मुल काय आहे.? मूल आहे मायेचा स्पर्श, ममतेची ऊब, सळसळते चैतन्य, अविरत हालचाल, जागे कुतूहल आणि भावनांचा मुक्त आविष्कार! नाही स्पर्धा, नाही हेवा. बालक हा तर सर्वांच्या जीवाभावाच्या ठेवा. पण त्यांचे भविष्य घडवण्याच्या नादात कधी कधी आपल्या हातून पडतो त्यांच्या भावविश्वाला तडा. मग… हिरमूसतात ती मनातल्या मनात. मिटत जातात आतल्या आत. अभ्यास, वेळापत्रक, स्पर्धा, शिस्त, नियम, बंधने यांचे एकामागून एक पडतात ओरखडे. त्याचे पुढे तयार होतात व्रण. हळूहळू संपुष्टात येऊ लागतं त्यांचं बालपण, मुलांचे व्यक्तिमत्त्व घडण्यास जन्मापासून सुरूवात होते.
मुलांच्या मेंदूची वाढ पाचव्या वर्षांपर्यंत जलद होते. या काळात आईच मुलांचे संगोपन करते. आईच्या सहवासात मुलाला सुरक्षित वाटते. त्यामुळे ते बोलू शकत नसले तरी भावनिक आणि शारीरिक हालचालींनी मनातले भाव व्यक्त करू शकते. आई दिसताच ते हसते, खूष होते. म्हणजेच आई विविध प्रकारच्या अनुभवातून मुलाला ज्ञान देत असते. मूल थोडे मोठे झाले की आई त्याला आणखी मोठे अनुभव देऊ शकते.
कारण आईचे स्वयंपाकघर ही एक भव्य प्रयोगशाळाच असते.
1) सकस आहार कोणता ?
2) पचायला जड आणि हलके अन्नपदार्थ कोणते ?
3) भाज्या चिरण्यापूर्वीच कां धुवाव्या ?
वरील प्रश्नांच्या अनुरोधाने स्त्रिया स्वयंपाकघरात काम करतात हे सर्व प्रश्न आरोग्याशी निगडित असतात.
1) घरातील ओला, कोरडा कचरा याची विल्हेवाट लावणे, कंपोस्ट खत निर्मिती कशी करावी.
2) घरातील भाज्या धुतल्याचे पाणी झाडांना घालायचे.
3) घरातील नळाची धार मोठी करण्याऐवजी छोटी ठेवल्यास पाण्याची बचत कशी होईल ? या विविध अनुभवातून बालक शिकेल.
4) दररोज सकाळी मुलांसमोर वर्तमानपत्र वाचा. आलेल्या बातम्यांची चर्चा मुलांसमोर करा. त्याला वर्तमानपत्र वाचण्याची आवड निर्माण होईल.
5) मुलांसमोर एक दिवस दुध विरजण घाला
दुधापासून दही होणे ही. आंबवण्याची प्रक्रिया आहे . या क्रियेला विशिष्ट वेळ व तापमान लागतं, हे त्याला कळू द्या.
6) घरी मोट भिजवा. तिला मोड आणून उसळ करा. बीजांकुरण काय असते, या क्रियेला ऊब आणि ओलावा हवा, हे मुलाला कळू द्या.
7) पावसाळ्यात आंब्याच्या कोयी मधून नुकत्याच बाहेर आलेल्या रोपाला असलेली पाने लाल तर रोप मोठे झाले की ती पाने हिरवी होतात, हा अनुभव त्याला द्या.
8) आंब्याच्या रोपांची कोय जमिनीवर झोपते आणि रोप वर जाते. तर चिंचेच्या बी पासून रोपांचे एक टोक जमिनीत तर दुसरे टोक वर जाते आणि बी त्या टोकावर चढून बसते, हे त्याला दाखवा.
9) मिठाई घ्या डब्यातून मुंग्यांच्या घराच्या छिद्रापर्यंत मुंग्यांची रांग आपण पाहतो. यातून शिस्तीचा धडा मिळतो.
10) मुलाला एक दिवस दुधाचा गरम ग्लास हातात द्या. आता तेच दुध बशीत ओता. पृष्ठभाग वाढल्याने पदार्थ लवकर थंड होतो, हा अनुभव द्या.
