
जळगाव : राज्यात सर्वत्र स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांचा निकाल लागत आहेत. त्याचदरम्यान, संपूर्ण जळगाव जिल्ह्याचं लक्ष लागून असलेली मुक्ताईनगर नगरपंचायतीची निवडणूक अतिशय चुरशीची झाली होती. याठिकाणी भावना महाजन या भाजप पक्षाकडून नगराध्यक्षपदासाठी उभ्या होत्या, तर शिवसेना शिंदे गटाकडून आमदार चंद्रकांत पाटील यांची कन्या संजना चंद्रकांत पाटील या निवडणुकीच्या रिंगणात होत्या. मात्र, या नगरपंचायतीमध्ये केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांना मोठा धक्का बसला आहे.
खडसे कुटुंबाचा पराभव
मुक्ताईनगरच्या निवडणूक मतदानाच्यावेळी संपूर्ण जळगाव जिल्ह्याचं लक्ष या मुक्ताईनगरकडे होतं. याठिकाणी अनेक वाद विकोपाला गेले, तसेच एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फौरी झाडण्यात आल्या. मात्र, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे या स्वतः मैदानामध्ये उतरलेल्या होत्या, त्यामुळे या नगरपंचायतीमध्ये वेगळीच चुरस होती. मात्र, आजच्या निकालामध्ये आमदार चंद्रकांत पाटील यांची कन्या संजना पाटील या २५८३ मतांनी नगराध्यक्षपदासाठी विजयी झाल्या असून या ठिकाणी मोठा जल्लोष सुरू आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी देखील भाजप पक्षाला मोठा पाठिंबा दिला असल्याने या ठिकाणी एकनाथ खडसे आणि केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे अर्थात खडसे परिवाराचा मोठा पराभव मानला जात आहे.
गुलाबराव पाटलांना बालेकिल्ल्यात मोठा धक्का
धरणगाव नगरपरिषदेत महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा विजय झाला आहे. शिवसेना शिंदे गटाचे आमदार तथा मंत्री गुलाबराव पाटील यांना त्यांच्या बालेकिल्ल्यात मोठा धक्का बसला आहे. महाविकास आघाडी प्रणित धरणगाव शहर विकास आघाडीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार लीलाबाई चौधरी यांचा दणदणीत विजय झाला आहे. २४१७ मतांनी लिलाबाई चौधरी यांचा विजयी झाला आहे. महायुती प्रणित महाराष्ट्र विकास आघाडीच्या नगराध्यक्षपदाच्या वैशाली भावे यांचा पराभव झाला असून मतमोजणी संपली आहे.




