पुणे – पुण्यातील अल्पवयीन मुलाचे अपहरण करून, खेड शिवापूर परिसरात दगडाने ठेचून खून केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्या अल्पवयीन मूलाला संपवण्यापूर्वी शेवटची इच्छा विचारली, बियर व सिगारेटची पार्टी केली आणि खड्डाही खोदायला लावल्याचा प्रकार घडला आहे. पुण्यातील खेड शिवापूर डोंगर परिसरात ही घटना घडली आहे. खून करण्यापूर्वी आरोपींनी अमनसिंगला त्याची शेवटी इच्छा देखील विचारली. त्याने सिगारेट आणि बिअरची मागणी केली. त्यानंतर त्याला खड्डा खोदायला लावून त्यात पुरले आहे.
पुण्यातील विश्रांतवाडी भागातून हरवलेल्या, १७ वर्षीय अल्पवयीन मुलाचे अपहरण करून, चाकूने गळा चिरून, दगडाने ठेचून निर्घृण खून केल्याचे तपासात समोर आले आहे. खेड शिवापूर परिसरात मुलाचा मृतदेह सापडला आहे. या प्रकरणातील धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. आरोपी प्रथमेश आढळ आणि त्याच्या साथीदारांनी अमनसिंग गचंड या १७ वर्षीय अल्पवयीन तरूणाला संपवल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. खून करण्यापूर्वी आरोपींनी अमनसिंगला त्याची शेवटी इच्छा देखील विचारली. त्याने सिगारेट आणि बिअरची मागणी केली. त्यानंतर त्याला खड्डा खोदायला लावून त्यात पुरले आहे. परत बाहेर काढून सर्जिकल ब्लेडने आणि कोयत्याने त्याचा गळा चिरून, डोके दगडाने ठेचले. खेड शिवापूर येथील मंदिराच्या डोंगर परिसरात, ३ ते ४ तास हा खुनी खेळ सुरू होता, अशी माहिती समोर आली आहे.
अमनसिंग सुरेंद्रसिंह गचंड, टिंगरेनगर, विश्रांतवाडी असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी आत्तापर्यंत ५ जणांना ताब्यात घेतले असून, त्यामध्ये २ अल्पवयीन मुलांचाही समावेश आहे. तर सोशल मिडीयावरती मुलीच्या नावावरून मेसेज करून, अमनसिंग याला बोलावून घेणाऱ्या तरुणीसह ११ जणांविरुद्ध विश्रांतवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. प्रथमेश चिंधू आढळ , नागेश बालाजी धबाले रा. शिवणे या दोघांना अटक केली असून, न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे. २९ डिसेंबर रोजी हा प्रकार घडला आहे. बुधवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास अमनसिंग याचा मृतदेह, पोलिसांनी खेड शिवापूर परिसरातील डोंगरातून शोधून काढला, मृतदेहाची अवस्था बिकट झाली होती. त्याच पुरलेल्या खड्डयातून मृतदेह बाहेर काढला.
या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रथमेश आढळ आणि त्याच्या साथीदारांनी अतिशय थंड डोक्याने अमनसिंगचा खुन केल्याचे दिसून येत आहे. सप्टेंबर २०२६ मध्ये अमनसिंग आणि प्रथमेश यांच्यात वाद झाले होते. अमनसिंग याने केलेल्या मारहाणीत प्रथमेशच्या हाताला गंभीर जखम झाली होती. त्यामुळे तो त्याच्यावर चिडून होता. हा प्रकार घडल्यानंतर अमनसिंग विश्रांतवाडी परिसरात राहण्यास आला होता. परंतु, तो कोठे राहतो, हे प्रथमेशला माहिती नव्हते. मात्र, अमनसिंग सतत इन्स्टाग्रामवर ॲक्टिव्ह असल्याचे प्रथमेशने पाहिले. तो वेगवेगळे स्टेटस ठेवत असे. हा प्रकार प्रथमेशच्या मनाला लागला होता. त्यातूनच त्याने आपल्या साथीदारांना सोबत घेऊन, अमनसिंगला आपल्या परिसरात खेचून आणण्याची योजना तयार केली. त्यासाठी मैत्रिणीची मदत घेतली. तिला आरोपींनी सांगितले की, आम्ही अमनसिंगला फक्त धमकावणार आहोत. त्यामुळे तू आमच्यासाठी इन्स्टाग्रामवर त्याच्यासोबत मैत्री कर. अमनसिंग अलगद प्रथमेशने लावलेल्या सापळयात अडकला.
२९ डिसेंबरच्या दिवशी इन्स्टाग्रामवरील मैत्रिणीच्या सांगण्यावरून, अमनसिंग तिने सांगितलेल्या ठिकाणी तो दुचाकीवर आला. खेड शिवापूर येथील वर्तुमुख मंदिराच्या डोंगराचा तो परिसर. दोघांनी मंदिरात दर्शन घेतले. तेवढ्यात धबाले तेथे आला. तो अमनसिंगच्या खांद्यावर हात टाकून काही अंतर पुढे चालत गेल्यानंतर, दुचाकीवर बसवून त्याला पुढील डोंगरात घेऊन गेला. तेथे अगोदरच प्रथमेश आढळ आणि त्याचे इतर साथीदार आलेले होते.
प्रथमेश आणि त्याच्या साथीदारांनी अमनसिंगला शेवटची इच्छा काय? असे विचारले. त्या वेळी त्याने बिअर आणि सिगारेट मागितली. आरोपींनी बिअर, सिगारेट आणून त्याला दिली. त्यांनी अमनसिंगला स्वतःचा खड्डा खणायला लावला. त्याला खड्ड्यात पुरून टाकले. आरोपींच्या लक्षात आले त्यानंतर, आपण जर याला खड्ड्यात पुरले तर तो कदाचित बाहेर पडेल. त्यामुळे त्यांनी अमनसिंगला त्यातून बाहेर काढले. आरोपीपैकी एकाकडे सर्जिकल ब्लेड होते. त्याने अमनसिंगच्या गळयावर मारले. रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या. परंतु, वार खोलवर गेला नसल्याचे आरोपींच्या लक्षात आले. यानंतर त्याच्या गळयावर कोयत्याने वार करून, डोके दगडाने ठेचले.अमनसिंग मेल्याची खात्री झाल्यानंतर, आरोपींनी त्याचा मृतदेह त्याच खड्यात पुरून टाकून पळ काढला.
त्या सकाळी घरातून बाहेर पडलेला अमनसिंग, रात्री उशिरापर्यंत घरी आला नाही. त्याचा फोन तर लागत होता, पण, तो फोन उचलत जात नव्हता. त्याची आई अनिता यांनी सर्वत्र शोधाशोध केली. परंतु, त्याचा तपास लागला नाही. सकाळी त्याच्या आईने विश्रांतवाडी पोलिस ठाणे येथे तक्रार दिली. गुन्हे शाखा युनिट-३ च्या पथकाने तपास करीत असताना बेळगाव, कर्नाटक येथून मुख्य सूत्रधार प्रथमेश आढळ आणि त्याचा साथीदार या दोघांना आणि एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. चौकशीत प्रथमेशने पूर्वीच्या वादातून अमनसिंगचा साथीदारांच्या मदतीने, खून करून मृतदेह खेड शिवापूरच्या डोंगरात पुरल्याची कबुली दिली आहे. पुण्यात छोट्याशा वादातून एका अल्पवयीन मूलाला ,मारल्याची घटना पुणे शहरात घडल्याने, पुण्यात कायदा व सुव्यवस्थेचा, मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.




