जळगाव – चार बालकांचे हत्याकांड व अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणात 12 वर्षांनी आरोपीला मृत्युदंडाची शिक्षा देण्यात आली आहे. जळगाव जिल्ह्यातील बोरखेडा ता. रावेर येथे घडलेल्या 4 बालकांच्या हत्याकांड आणि अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी विशेष पोक्सो फास्ट ट्रॅक न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय दिला आहे. मुख्य आरोपी महेंद्र सीताराम बारेला याला फाशीची शिक्षा सुनावली आहे. गुरुवारी दि. 4 अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस. आर. जाधव यांनी हा निकाल दिला आहे.
भुसावळ येथे सत्र न्यायालय कार्यरत झाल्यानंतर 12 वर्षांनी आरोपीला मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. न्यायालयाने वैज्ञानिक, तांत्रिक आणि परिस्थितीजन्य पुरावे ग्राह्य धरत आरोपीला भारतीय दंड संहितेच्या कलम 302 खून आणि 376 बलात्कार कायद्याअंतर्गत दोषी ठरवले आहे. न्यायालयाने या प्रकरणाला अत्यंत गंभीर स्वरूपाचे मानले आहे व आरोपीला दुहेरी फाशीची शिक्षा सुनावली आहे.
या निर्णयामुळे पीडित कुटुंबाला मोठा दिलासा मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे. बोरखेडा गावातील मेताब भिलाला पावरा यांचे कुटुंब नातेवाईकांच्या विधीसाठी मध्य प्रदेशात गेले होते. त्यावेळी घरात सविता वय 13, राहुल वय 11, अनिल वय 8 आणि सुमन वय 6 ही 4 लहान मुले एकटी होती. आरोपी महेंद्र बारेला याने कुटुंबाचा विश्वास संपादन करून त्यांच्या घरात मुक्काम केला होता. मात्र, रात्रीच्या वेळी त्याने 13 वर्षीय मुलीवर अत्याचार करून तिची हत्या केली होती.
या प्रकाराला विरोध करणाऱ्या इतर 3 लहान भावंडांवरही धारदार हत्याराने वार करत त्यांची हत्या करण्यात आली होती. घटना घडल्यानंतर आरोपी फरार झाला होता. ही घटना 16 ऑक्टोबर 2020 रोजी उघडकीस आली होती. या प्रकरणाच्या तपासात पोलिसांनी वैज्ञानिक पुरावे, फॉरेन्सिक अहवाल आणि परिस्थितीजन्य बाबींच्या आधारे आरोपी विरोधात मजबूत पुरावे सादर केले आहेत. न्यायालयाने हे सर्व पुरावे ग्राह्य धरत आरोपी दोषी असल्याचे स्पष्ट केले आहे.
सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी सांगितले की, फाशीच्या शिक्षेनंतर हे प्रकरण नियमानुसार एका महिन्याच्या आत मुंबई उच्च न्यायालयाकडे कन्फर्मेशनसाठी पाठविण्यात येईल. त्यानंतर आरोपीला अपील करण्याची संधी उपलब्ध राहणार आहे. उच्च न्यायालयाच्या सुनावणीनंतरच फाशीच्या शिक्षेवर अंतिम शिक्कामोर्तब होणार आहे. या निकालानंतर जळगाव जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात अशा अमानुष गुन्ह्यांवर कठोर शिक्षा होणे आवश्यक असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.
Author: विवेक गंगाधरराव राऊत
Cheif Editor, Rayat Rakshak News, Maharashtra.






