मुंबई – भाजपा सरकार राज्य बुडवायला निघाले आहे, व महाराष्ट्राचा भ्रष्टाचारात पहिला नंबर आहे, असे शिवसेना ठाकरेगटाचे आमदार भास्कर जाधव यांनी म्हटले आहे. राज्यातील भाजपा सरकार इतके लबाड आहे की, त्यांनी राज्यपालांकडूनही खोट्या गोष्टी बोलवून घेतल्या आहेत. राज्यातील लाडक्या बहिणींनाही भाजपा सरकारने फसवले आहे, असा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी राज्यातील भाजपा सरकारवर केला आहे.
भाजपा सरकारकडे राज्यातील तरुणांसाठी, आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी, महिलांसाठी काय केले आहे? राज्यपालांच्या भाषणात महत्वाचे मुद्दे येणे गरजेचे होते. तसेच राज्यातील लाडकी बहिण योजनेच्या मुद्यावरुन देखील जाधव यांनी भाजपा सरकारवर जोरदार टीका केली आहे. राज्यात निवडणूका जवळ आल्या की, मोठ्या मोठ्या घोषणांचा पाऊस नेहमीच पडतो, पण अंमलबजावणीचा पूर्णपणे दुष्काळ आहे. राज्यपालांकडून भाजपा सरकारने संभाषण करून घेतले आहे.
राज्यात आतापर्यंत २५ लाख तरुणांनी बेरोजगारीची नोंदणी केलेली आहे, हा राज्यातील सरकारी आकडा आहे. एका वर्षात ७ पटीने वाढ झाली आहे. राज्यातील भाजपा सरकार कसले दावोसला करार करत आहे? सरळसरळ राज्यातील तरुणांना सरकार फसवत आहे असे भास्कर जाधव यांनी म्हटले आहे. राज्यात बेरोजगारीचा दर वाढत आहे. ही प्रगती मानायची का? राज्यातील ग्रामीण भागात बेरोजगारीचे प्रमाण रोज वाढत चालले आहे. राज्यातील भाजपा सरकारने रोजगार वाढवला की बेरोजगारी वाढवली? ही बेकारी अशीच वाढणार आहे का, असे अनेक प्रश्न भास्कर जाधव यांनी भाजपा सरकारला विचारले आहेत.
भाजपा सरकार राज्यात कोणत्याही नवीन घोषणा करत आहे, व जगाला दाखवण्यासाठी त्याचे इव्हेंट करत आहे. टाटा, वेदांत, बल्क ड्रग पार्क असे मोठे प्रकल्प या राज्यात आलेले आणि कोणाला तरी जी हुजूर करावे लागत आहे, म्हणून हे प्रकल्प गुजरातला पाठवले आहेत, अशी टीका जाधव यांनी भाजपा सरकारवर केली आहे. ज्या योजना राज्यात नवीन आणल्या होत्या त्याच काय झाले आहे, त्याचे आधी सांगा. नवीन घोषणा करून राज्यातील भाजपा सरकार सरळ सरळ जनतेला फसवत आहे. २०२४ मध्ये लाडका भाऊ योजना आणली ,राज्यात १० लाख तरुणांना नोकरीं देणार असे सांगितले ,या घोषणेचे, आश्वासनाचे काय झाले? माझ्याकडे सर्व व्हिडिओ आहेत. आज राज्यात तरूण मुले नोकरीसाठी, रोजगारासाठी फिरत आहेत. भाजपा सरकारला लाडकं काही नाही, तर फक्त राज्यातील सत्तेची खुर्ची हवी होती. आता सत्तेची खुर्ची मिळाली, आता लाडका भाऊ पण गेला आणि बहिण पण गेली अशी टीका आमदार भास्कर जाधव यांनी भाजपा सरकारवर केली आहे.
राज्यातील एक रुपयाच्या पीक विम्याचे काय झाले? एक रुपयाच्या नावाखाली १२ हजार कोटी मिळवले आहेत. २०२३ मधील भाषणाचा व्हिडिओ माझ्याकडे आहे. राज्यात ७५ हजार नोकर भरती करणार असल्याचे बोलले होते. त्याच काय झाले? राज्यात किती जणांना भाजपा सरकारने नोकऱ्या दिल्या आहेत? हे एकदा राज्यातील सर्वसामान्य जनतेला सांगा असे भास्कर जाधव म्हणाले आहेत. पण त्या एक रुपयाच्या विम्याच्या नावाखाली १२ हजार कोटी रुपये तुम्ही मिळवले आहेत, परंतू राज्यातील शेतकऱ्याला 12 रुपये सुद्धा आले नाहीत अशी टीका भास्कर जाधव यांनी केली आहे.
शिवाजी महाराजांचे स्मारक समुद्रामध्ये उभा करण्याचे काय झाले? राज्यात किती निवडणुका होऊन गेल्या. राज्याची या भाजपा सरकारमूळे प्रगती होणार नाही. राज्यातील हे भाजपा सरकार राज्यच बुडवायला निघालेले आहे. महाराष्ट्राचा भ्रष्टाचारामध्ये देशात पहिला नंबर आला आहे, असे भास्कर जाधव म्हणाले आहेत. आता ईव्हीएम मशीन बाजूला गेली आहे, राज्यात आता प्रत्येक मताला पैसे दिले जात आहेत. भाजपा सरकारने राज्यात पैसे वाटून बिनविरोध निवडणूक करण्यासाठी नवीन योजना आणली आहे. राज्यात लोकशाही टिकवली पाहिजे, कारण लोकशाही देशाला वाचवू शकते, असे आमदार भास्कर जाधव यांनी म्हटले आहे.





