प्रतिष्ठेच्या आड लपलेलं वास्तव

SHARE:

आज समाजात एक सूक्ष्म पण ठळक बदल दिसून येतोय. माणूस काय आहे यापेक्षा तो कसा दिसतो, याला अधिक महत्त्व मिळू लागलं आहे. जीवनाच्या अनेक स्तरांवर हा बदल जाणवतो आहे. शिक्षण, करिअर, नातेसंबंध, सामाजिक स्थान अश्या प्रत्येक ठिकाणी प्रतिमा निर्माण करणं ही एक गरज बनली आहे. आणि ही गरज हळूहळू इतकी वाढली आहे की वास्तव आणि प्रदर्शन यांच्यातील सीमारेषा धूसर होत चालली आहे.

पूर्वी समाजात व्यक्तीचं मूल्यमापन तिच्या कामावर, स्वभावावर केलं जायचं. आज मात्र त्या मूल्यमापनात बाह्य घटकांचा मोठा वाटा झाला आहे. एखाद्याचं यश त्याच्या प्रत्यक्ष कामापेक्षा त्याच्या सादरीकरणावर अवलंबून असल्याचं अनेकदा दिसतं. ही प्रवृत्ती अचानक आलेली नाहीय. ती बदलत्या सामाजिक आणि तांत्रिक वातावरणाची परिणती आहे असं म्हणायला हरकत नाही. सोशल मीडियाने या बदलाला वेग दिला आहे. प्रत्येकाला स्वतःचं आयुष्य दाखवण्याचं व्यासपीठ मिळालं आहे. फोटो, व्हिडिओ, स्टेटस यांच्या माध्यमातून आपण स्वतःची एक विशिष्ट प्रतिमा तयार करतो. ही प्रतिमा अनेकदा निवडक असते. आयुष्यातील आनंदाचे क्षण पुढे येतात, पण संघर्ष, अपयश आणि साधेपणा मागे राहतो. परिणामी, एक ‘परिपूर्ण’ आयुष्याचं चित्र तयार होतं, जे वास्तवाशी नेहमी जुळत नाही. या सगळ्याचा परिणाम तुलना करण्याच्या प्रवृत्तीवर होतो. इतरांचं आयुष्य अधिक आकर्षक वाटू लागतं, आणि स्वतःचं आयुष्य अपूर्ण वाटू लागतं. त्यामुळे माणूस स्वतःच्या वास्तवावर समाधानी न राहता त्या प्रतिमेला गाठण्याचा प्रयत्न करू लागतो. या प्रक्रियेत तो स्वतःला हरवतो, कारण तो इतरांच्या नजरेत योग्य दिसण्यासाठी जगू लागतो.

तेजस्वी बारब्दे पाटील

 

भारतातील मध्यमवर्गावर या प्रवृत्तीचा विशेष परिणाम दिसतो. आर्थिक क्षमता मर्यादित असली, तरी सामाजिक अपेक्षा मोठ्या असतात. चांगलं घर, ब्रँडेड कपडे, महागडी शाळा, आकर्षक लग्नसमारंभ या सगळ्यांमधून ‘प्रतिष्ठा’ दाखवण्याची एक शर्यत सुरू आहे. अनेकदा ही शर्यत वास्तवापेक्षा पुढे जाते. खर्च वाढतो, कर्ज वाढतं, पण प्रतिमा टिकवण्याचा प्रयत्न सुरूच राहतो. शिक्षण क्षेत्रातही हीच प्रवृत्ती दिसते. कोणत्या शाळेत शिक्षण घेतलं, कोणता कोर्स केला, कोणत्या संस्थेचं नाव जोडलेलं आहे या गोष्टींना जास्त महत्त्व दिलं जातं. ज्ञान, कौशल्य आणि समज या गोष्टी मागे पडतात. करिअरमध्येही कामापेक्षा पद, पगार आणि बाह्य प्रतिमा यावर भर दिला जातो. नातेसंबंधांमध्येही हा बदल दिसतो. लोक एकमेकांशी जसं आहेत तसं राहण्यापेक्षा कसं दिसत आहेत, याकडे जास्त लक्ष देतात. सार्वजनिक ठिकाणी नात्याचं प्रदर्शन महत्त्वाचं वाटतं, पण खऱ्या संवादाला वेळ मिळत नाही. यामुळे नात्यांचा गाभा कमकुवत होतो. या सगळ्यात एक महत्त्वाचा मानसिक प्रश्न निर्माण होतो, स्वतःची ओळख. जेव्हा माणूस सतत प्रतिमा निर्माण करण्यात गुंततो, तेव्हा तो स्वतःशी प्रामाणिक राहणं विसरतो. बाहेरच्या जगासाठी तयार केलेली प्रतिमा आणि आतल्या मनाचं वास्तव यांच्यात अंतर वाढतं. हे अंतर जितकं वाढतं, तितकी अस्वस्थता वाढते.
मात्र या बदलाकडे केवळ नकारात्मक दृष्टीने पाहणं योग्य ठरणार नाही. स्वतःला सादर करणं, व्यक्त होणं आणि प्रगती दाखवणं हेही आवश्यक आहे. समस्या तेव्हा निर्माण होते, जेव्हा सादरीकरण हे वास्तवापेक्षा मोठं होतं. जेव्हा प्रतिमा हीच सत्य बनते, तेव्हा माणूस स्वतःच्या आयुष्यापासून दूर जाऊ लागतो.

आजच्या काळात संतुलनाची गरज आहे. दिसणं आणि असणं यांच्यातील अंतर समजून घेण्याची गरज आहे. प्रतिमा महत्त्वाची असू शकते, पण ती वास्तवावर आधारित असली पाहिजे. कारण दीर्घकाळ टिकणारी ओळख ही प्रदर्शनातून नव्हे, तर अनुभव आणि प्रामाणिकपणातून तयार होत असते. भारतीय समाज एका अशा टप्प्यावर आहे, जिथे त्याला स्वतःकडे पाहण्याची गरज आहे. आपण काय आहोत, हे महत्त्वाचं आहे की आपण कसे दिसतो, हे महत्वाचं आहे हे समजलं पाहिजे. कारण या प्रश्नाचं उत्तरच समाजाची दिशा ठरवणार आहे. शेवटी काय, प्रतिमा बदलता येते पण जगावं वास्तवातच लागतं.

 

लेखक –
तेजस्वी बारब्दे पाटील
अमरावती.
9561537784

Leave a Comment

अधिक वाचा