मुंबई – अडीच वर्षांपूर्वी शेतकर्यांचा सातबारा कोरा करू, असे आश्वासन देऊन सत्तेत आल्यानंतर राज्यातील महायूती सरकारने मंगळवारी कर्जमाफीच्या योजनेला मंजूरी दिली. त्यानुसार शेतकर्यांना दोन लाखापर्यंत कर्जमाफी देण्यात येणार आहे. मात्र सरकारने यात अटी आणि शर्ती देखील घातल्या आहेत. त्यामुळे, या कर्जमाफी योजनेला शेतकरी संघटना आणि विरोधकांनी विरोध दर्शवला आहे. ही कर्जमाफी म्हणजे शेतकऱ्यांशी केलेली घोर फसवणूक आहे, अशी घाणाघाती टीका शेतकरी नेते अखिल भारतीय किसान सभेचे राज्य सरचिटणीस अजित नवले यांनी केली आहे.
महायूती सरकारने मंगळवारी शेतकरी कर्जमाफीच्या योजनेस मंगळवारी मंजुरी दिली. मात्र शेतकरी कर्जमाफी योजनेत अटी-शर्तीदेखील घातल्या आहेत. यामुळे ही कर्जमाफी आतापर्यंतच्या सर्व कर्जमाफ्यांमध्ये सर्वाधिक कठोर ठरणार असून, अत्यल्प शेतकऱ्यांनाच त्याचा लाभ मिळणार असल्याचा आरोप नवले यांनी केला. ही कर्जमाफी फसवी असल्याचा आरोप नवले यांनी केला. अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले येथे महात्मा फुले चौकात शासनाच्या कथित ‘फसव्या कर्जमाफी अध्यादेशाचे’ दहन करण्यात आले. पुढील दोन दिवस राज्यभर हे आंदोलन सुरू राहणार असल्याची माहिती किसान सभेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.
डॉ. अजित नवले म्हणाले की आतापर्यंत जेवढ्या कर्जमाफी योजना आल्या, त्यामध्ये यावेळची कर्जमाफी सर्वात कडक अटी असलेली ठरली आहे. त्यामुळे खूप कमी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जात आहे. निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांचा सातबारा पूर्णपणे कोरा करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, आता प्रत्यक्षात मात्र बहुसंख्य शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडली आहे.
नवले म्हणाले कि 2019 मध्ये कर्जमाफी घेतलेले तब्बल 32 लाख 29 हजार शेतकरी आहेत. हे शेतकरी सध्या थकीत असले तरी त्यांना पूर्ण कर्जमाफी न देता केवळ 50 हजार रुपयांच्या मर्यादेतच लाभ दिला जाणार आहे. नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून 50 हजार रुपये देतानाही किमान दोन वर्षे नियमित कर्जदार असण्याची कठीण अट घालण्यात आली आहे.
या योजनेतून अत्यंत कमी पगारावर काम करणाऱ्या सहकार क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना सरसकट वगळण्यात आले आहे. 2 लाखांपर्यंत संपूर्ण कर्जमाफीचा गाजावाजा करायचा आणि प्रत्यक्षात मात्र बहुसंख्य शेतकऱ्यांची केवळ 50 हजारांवर बोळवण करायची, ही घोर फसवणूक आहे, अशी घाणाघाती टीका नवले यांनी केली आहे.
माहित असावे कि 13 नोव्हेंबर 2024 रोजी अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथे भाजप उमेदवार हरीश पिंपळे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत तत्कालिन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकर्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते. प्रसार सभेला संबोधित करताना ते म्हणाले होते कि केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. महायुतीचे पुन्हा सरकार येताच शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करून शेतकर्यांचा सातबारा कोरा करणार आहोत, अशी घोषणा त्यांनी केली होती.
Author: विवेक गंगाधरराव राऊत
Cheif Editor, Rayat Rakshak News, Maharashtra.






