर्म हे आयुर्वेदातील शुद्धीकरण उपचार असून, सतत सर्दी व ॲलर्जीमध्ये अत्यंत प्रभावी मानले जाते. पंचकर्म चिकित्सेतील वमन चिकित्सा ही कफ दोष बाहेर काढण्यासाठी केली जाणारी प्रमुख प्रक्रिया आहे.
यामध्ये प्रथम स्नेहन (औषधी सिद्ध तूप किंवा तेल सेवन) व स्वेदन (घाम आणणे) केले जाते. त्यानंतर औषधी द्रव्यांच्या सहाय्याने वमन (उलटी) करवून शरीरातील साचलेला कफ बाहेर काढला जातो.

● ॲलर्जिक विकारासाठी पंचकर्म
चिकित्सेमधील वमनाचे फायदे-

कफ दोषाचे मूलत: शुद्धीकरण, श्वसनमार्ग स्वच्छ होणे, ॲलर्जीची तीव्रता कमी होणे, प्रतिकारशक्ती वाढणे, वारंवार होणारी सर्दी थांबणे.
वमन चिकित्सा केवळ तज्ञ आयुर्वेदिक चिकित्सकांच्या देखरेखीखालीच करावी. सध्या सुरू असलेल्या वसंत ऋतूमध्ये वामन चिकित्सा केल्यास जास्त फायदा दिसतो.

पंचकर्मातील विरेचन चिकित्सा, बस्ती चिकित्सा, नस्य चिकित्सा सुद्धा या आजारावर अतिशय उपयोगी होऊ शकतात.

सतत सर्दी व ॲलर्जी ही फक्त साधी समस्या नसून ती जीवनमानावर परिणाम करणारी स्थिती आहे. हा आजार असल्यामुळे शारीरिक तंदुरुस्ती नसते. त्यामुळे विशेषता विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासावर लक्ष केंद्रित होत नाही व त्याचा परिणाम करिअरवर पण होऊ शकतो. आधुनिक औषधोपचार तात्पुरता आराम देतात, परंतु आयुर्वेद मूळ कारणांवर काम करून दीर्घकालीन समाधान देतो. योग्य आहार-विहार, औषधी व पंचकर्म यांचा समन्वय केल्यास या त्रासातून कायमस्वरूपी मुक्तता मिळू शकते.

 

●लेखक
वैद्य पंकज कावरे
अमरावती
9823051031

Leave a Comment

अधिक वाचा