घटनात्मक पदांविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणात शरद पवार गटाचे पदाधिकारी सूर्यकांत मोरे यांना शिक्षा

SHARE:

मुंबई – घटनात्मक पदांविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणात शरद पवार गटाचे पदाधिकारी सूर्यकांत मोरे यांना कारावासाची शिक्षा देण्यात आली आहे. या पदाधिकार्याला ३० दिवसांच्या कारावासाची शिक्षा देण्यात आली आहे. घटनात्मक पदांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणे चुकीचे आहे. याप्रकरणात विशेषाधिकार समितीने कठोर निर्णय दिला आहे. विधान परिषदेची प्रतिष्ठा खराब करणे आणि घटनात्मक पदांविषयी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका करणे यावरून अहिल्यानगरमधील शरद पवार पक्षाचे पदाधिकारी सूर्यकांत मोरे यांना महागात पडले आहे.

विधान परिषद विशेषाधिकार समितीने मोरे यांना ३० दिवसांच्या दिवाणी कारावासाची शिक्षा देण्याची महत्त्वपूर्ण शिफारस केली आहे. विशेषाधिकार समितीचे अध्यक्ष प्रसाद लाड यांनी या संदर्भातील १६७ पानांचा अहवाल मंगळवारी सभागृहात सादर केला आहे. २३ नोव्हेंबर २०२५ या दिवशी जामखेड येथील नगरपरिषद निवडणुकीच्या भाषणात सूर्यकांत मोरे यांनी विधान परिषद, सभागृहाची रचना, कायदेनिर्मिती प्रक्रिया आणि सभापती यांच्याविषयी वादग्रस्त वक्व्ये केली होती.

दि. ९  डिसेंबर २०२५ या दिवशी हे प्रकरण विशेषाधिकार समितीकडे सोपवण्यात आले होते. समितीने ६ बैठका घेऊन या प्रकरणाचा अभ्यास केला आहे. समितीचे अध्यक्ष प्रसाद लाड म्हणाले की, सूर्यकांत मोरे यांनी केलेले कृत्य केवळ सभागृहाचा अपमान नाही, तर या सभागृहात पूर्वी कामकाज केलेल्या महापुरूषांचा आणि संविधानाचाही हा अपमान आहे.

अशा कृत्यांमुळे जनमानसाचा घटनात्मक संस्थांवरील विश्वास उडू शकतो. भविष्यात अशा प्रकारचा गुन्हा कोणाकडूनही घडू नये आणि समाजात एक जरब बसावी, या हेतूने समितीने ही शिक्षा सुचवली आहे. भारतीय न्याय संहितेनुसार अशा प्रकरणात 2 वर्षांपर्यंतच्या कारावासाचे प्रावधान असले, तरी समितीने ३० दिवसांची शिक्षा दिली आहे.

Leave a Comment

अधिक वाचा