मुंबई – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानात (उमेद) कार्यरत असणाऱ्या सर्व कर्मचार्यांच्या हितासाठी भारतीय स्टेट बँक सोबत आज सामंजस्य करार केला आहे. या करारामुळे कर्मचाऱ्यांनी भारतीय स्टेट बँक मध्ये पगाराचे बचत खाते उघडल्यास अपघात विमा, आरोग्य विमा आणि इतर तत्सम फायदे मिळणार आहेत. उमेद अभियानात कार्यरत सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी या योजनेचा फायदा घ्यावा असे आवाहन अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश सागर यांनी केले आहे.
भारतीय स्टेट बँकेने कार्पोरेट वेतन बचत खाते धारकांसाठी योजना तयार केली आहे. या योजनेंतर्गत आज अभियानाचे वरिष्ठ अधिकारी आणि बँकेचे वरिष्ठ अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत सामंजस्य करार संपन्न झाला. या करारामुळे बँकेच्या कार्पोरेट यादीमध्ये अभियानाचे अधिकारी आणि कर्मचारी यांचा समावेश होणार आहे.
ज्या कर्मचाऱ्यांचे वेतन बचत खाते बँकेत असेल त्यांना ४० लाखापासून ते १ कोटी १० लाखापर्यंत वैयक्तिक अपघात विमा संरक्षण कवच मिळू शकणार आहे. अल्प दारामध्ये आरोग्य विमा उपलब्ध होऊ शकणार आहे, विशेष प्रकारचे डेबिट कार्ड मिळणार आहे, अमेझोन प्राईम या OTT चे पाच वर्षासाठी मोफत सुविधा मिळणार आहे, गृहकर्जासाठी सुद्धा व्याजदरात सवलत मिळू शकणार आहे, वेतन खात्यामध्ये किमान रक्कम शिल्लक ठेवण्याची अट लागू नसेल यासह अनेक प्रकारचे फायदे मिळू शकणार आहेत.
या योजनेच्या सविस्तर माहितीसाठी आणि फायदे समजून घेण्यासाठी भारतीय स्टेट बँकेच्या जवळच्या शाखेमध्ये प्रत्यक्ष भेट द्यावी अये आवाहन उमेद चे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश सागर यांनी केले आहे.




