अजित पवारांचे मुंबई विमानतळावरील सीसीटीव्ही फुटेज देण्यास केंद्राचा नकार; केंद्र सरकारचा माहिती अधिकारात प्रकार उघड

SHARE:

मुंबई – अजित पवारांच्या विमान अपघातावरून विरोधी पक्षासह अनेक नेत्यांनी शंका उपस्थित केली आहे. या अपघातावर अजित पवार गटाचे आमदार अमोर मिटकरी यांच्यासह शरद पवार गटाचे आमदार आणि अजित पवार यांचे पुतणे रोहित पवार सातत्याने संशय व्यक्त करत आहेत. इतकेच नाही तर राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी देखील शंका व्यक्त केली असून सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. दरम्यान आता अजित पवार यांचे मुंबई विमानतळावरील सीसीटीव्ही फुुुटेज देण्यास केंद्रीय नागरी सुरक्षा वाहतूक विभागाने स्पष्ट नकार दिला आहे. यामुळे अपघाताच्या संशयाची सुई अधिक गडद झाली असून राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चांना उधाण आले आहे.

माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन यादव यांनी केंद्रीय नागरी सुरक्षा वाहतूक विभागाकडे २८ जानेवारी २०२६ रोजीचे मुंबई विमानतळावरील पहाटे सहा ते सकाळी नऊ दरम्यानचे सीसीटीव्ही फुटेज देण्यात यावे अशी मागणी १० फेब्रुवारी रोजी माहिती अधिकारात केली होती. मात्र हे सीसीटीव्ही फुटेज देण्यास केंद्रीय नागरी सुरक्षा वाहतूक विभागाने असमर्थता दर्शवत अर्ज फेटाळून लावला आहे. नितीन यादव यांच असं म्हणणं आहे की अनेक वेळा या संदर्भात मी पाठपुरावा केल्यानंतर केंद्रीय नागरी सुरक्षा वाहतूक विभागाने मागवलेली माहिती नाकारली आहे.

अर्ज फेटाळल्यानंतर नितीन यादव यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. वारंवार पाठपुरावा करूनही महत्त्वाची माहिती नाकारली जात आहे. जर काही लपवण्यासारखे नसेल, तर फुटेज का दिले जात नाही? यामुळे अजितदादांचा खरोखरच घातपात झाला का? हा प्रश्न आता अधिक गंभीर झाला आहे, असे यादव यांनी म्हटले आहे.
अजित पवार यांच्या निधनानंतर अनेकांकडून वेगवेगळे दावे केले जात आहेत. रोहित पवार यांनी तर पत्रकार परिषद घेऊन थेट शंका उपस्थित केली होती. रोहित पवार यांनी अजित पवार हे अपघाताच्या आधी म्हणजेच २७ जानेवारीलाच रस्ते मार्गाने बारामतीला जाणार होते.

पण एका बड्या नेत्याचा फोन आला. त्या नेत्याने सांगितलेल्या एका फाईलवर स्वाक्षरी करायची होती. ती फाईल मंत्रालयात होती. त्यामुळे ती फाईल मंत्रालयाच्या कार्यालयातून देवगिरी बंगल्यावर आणण्यास उशिर झाला. यामुळे अजित पवार यांचा उशिर झाल्याने रस्ते मार्गाने बारामतीला जाण्याचा निर्णय बदलला, असा दावा रोहित पवार यांनी केला होता.

याशिवाय अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांची देखील अजित पवार यांच्या विमान अपघातावरून शंका उपस्थित केली आहे. अजितदादांच्या विमानाची शेपटी सुस्थितीत, तरीही ब्लॅक बॉक्स कसा जळाला? असा सवाल अमोल मिटकरी यांनी उपस्थित केला आहे. विमानाचा ब्लॅक बॉक्स हा विमानाच्या शेपटीमध्ये असतो. त्यामुळे अपघात झाल्यानंतरही विमानाची शेपटी पूर्णपणे जळत नाही. त्यामुळंच ब्लॅक बॉक्स विमानाच्या शेपटीमध्ये ठेवला जातो. अपघातात विमानाची शेपटी अजिबात जळालेली नाही. त्यामुळं ब्लॅक बॉक्स जळण्याचा संबंध येत नाही. ब्लॅक बॉक्स कितीही आग लागली तरीही जळून खाक होत नाही. असे मिटकरी यांनी म्हटले आहे.

अपघातानंतर लागलेली आग जर ११००सी पेक्षा जास्त किंवा ६० मिनिटांपेक्षा जास्त काळ टिकली, तर आतले घटक खराब होऊ शकतात. ३,४०० जीएसपेक्षा जास्त धक्का बसल्यास यंत्र पूर्णपणे नष्ट होऊ शकते. खोल समुद्रात दीर्घकाळ पाण्यात राहिल्यास गंज होऊ शकतो. त्यामुळे डेटा नष्ट होण्याची शक्यता असते. मात्र, ब्लॅक बॉक्स ३० दिवसांपर्यंत उच्चदाब सहन करण्यासाठी डिझाइन केलेला असतो, असे मिटकरी यांनी म्हटले आहे.

या प्रकरणात राजकारण तापलेलं असताना केंद्रीय नागरी सुरक्षा व विमान वाहतूक विभागाने अजित पवारांच्या अपघाताच्या दिवसाचं विमानतळाचं सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार दिल्यामुळे या मुद्द्यावरुन आणखी राजकारण तापण्याची शक्यता आहे. तसेच एका महत्त्वाच्या व्यक्तीच्या संदर्भातील सीसीटीव्ही फुटेज नाकारणे हे अत्यंत धक्कादायक असून केंद्राच्या या निर्णयामुळे हा घातपात असण्याच्या शंकेला अधिक बळ मिळत आहे.

Leave a Comment

अधिक वाचा