ईव्हीएममध्ये घोळ होऊ नये म्हणून उमेदवारांनी स्वखर्चाने लावलेले सीसीटीव्ही काढले, प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर शंका…

SHARE:

कोल्हापूर – राज्यात नगरपालिका व नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी २  डिसेंबरला मतदान संपन्न झाले. मात्र, त्याच दिवशी नागपूर खंडपिठाचा निर्णय आला व रखडलेल्या २० नगरपालिकेसाठी मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर २१  डिसेंबरला मतमोजणी करण्याचे आदेश दिले. मतमोजणी लांबणीवर पडल्याने सर्वच राजकीय पक्षाची धाकधूक वाढली आहे. दरम्यान ईव्हिएमध्ये गडबड होऊ नये म्हणून काही ठिकाणी उमेदवारांचे कार्यकर्तेर् स्ट्रांग रूम बाहेर पहारा देत आहेत तर काही ठिकाणी उमेदवारांनी स्वतःची खाजगी सुरक्षा तैनात केली आहे. या दरम्यान पेठवडगांव येथे ईव्हीएममध्ये घोळ होऊ नये म्हणून उमेदवारांनी स्वखर्चाने सीसीटीव्ही लावले. मात्र प्रशासनाने ते काढून टाकले आहे. यामुळे नागरिकांनी नगरपालिका प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर शंका उपस्थित केली असून स्ट्रांग रूम बाहेर तणाव निर्माण झाला आहे.
कोल्हापुरातील पेठवडगाव नगरपरिषदेच्या २१  जागांसाठी २  डिसेंबर रोजी मतदान झालं. त्यामुळे सर्व ईव्हीएम मशिन नगरपालिकेच्या मराठा समाज हॉलमध्ये ठेवण्यात आल्या आहेत. परंतु विरोधी पक्षाचे उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना प्रशासनावर कोणताही विश्वास नसल्याने त्यांनी ईव्हिएममध्ये काही गडबड होऊ नये म्हणून स्वतःच्या खर्चाने स्ट्राँग रुमबाहेर सीसीटीव्ही बसवले. पण प्रशासनाने मात्र ते काढून टाकल्याने नगरपालिका प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर नागरिकांनी शंका उपस्थित केली आहे.
या संबंधी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सुमीत जाधव म्हणाले की सुरक्षेच्या दृष्टीने आपण या आधीच आठ कॅमेरे लावलेले आहेत. त्यासंबंधीचे पत्र प्रत्येक उमेदवाराला देण्यात आलं आहे. त्याची स्क्रीन बाहेर लावण्यात आली आहे. खासगी जागेत लावलेल्या सीसीटीव्ही संदर्भात तक्रार आली आहे. हा निवडणूक प्रक्रियेमध्ये हस्तक्षेप ठरतोय. निवडणूक आयोगाच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवलं जात आहे. जर उद्या कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाली तर त्याला जबाबदार कोण? नगरपरिषदेने ज्या काही उपाययोजना करायच्या आहेत त्या केलेल्या आहेत. उमेदवाराने सीसीटीव्ही लावण्यासंबंधी कोणतीही तरतूद नाही. आयोगाच्या सूचना आहेत त्याप्रमाणे आम्ही कारवाई केली आहे असं त्यांनी सांगितलं.
तर नगरसेवक पदाचे उमेदवार संदीप पाटील म्हणाले की निवडणूक प्रक्रियेमध्ये कोणताही घोळ होऊ नये, यासाठी कार्यकर्त्यांनी बाहेर खासगी जागेवर सीसीटीव्ही बसवले. परंतु प्रशासनाने हे सीसीटीव्ही काढण्यास सांगितल्यानंतर पोलिसांनी ते काढले. बाहेर खासगी जागेत लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीवर कुणी तक्रार केली याची माहिती प्रशासन देत नाही. तसेच तक्रार असेल तर त्याची लेखी प्रतही द्यायला तयार नाहीत. अशा परिस्थितीत प्रशासनाने सीसीटीव्ही काढल्याने शंकेला वाव आहे, असं पाटील म्हणाले.
याशिवाय धाराशिव मधील परंडा नगरपालिकेलाठी २  डिसेंबरला मतदान पार पडले आहे. येथे स्ट्रॉंग रुममध्येच ईव्हीएम मशीनचा संशयास्पद आवाज आल्याने गोंधळ उडाला होता. न्यायालयीन प्रक्रियेमध्ये अडकलेल्या धाराशिव शहरातील तीन प्रभागातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडून मशीनची पडताळणी केली जात होती. उमेदवार किंवा पक्षाला कुठलीही सूचना न देता मशीनची पडताळणी केल्याचा दोन्ही शिवसेनेने आरोप केला आहे. दोन्ही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत प्रशासनाला स्ट्रॉॉग रुममध्ये मशीन ठेवल्यापासून आतापर्यंत सीसीटीव्ही फुटेज द्या, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे. तसेच मंगळवारपासून परंडा येथे शिवसेनेकडून खडा पहारा दिला जात आहे.

Leave a Comment

अधिक वाचा