हिंदीनंतर आता इंग्रजी पुस्तकातूनही मराठा साम्राज्याचा नकाशा हटवला; शिक्षण मंत्र्यांच्या विनंतीला केराची टोपली

SHARE:

मुंबई – एनसीईआरटीच्या इतिहास पाठ्यपुस्तकातून मराठा साम्राज्याचा नकाशा वगळण्यात आल्यानंतर राज्यात संतापाची लाट उसळली होती. यानंतर राज्याचे शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी हा नकाशा पुन्हा समाविष्ट करण्याचे आश्वासन विधीमंडळात दिले होते. या संदर्भात एनसीईआरटीसोबत पत्रव्यवहार करून योग्य तो पाठपुरावा केला जाईल, असे त्यांनी विधानमंडळात सांगितले होते. मात्र यानंतरही आता केंद्र सरकारने राज्याच्या आदेशाला केराची टोपली दाखवत इंग्रजीच्या पाठ्यपुस्तकातूनही मराठा साम्राज्याचा नकाशा हटविण्यात आला आहे.

इंग्रजी माध्यमाच्या आठवीच्या पुस्तकात नकाशा आहे. पण उर्दू आणि हिंदी माध्यमाची पुस्तके पाहिली तेव्हा नकाशा दिसून येत नाही, अशी कबुली देत यासंदर्भात सुधारणा करण्यासाठी ९ मार्च रोजी केंद्र सरकारला लेखी विनंती केली असून याबाबत पाठपुरावा करण्यात येईल, असे शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी विधानमंडळात सांगितले होते. महाराष्ट्र सरकारने यासंदर्भात केंद्र सरकारला लेखी विनंती केली होती. मात्र, त्यानंतरही कोणतीही दखल न घेता आता इंग्रजी भाषेतील पुस्तकातूनही मराठा साम्राज्याचा नकाशा हटवण्यात आल्याचे समोर आले आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, शिक्षण मंत्र्यांच्या विनंतीला एनसीईआरटीकडून हरताळ फासण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.

ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने महाराष्ट्रात राजकारण चालते, त्यांचाच इतिहास पुसला जात असताना राज्यातील सत्ताधारी आमदार आणि मंत्र्यांनी साध्या निषेध देखील केला नाही, ही लज्जस्पद बाब आहे. दरम्यान या निर्णयाच्या निषेधार्थ साताऱ्यात शिवप्रेमींकडून भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी दहा वाजता साताऱ्यातील शिवतीर्थ येथून या मोर्चाला सुरुवात होणार आहे. विशेष म्हणजे, छत्रपती घराण्यातील वृषाली राजे भोसले या देखील या मोर्चात सहभागी होणार आहेत.

एनसीईआरटीच्या इयत्ता आठवीच्या पुस्तकातून मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा हटवल्यानंतर छत्रपती घराण्यातील वृषाली राजे भोसले यांनी टीका केली होती. त्या म्हणाल्या होत्या कि ही बाब अत्यंत खेदजनक आणि निषेधार्ह आहे. मराठा साम्राज्य हा केवळ इतिहास नाही तर तो आपल्या स्वाभिमानाचा, पराक्रमाचा आणि राष्ट्ररक्षणाच्या तेजस्वी परंपरेचा जिवंत वारसा आहे. या निर्णयाविरोधात कायदेशीर पावले उचलणार असल्याचा इशारा वृषालीराजे भोसले यांनी दिला होता.

त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले होते कि छत्रपती शाहू महाराजांच्या काळात मराठा साम्राज्याने दिल्लीच्या राजकारणावर आपली पकड घट्ट केली होती. मराठ्यांचा पराक्रम केवळ सह्याद्रीपुरता मर्यादित न राहता थेट अटकेपार पोहचला होता. राजस्थानातील रामपुरा मोहीम, बुंदीतील राजकीय हस्तक्षेप, कक्कोरचे घनघोर युद्ध आणि पाटण, तसेच मेर्टा येथील ऐतिहासिक विजय हे मराठ्यांच्या अजेय युद्धनीतीचे पुरावे आहेत. अनेक राजपूत राज्यांनी त्यावेळी मराठ्यांचे वर्चस्व मान्य केले होते. ही ऐतिहासिक वस्तूस्थिती असतानाही मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा वस्तुस्थिती असतानाही मराठा अभ्यासक्रमातून हटवणे म्हणजे जाणीवपूर्वक इतिहास पुसण्याचा प्रयत्न आहे.

इतिहास हा कोणत्याही राजकीय किंवा सामाजिक दबावाखाली बदलला जाऊ नये. तो पुराव्यांच्या आधारे जसाच्या तसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. मराठ्यांच्या उत्तरेतील प्रभावाचा पुरावा देणारा नकाशा वगळणे हे ऐतिहासिक सत्याशी प्रतारणा करण्यासारखे आहे. आम्ही वैयक्तिकरित्या तसेच छत्रपती घराण्याच्या वतीने या निर्णयाचा तीव्र निषेध करतो. सध्या आम्ही यासंदर्भात सर्व कायदेशीर बाबी तपासत आहोत. त्यानंतर पुढे योग्य ती कार्यवाही करण्यात येईल. हा केवळ इतिहास नाही आमचा स्वाभिमान आहे आणि त्याचे रक्षण आम्ही नक्की करू असं वृषालीराजे भोसले म्हणाल्या होत्या.

Leave a Comment

अधिक वाचा