
मुंबई : महाराष्ट्राचे माजी क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांना मुंबई हायकोर्टाने काहीसा दिलासा दिला आहे. मुंबई हायकोर्टाने माणिकराव कोकाटे यांना १ लाखांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. पण हायकोर्टाने त्यांना नाशिक सत्र न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेस स्थगिती दिलेली नाही. यानंतर आता माणिकराव कोकाटे यांच्या आरोग्याबाबत मोठी आणि धक्कादायक माहिती समोर येत आहे. माणिकराव कोकाटे यांची अँजिओग्राफी करण्यात आली आहे. त्यांना चार ब्लॉक आहेत. त्यामुळे बायपास सर्जरी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे, अशी माहिती लीलावती रुग्णालयाच्या डॉक्टारांनी दिली आहे. लीलावती रुग्णालयाच्या डॉक्टरांनी आज संध्याकाळी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी माणिकाराव कोकाटे यांच्या आरोग्याबाबत सविस्तर माहिती दिली.
“माणिकराव कोकाटे परवा मुंबईच्या लीलावती रुग्णालयात आले होते. त्यावेळी दुपारचे सव्वा दोन वाजले होते. त्यांचे हृदयाचे ठोके वाढले होते. त्यांचा हार्ट रेट ११५ इतका होता. डोकं जड झालं होतं. त्यांना श्वासोच्छवासही जास्त होता. छातीत दुखत होतं. आम्ही ज्या काही महत्त्वाच्या टेस्ट होत्या त्या केल्या. डॉ. सुरेश विजयन कॉर्डिओलॉजिस्ट आहेत. ते तेव्हाच आले. त्यांनी त्यांना बघितलं आणि तातडीने आयसीयूत दाखल करण्यास सांगितलं. आम्ही त्यांना लगेच आयसीयूत दाखल केलं. जे काही औषध सुरु करायचे होते ते सुरु केले”, अशी माहिती डॉक्टरांनी सुरुवातीला दिली.
“टेस्टचे रिपोर्ट आले. आम्ही दोन तज्ज्ञ डॉक्टरांसोबत विचारणा केली. सगळ्यांनी सूचना दिली की, आपल्याला अँजिओ करावे लागेल. त्यामुळे काल संध्याकाळी सिटी कोरोनरी अँजिओ घेतलं होतं. त्याचा स्कोर एकदम जास्त होता. त्या रिपोर्टनंतर कोरोनरी अँजिओग्राफीचा निर्णय घेतला. त्यानंतर आज आम्ही अँजिओग्राफी केली”, अशी माहिती डॉक्टरांनी दिली.





