“दोन लाखांहून अधिक मताधिक्याने निवडून आल्याबद्दल उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांचे हार्दिक अभिनंदन. बारामतीकरांनी सुनेत्राताईंना विक्रमी मताधिक्याने विजयी करत अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे”
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले आहेत. भाजपने पश्चिम बंगाल, आसाम आणि पुदुच्चेरी या तीन राज्यात यश संपादन केलं आहे. पाचपैकी या तीन राज्यातला निवडणूक निकाल भाजपसाठी महत्वाचा होता. यात आसाममध्ये भाजपचं सरकार होतं. पश्चिम बंगालमध्ये भाजपने पहिल्यांदा सत्ता मिळवली आहे. आसाममध्ये मागच्या दहावर्षांपासून भाजपचं सरकार आहे. त्यामुळे प्रस्थापित सरकारविरोधात लाट असण्याची शक्यता होती. पण अशी लाटच दिसली नाही. उलट आसाममध्ये १२५ पैकी १०० पेक्षा जास्त जागा जिंकण्याच्या स्थितीत भाजप आहे. दुसरीकडे पश्चिम बंगालमध्ये भाजपने कमाल केली आहे. भाजप बंगालमध्ये एक भव्य विजय मिळवण्याच्या स्थितीत आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजप पहिल्यांदा सत्तेवर येणार आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजप १९५ पेक्षा जास्त जागांवर आघाडीवर आहे.
भाजपने तीन राज्यात प्रचंड विजय मिळवला आहे. भाजपच्या या विजयावर उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “पश्चिम बंगालमध्ये काली माता आणि आसाममध्ये कामाख्य देवीचा आशीर्वाद भाजपला मिळाला आहे. ‘असम में विजय आसान है, सिर्फ भाजपा ही पहचान है’ ही घोषणा पुन्हा एकदा खरी ठरली आहे. भारतीय जनता पार्टी सलग तिसऱ्यांदा आसाममध्ये सत्तेवर येणार आहे. देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पोलादी गृहमंत्री अमित शाह यांच्या व्हिजनवर आसामच्या नागरिकांनी पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे. मुख्यमंत्री डॉ. हिमंत बिस्वा सरमा यांचं विकास धोरण आणि त्यांच्या कार्यावर जनतेने पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे. म्हणून माझे मित्र हिमंत बिस्वा सरमा यांना शुभेच्छा” असं एकनाथ शिंदे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
सुनेत्रा पवार यांच्या विजयावर एकनाथ शिंदे काय म्हणाले?
“दोन लाखांहून अधिक मताधिक्याने निवडून आल्याबद्दल उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांचे हार्दिक अभिनंदन. बारामतीकरांनी सुनेत्राताईंना विक्रमी मताधिक्याने विजयी करत अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. स्वर्गीय अजितदादा पवार यांनी बारामतीच्या विकासाचे आणि प्रगतीचे पाहिलेले स्वप्न सुनेत्राताई पूर्ण करतील, यात शंका नाही” असं एकनाथ शिंदे यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.






