‘अपना काम बनता, अभी भाड़ में जाए जनता’ अशी शासनाची वागणूक; लाडकी बहिण योजनेवरून राष्ट्रवादी (शप) च्या नेत्या रोहिणी खडसेंंची टीका

SHARE:

मुंबई – लोकसभा निवडणूकीत महायूती सरकारला जोरदार फटका बसला. विधानसभेला हा फटका बसू नये म्हणून ऐन निवडणूकीच्या तोंडावर महायूती सरकारे लाडकी बहिण योजना सुरू केली आणि सरसकट लाभ देणे सुरू केले. या योजनेत घोटाळा झाल्यानंतर लाभार्थी महिलांची पडताळणी करण्यात आली. त्यात तब्बल १.०५ कोटी लाडक्या बहिणींना अपात्र ठरवण्यात आले. यावरून शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी सरकारवर जोरदार निशाना साधला आहे. शासनाची ही वागणूक म्हणजे ‘अपना काम बनता, अभी भाड़ में जाए जनता’ अशी भूमिका आहे, अशी टीका खडसेंनी केली.

रोहिणी खडसे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की आता क्षणाला मी ही पोस्ट करत असताना विधिमंडळात महिला शेतकऱ्यांचे सक्षमीकरण या विषयावर चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री, संत्री, तज्ज्ञ मंडळी यावर भाषणं ठोकतील आणि दुसरीकडे सरकारने आतापर्यंत तब्बल १.०५ कोटी लाडक्या बहिणींना अपात्र ठरवले आहे. सरकारचा हा किती दुटप्पीपणा आहे? असा टोला रोहिणी खडसे यांनी लगावला.

२०२४  च्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जेव्हा ही योजना सुरू केली होती तेव्हा सुरुवातीची लाभार्थी संख्या २.५३ कोटी होती. तर सुरुवातीचे बजेट ४५,००० कोटी रुपये होते. तपासणीनंतर संभाव्य पात्र लाभार्थी हे १,४८,६०,०००  इतके राहिले आहे. २०२६-२७  बजेटमध्ये यासाठी २६,५०० कोटींची तरतूद करण्यात आली. तर संभाव्य अपात्र महिला या सुमारे १.०५ कोटी ठरल्या आहे. म्हणजे निवडणूक होती तेव्हा शासनाने सरसकट लाडक्या बहिणींना पैसे दिले. निवडणुका जिंकल्या तर हळूहळू लाडक्या बहिणींवरचे प्रेम कमी होऊ लागले. असा कटाक्ष त्यांनी केला.

सुरुवातीला कमी कागदपत्रांच्या आधारे मोठ्या संख्येने महिलांनी अर्ज केले आणि त्यांना काही महिने लाभही मिळाला. मात्र, डिसेंबर २०२४ पासून पात्रतेची सविस्तर तपासणी सुरू करण्यात आली. यावरून काही दिवसांपूर्वी रोहिणी खडसे यांनी सरकारवर निशाणा साधला. महायुती सरकारनं लाडक्या बहिण योजनेवर मत घेण्याचं काम केलं आणि आता लाडक्या बहिणी सावत्र व्हायला लागलेल्या आहेत. कारण लाडक्या बहिणींची सरकारकडून चौकशी केली जात आहे.

Leave a Comment

अधिक वाचा