कोल्हापूर – निवडणूक आयोग ईव्हीएम हॅक केले जाऊ शकत नाही किंवा ईव्हीएममध्ये गडबड केली जाऊ शकत नाही, असा कितीही दावा करत असले तरी आता विरोधी पक्षाच्या नेत्यांपासून सर्वसामान्य जनतेचाही ईव्हीएमवरून विश्वास उडाला आहे. नागरिक आता ईव्हीएमवर आपला राग व्यक्त करत आहेत. अशीच एक घटना कोल्हापुरातून समोर आली आहे. जिल्हातील एका निवडणूक केंंदावर एका मतदाराने बॅलेट पेपरवर निवडणूका घ्या, असे म्हणत ईव्हीएम जमीनीवर आपटून फोडले आहे. जयवंत वायदंडे असं या मतदाराचं नाव असून तो ठाकरे सेनेचा पदाधिकारी आहे.
जिल्हा परिषदेच्या ६८ गटासाठी, पंचायत समितीच्या १३६ गणासाठी शनिवारी सकाळी मतदानाला सुरुवात झाली. ग्रामीण भागात सकाळी कामांची धांदल उडालेली असते. हे काम लवकर आवरून मतदार सकाळपासूनच केंद्रावर मतदार पोहोचले होते. त्यामुळे अनेक केंद्रांवर मतदारांची गर्दी दिसत होती. दरम्यान कोल्हापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी शांततेत मतदान प्रक्रिया सुरू असताना भुदरगड तालुक्यातील नाधवडे येथे शनिवारी दुपारी एकच खळबळ उडाली. निवडणुका बॅलेट पेपरवरच घेतल्या पाहिजेत, अशी मागणी करत एका मतदाराने चक्क ईव्हीएम मशीन जमिनीवर आपटून फोडले.
शिवसेना ठाकरे गटाच्या ग्राहक सेनेचे जिल्हाप्रमुख जयवंत वायदंडे यांनी मतदान केल्यानंतर ईव्हीएम मशीन जमिनीवर आपटून निवडणूक आयोगासह शासन व निवडणूक विभागाचा निषेध व्यक्त केला. जयवंत वायदंडे यांनी अचानक केलेल्या या कृतीमुळे मतदान केंद्रावर उपस्थित मतदारांमध्ये गोंधळ उडाला आणि काही काळ मतदान प्रक्रिया ठप्प झाली. मतदान केंद्रावर असलेल्या कर्मचारी व मतदारांमध्ये क्षणिक तणाव निर्माण झाला होता. मतदान बॅलेट पेपरवर घेण्यात यावे या मागणीसाठी आपण हे कृत्य केल्याचे वायदंडे यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.
घटनेची माहिती मिळताच बंदोबस्तावर असलेले पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलीस उपनिरीक्षक योगेश गोरे यांनी संबंधित व्यक्तीस ताब्यात घेतले. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणल्यानंतर काही वेळातच मतदान प्रक्रिया पुन्हा सुरळीतपणे सुरू करण्यात आली. दरम्यान, निवडणूक प्रक्रियेत अडथळा निर्माण केल्याप्रकरणी संबंधितावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी हरेश सुळ यांनी दिली. या प्रकरणी जयवंत वायदंडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राज्यातल्या जिल्हा परिषद निवडणूकीच्या धामधूमीत तासगाव तालुक्यातील बलगवडे आणि परभणीच्या सेलू तालुक्यातील बोथ गावाने मतदानावर बहिष्कार टाकला. बलगवडे गावातील गायरान जमिनीवर सोलर प्रकल्पासाठी झालेल्या वृक्षतोडीच्या निषेधार्थ मतदारांनी मतदानावर बहिष्काराचा निर्णय घेतला. तर बोथ गावाने रस्ता आणि नदीवरच्या पुलाच्या मागणीसाठी मतदान न करण्याचा निर्णय घेतला. दोन्ही गावातल्या गावकऱ्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न केले गेले जे अयशस्वी ठरले.





