कॉपी आढळल्यास परीक्षा केंद्राची मान्यता रद्द! राज्य शिक्षण मंडळाचा कडक इशारा

SHARE:

पुणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बोर्डाच्या परीक्षेत पारदर्शकता आणण्यासाठी एक अत्यंत कठोर पाऊल उचलले आहे. परीक्षेदरम्यान एखाद्या केंद्रावर विद्यार्थी कॉपी करताना किंवा गैरप्रकार करताना आढळल्यास, त्या केंद्राची मान्यता रद्द करण्यात येईल, असा इशारा राज्य शिक्षण मंडळाने दिला आहे.
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षांची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली असून, बारावीची परीक्षा १० फेबुवारीपासून, तर दहावीची परीक्षा २० फेबुवारीपासून सुरू होणार आहे. यंदा बारावीच्या परीक्षेला सुमारे १५ लाख ३२ हजार, तर दहावीच्या परीक्षेला १६ लाख १४  हजार विद्यार्थी बसणार आहेत. बारावीची परीक्षा राज्यातील ३,३८७  केंद्रांवर, तर दहावीची परीक्षा ५,१११  केंद्रांवर घेतली जाणार आहे.

बारावीच्या आणि दहावीच्या परीक्षांसाठी मंडळाने आतापासूनच कंबर कसली आहे. यंदा सर्वच केंद्रांवर आणि प्रत्येक वर्गखोलीत सीसीटीव्ही कॅमेरे लावणे अनिवार्य करण्यात आले आहे. याशिवाय, ज्या केंद्रांवर गेल्या ५  वर्षांत कॉपीच्या घटना घडल्या आहेत, तिथे दुसऱ्या शाळांमधील शिक्षकांची पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती केली जाणार आहे. भरारी पथकांसोबतच आता ड्रोन आणि व्हिडिओ कॅमेऱ्यांद्वारेही संवेदनशील केंद्रांवर लक्ष ठेवले जाणार आहे. संशयास्पद हालचाली आढळल्यास तत्काळ कारवाई करण्यात येईल, असे राज्य मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी स्पष्ट केले.

गेल्या वर्षी दहावी-बारावीच्या परीक्षांमध्ये गैरप्रकार झालेल्या १०७ परीक्षा केंद्रांची मान्यता आधीच रद्द करण्यात आली असून, यंदा कोणत्याही प्रकारच्या गैरप्रकारांना थारा दिला जाणार नसल्याचे कुलकर्णी यांनी स्पष्ट केले आहे. राज्यभर कॉपीमुक्त अभियान प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या अंतर्गत सध्या जनजागृती सप्ताह साजरा करण्यात येत असून, विद्यार्थ्यांमध्ये प्रामाणिकपणा, नैतिकता आणि परीक्षेचे गांभीर्य रुजविण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. शाळा व महाविद्यालयांमध्ये जनजागृती केली जात आहे.

राज्यस्तरीय समितीसोबतच जिल्हास्तरीय दक्षता समित्या आणि भरारी पथके सक्रिय राहणार असून, ही पथके अचानक भेटी देऊन परीक्षा केंद्रांची तपासणी करणार आहेत. पोलिस प्रशासन, शिक्षण विभाग आणि जिल्हा प्रशासन यांच्या समन्वयातून संपूर्ण परीक्षा कालावधीत कडक देखरेख ठेवण्यात येणार आहे, असे कुलकर्णी यांनी सांगितले.

Leave a Comment

अधिक वाचा