
सिंदखेडराजा – बुलढाण्यातील सिंदखेडराजा नगर परिषदेसाठी झालेल्या निवडणुकीत अजित पवार आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत चुरस झाली. त्यात राज्यातील सर्वात तरुण असलेल्या २१ वर्षीय सौरभ तायडे यांनी बाजी मारली.
सौरभ तायडे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून निवडणुकीच्या रिंगणात होते. प्रचारादरम्यान शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या कुठल्याही नेत्याची प्रचारसभा सिंदखेडराजा येथे झाली नव्हती, शिवसेनेचे नेते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सिंदखेडराजामध्ये सभा झाली होती. तरीही चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत सौरभ तायडे यांनी बाजी मारली.
या विजयाने तायडे हे राज्यातील सर्वात तरुण नगराध्यक्ष ठरले आहेत. कोणत्याही मोठ्या प्रचार सभांशिवाय त्यांनी हा विजय मिळवला आहे.
यापूर्वा जुन्या लोकप्रतिनिधी काहीही विकास केलेले नाही, त्यामुळे येत्या काळात मी गावातील पायाभूत सुविधाकडे जास्त लक्ष ठेवणार आहे. रस्ते, आरोग्य, पाणी या प्रश्नाकडे प्राधान्याने लक्ष देऊन या समस्या सोडविणार असल्याचे सौरभ तायडे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. सिंदखेडराजा येथील ऐतिहासिक वास्तूबाबतच्या विकास आराखड्याचे काय झाले याचा पाठपुरवठा करणार असल्याचे तायडे यांनी सांगितले.
सिंदखेडराजा नगर परिषदेच्या निवडणुकीत प्रमुख पक्षासह अन्य अपक्ष उमेदवार रिंगणात होते. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून सौरभ तायडे यांनी लढत देत नगराध्यक्षपदाची माळ गळ्यात पाडली. नुकतेच शिक्षण पूर्ण केलेल्या आणि नुकताच राजकारण आलेल्या या युवा नेत्याला गावातील मतदारांनी कौल दिला. नवीन विकासाचं व्हिजन घेऊन मी आता उतरणार असून ते व्हिजन शरद पवार यांना भेटून त्यांच्या माध्यमातून पूर्ण करण्याचा प्रयत्न मी करणार असल्याचे सौारभ तायडे यांनी सांगितले.
सिद्धी राजू वस्त्रे
मोहोळ नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदी अवघे २२ वर्ष वय असलेली सिद्धी राजू वस्त्रे शिवसेनेकडून विजयी झाली आहे. सिद्धी वस्त्रे राज्यातील दुसऱ्या सर्वात तरुण नगराध्यक्ष ठरली आहे. तत्कालीन मोहोळ ग्रामपंचायतीचे माजी सरपंच राहिलेल्या आजोबा कै. विश्वनाथ वस्त्रे यांचा राजकीय वारसा सिद्धी पुढे चालवीत आहे. त्यांच्या विजयानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.





