मुंबई – भाजपची मदत घेवून शिंदेंनी एकीकृत शिवसेनेत फुट पाडली. आता एकनाथ शिंदेंवरच त्यांचे नगरसेवक फुुटण्याची वेळ आली कि काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण कि मुंबई महापालिकेचा निकाल लागल्यानंतर एकनाथ शिंदेंनी नव्यानेच निवडून आलेल्या सर्व २९ नगरसेवकांना मुंबईतील वांद्रे येथील ताज लँड्स एन्ड या पंचतारांकित हॉटेलमध्ये हलवलं आहे. जोपर्यंत महापौर निवड होत नाही तोपर्यंत या नगरसेवकांना हॉटेलमध्येच थांबण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत महायुती म्हणून एकत्र लढलेल्या भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेला काठावर बहुमत मिळालं. भाजपला ८९ तर शिवसेनेला केवळ २९ जागा मिळाल्या. शिंदेंच्या मदतीशिवाय भाजप सत्ता स्थापन करू शकत नाही. तर, ठाकरे देखील सत्ता स्थापन करण्याच्या तयारीत आहेत. कारण शिंदे सेनेच्या निवडून आलेल्या अनेक नगरसेवकांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत काम केलेलं आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेंना नगरसेवक फुटण्याची भीती सतावत आहे. यामुळेच शिंदे आपल्या २९ नगरसेवकांना पुढील तीन दिवस हॉटेलमध्ये ठेवणार आहे. शनिवारी संध्याकाळी सर्व नगरसेवकांना वांद्रे येथील ताज लँड्स एन्ड या पंचतारांकित हॉटेलमध्ये येण्याच्या सूचना देण्यात आल्या.
एकनाथ शिंदेंचं टेन्शन का वाढलं असावं? या प्रश्नाचं उत्तर देताना उद्धव ठाकरेंनी केलेलं अॅनालिसीसही विचार करण्यासारखंच म्हणावं लागेल. फोडून आलेली माणसं टिकवण्याचं टेन्शन, कदाचित त्यांना भाजपची भीती वाटतेय, असे उद्धव ठाकरे म्हणाले तर कुठलीही पळवापळवी होणार नाही, असे फडणवीसांनी स्पष्ट केले.
मॅजिक फिगर गाठली नसली तरी मुंबईत महापौर बसवण्याची उद्धव ठाकरेंची इच्छा कायम आहे, आणि ही इच्छा त्यांनी दिवसभरात दोनदा बोलून दाखवली. मुंबईत महायुतीचा महापौर बसणार हे निकालांवर स्पष्ट झाल. पण, गेल्या २५ वर्षांत पहिल्यांदाच मुंबईचा महापौर शिवसेनेचा नसणार आहे. भाजपनं मुंबई काबिज करण्याचं स्वप्न अखेर पूर्ण केलंय पण शिंदेंच्या मदतीनंच भाजपचा पहिला महापौर मुंबईत विराजमान होणार आहे. त्यामुळेच ठाकरेंपेक्षा कमी असले तरी शिंदेंचे २९ नगरसेवक गेमचेंजर ठरणार आहेत. म्हणूनच शिंदेंना आपल्या २९ नगरसेवकांना हॉटेलमध्ये मुक्कामासाठी ठेवलय.
शिंदेंकडून विजयी झालेले काही नगरसेवकांनी उद्धव ठाकरेंसोबत देखील काम केले आहे. त्यामुळे ऐनवेळी ठाकरे नगरसेवक फोडून सत्ता स्थापनेचा दावा करू शकतात, याची भीती देखील शिंदेंना असल्याची चर्चा आहे. त्यामुळेच ही काळजी घेत असल्याचे सांगितले जात आहे.
ठाकरेच नाही तर भाजपपासून देखील आपल्या नगरसेवकांना लांब ठेवण्यासाठी हा प्लॅन शिंदेंनी आखल्याचे सांगितले जात आहे. भाजपचा महापौर शिंदेंच्या नगरसेवकांशिवाय शक्य नाही. त्यामुळे भाजपसोबत बोलणी करून मुंबई महापालिकेत सत्तेत मोठा वाटा मिळवण्यासाठी ही खेळी असल्याचे बोलले जात आहे.





