मुंबई :उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे एक धक्कादायक निर्णय घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मुंबईत माजी मंत्री बच्चू कडू आणि शिंदे यांच्यात बैठक झाल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
राज्यात विधानपरिषद निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. येत्या १२ मे रोजी या निवडणुकीसाठी मतदान होणार असून एकूण ९ जागांसाठी ही निवडणूक होईल. या निवडणुकीसाठी राज्यातील प्रमुख पक्षांकडून योग्य उमेदवारांचा शोध घेतला जात आहे. एकनाथ शिंदे यांची शिवसेनादेखील राजकीय सोईचा आणि भविष्यकालीन राजकारणात फायदेशीर ठरणारा चेहरा शोधत आहे. दरम्यान, एकीकडे या निवडणुकीमुळे राजकीय घडामोडी वाढलेल्या असतानाच आता दुसरीकडे राजकीय वर्तुळात खळबळ निर्माण करणारी माहिती समोर येत आहे. एकनाथ शिंदे हे थेट बच्चू कडू यांना विधानपरिषदेच्या निवडणुकीत उतरवण्याची शक्यता आहे.
नेमकी काय माहिती समोर आली?
मिळालेल्या माहितीनुसार राज्यसभेप्रमाणे विधानपरिषद निवडणुकीतही एकनाथ शिंदे धक्कातंत्राचा वापर करण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार शिंदे यांच्याकडून माजी मंत्री बच्चू कडू यांना विधानपरिषदेची ऑफर देण्यात आली आहे. याबाबत चर्चा करण्यासाठी बच्चू कडू आणि एकनाथ शिंदे यांची मुंबईत भेट झाल्याचेही सूत्रांनी सांगितले आहे. परंतु अगोदर कार्यकर्त्यांसोबत चर्चा करूनच याबाबत निर्णय घेणार असल्याची भूमिका बच्चू कडू यांनी घेतली असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
बच्चू कडू आमदारकी स्वीकारणार का?
गेल्या काही दिवसांपासून बच्चू कडू वेगवेगल्या कारणांमुळे चर्चेत आलेले आहेत. गेल्या वर्षी त्यांनी संपूर्ण शेतकरी कर्जमाफी मिळावी, या मागणीसाठी मोठे आंदोलन उभे केले होते. या आंदोलनामुळे सरकार जेरीस आले होते. सरकारने बच्चू कडू आणि शिष्टमंडळाला बोलवून कर्जमाफीबाबत चर्चा केली होती. त्यानंतर सरकारने जून २०२६ पूर्वी शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाईल, अशी घोषणा केली होती. या आंदोलनादरम्यान त्यांनी सत्ताधारी महायुती सरकारवर टीका केली होती. तसेच भाजपाचे आमदार प्रवीण तायडे यांनी बच्चू कडू यांच्यावर भावाच्या हत्येचा कट रचल्याचाही नुकताच आरोप केला आहे. या आरोपामुळेही बच्चू कडू राज्यात चर्चेत आले होते.
बच्चू कडू नेमका काय निर्णय घेणार?
दरम्यान, शेतकरी कर्माफीसाठी सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका करणारे बच्चू कडू सत्तेत असलेल्या एकनाथ शिंदे यांच्यातर्फे दिलेल्या विधानपरिषदेच्या ऑफरला स्वीकारणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




