नागपूर : केंद्रात गेल्या १२ वर्षांपासून आणि राज्यातही बहुतांश काळ भारतीय जनता पक्षाची (भाजप) सत्ता असताना, राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर आज स्वतः “लोकतंत्र बचाव, अराजकता हटाव” आंदोलन करण्याची वेळ येणे, हा महाराष्ट्रातील जनतेचा सर्वात मोठा उपहास आहे, अशी घणाघाती टीका ‘विदर्भ राज्य आंदोलन समिती’ने केली आहे. सत्ता हातात असताना विरोधकांसारखी भूमिका घेऊन सरकार जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप करत, समिती आज, गुरुवार, दिनांक ५ नोव्हेंबर २०२६ रोजी या रॅलीला काळे झेंडे दाखवून भाजप सरकारचा तीव्र निषेध नोंदवणार आहे.
दुष्काळ आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकार अपयशी
आज संपूर्ण राज्यात आणि विदर्भात भीषण दुष्काळसदृश परिस्थिती असून शेतकरी अतोनात चिंतित आहेत. सरकारने शेतकऱ्यांची थट्टा करत केवळ ५ हजार रुपयांची जुजबी मदत कबूल केली, परंतु सरसकट दुष्काळग्रस्त मदत राशी जाहीर केली नाही. यामुळे विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र वाढले असून, वास्तविक पाहता सरकारने ‘शेतकरी बचाव’ रॅली काढणे गरजेचे होते, असा संताप समितीने व्यक्त केला आहे.
रोजगार स्थलांतर आणि वाढती गुन्हेगारी
विदर्भातील तरुणांच्या हाताला काम नसल्यामुळे मोठ्या प्रमाणावर रोजगार स्थलांतर (पलायन) होत आहे. रोजगाराभावी नागपूरसारख्या मेट्रो शहरात गुन्हेगारीचा आलेख मोठ्या प्रमाणावर उंचावला असून, NCRB च्या अहवालानुसार नागपूर हे गुन्हेगारीत दुसऱ्या क्रमांकाचे शहर झाले आहे. तरुणांना रोजीरोटीची अपेक्षा असताना सरकार मूळ मुद्द्यांना बगल देत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
स्वातंत्र्याविना फसवणूक
भाजप सरकारने विदर्भाच्या जनतेला स्वतंत्र विदर्भ राज्य देण्याचे आश्वासन दिले होते. विदर्भाच्या विकासासाठी आणि हक्कासाठी ही रॅली निघेल अशी आशा होती, मात्र सरकारने जनतेला पुन्हा एकदा फसवले आहे. राज्यातील कायदा व सुव्यवस्थेची संपूर्ण जबाबदारी सरकारची असताना, राज्यात अराजकता माजत असेल तर त्याला कारणीभूत असणाऱ्यांना सरकार अटक का करत नाही, असा सवाल विदर्भ राज्य आंदोलन समितीने केला आहे. सत्तेत राहून अशा प्रकारे आंदोलनाचे ढोंग करणे म्हणजे जनतेच्या डोळ्यात धूळफेक करण्याचा आणि मूळ प्रश्नांवरून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न असल्याचे समितीने म्हटले आहे.
विदर्भातील जनतेच्या हक्कासाठी आणि सरकारच्या या दुःखी भूमिकेविरोधात गुरुवार, ५ नोव्हेंबर २०२६ रोजी विदर्भ राज्य आंदोलन समिती रस्त्यावर उतरून भाजप सरकारचा निषेध करेल आणि रॅलीला काळे झेंडे दाखवून जाब विचारणार आहे, असा इशारा समितीने दिला आहे.
पत्रकार परिषदेला मुकेश मासुरकर (प्रांताध्यक्ष युवा आघाडी), तात्यासाहेब मत्ते (विदर्भ प्रचार प्रमुख), नरेश निमजे (अध्यक्ष नागपूर शहर) आणि गिरीश तितरमारे (अध्यक्ष युवा आघाडी नागपूर शहर), मौसिक पठाण (युवा वक्ता) उपस्थित होते.
Author: विवेक गंगाधरराव राऊत
लेखक सा. रयत रक्षक व रयत रक्षक न्यूज, महाराष्ट्र. चे मुख्य संपादक असून स्वतः प्रकाशक व मालक आहेत. त्यांना मागील 20 वर्षांपासून सामाजिक व राजकीय क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव व पत्रकारिता क्षेत्रातील मागील 9 वर्षाचा अनुभव आहे. आपल्या लेखणीतून ते नेहमी रयतेचे हित जोपसण्याचे कार्य करतात.