छतावर पाल सरपटते. पण छतावर चालतांना ती खाली पडत नाही. साधा एक पुठ्ठा फेविकॉल ने त्याला चिकटवला तरी तो चिकटे पर्यंत धरून ठेवावा लागतो. असे का? याचा विचार त्याला करू द्या. न्यूटन झाडाखाली बसला असताना सफरचंद खाली पडले आणि गुरूत्वाकर्षणाचा शोध लागला. कारण ‘का?’ या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी त्याने धडपड केली. म्हणून मुलांना निरीक्षण करण्याची सवय लावणे गरजेचे आहे.
पालकांकडून मुलाला स्पर्धात्मक जीवनाची ओळख करून देताना मुलांच्या संवेदनक्षम मनावर त्यांचे किती खोल परिणाम होतात, याची कल्पना पालकांना नसते. त्यामुळे मुलांच्या आत्महत्येमागे अपयशाबरोबर घरचे वातावरण तितकेच कारणीभूत असते. मुलांची त्यांच्या मित्रांशी होणारी तुलना मन अधिकच अस्थिर करते. तेव्हा घरातील वातावरण व शाळा या दोन्ही गोष्टी मुलांच्या कलागुणांना व सकारात्मक विचारांना चालना देणाऱ्या असाव्यात. सध्या स्पर्धेशिवाय पर्याय नसला तरी तू तुझ्या शक्तीनुसार प्रयत्न कर असा धीर मुलाला द्या. तेव्हा शिस्त हवी, पण जाचणारी नको. बंधन हवे, पण काचणारे नको. फळा जसा शाळेत शिक्षकांचा मित्र असतो, तसा घरात तो पालकांचा मित्र बनू शकेल. लहान मुलांमध्ये अनुकरण ही सामान्य प्रवृत्ती असते. घरामध्ये आई- वडील, मोठी भावंडे यांचे तर शाळेत शिक्षक – शिक्षिकेच्या हावभावाचे आवाजाचे कृतीचे अनुकरण ही मुले करीत असतात. मुलांच्या या अनुकरण प्रवृत्तीला पूरक स्थिती उपलब्ध करून देणे ही शाळेबरोबर पालकांचीही जबाबदारी असते. मुलांना शाळा शाळा खेळून, घरातल्या भिंती रंगवायला फार आवडते. आपले सवंगडी जमवून अंक, अक्षरे लिहिणे, चित्र काढणे हे मुलांना खूप आवडते. त्याकरता एक छोटा फळा पालकांनी घरी आणल्यास गणिताच्या क्रिया, वळणदार अक्षर, चित्रे, पाढे लिहिणे, सुविचार लिहिणे यामुळे मुलांच्या उपनत गुणांना वाव मिळून पालकांचा शालेय शिक्षणात
सहभाग मिळेल, पण यासाठी आवश्यक आहे…..
1) पालकांच्या मनाची तयारी
2) दैनंदिन जीवनातून थोडा वेळ काढणे.
3) वाचन, अभ्यास, निरीक्षण.
4) मुलांशी सुसंवाद.
5) सर्वच गोष्टींचे लाड न पुरविता
काही बाबतीत नकार पचविण्याची ताकद निर्माण करणे, तेव्हा जरा आठवून आपल्या लहानपणीच्या आठवणी. त्यातले नावडते आता तरी वगळू या.
लेखक –
सौ. विभा प्रल्हाद भुसारी
माजी मुख्याध्यापिका, नागपूर.
Author: सौं. विभा प्रल्हाद भुसारी
लेखिका एक उत्कृष्ट शिक्षिका, मुख्याध्यापिका, विद्यार्थीनी मार्गदर्शिका, कवयित्री, लेखिका (सामाजिक, शैक्षणिक लेखन) आहेत. सोबतच अखिल भारतीय अंधश्रध्दा निर्मूलन समिती (महिलांची) नागपूर जिल्हा अध्यक्षा म्हणून समाजात वाईट प्रथा व परंपरा बंद करण्याचे सुद्धा अलौकिक कार्य त्या करत असतात. त्याच बरोबर विविध सामाजिक संघटनेच्या माध्यमातून समाज जागृतीचे कार्य निरंतर त्या करत असतात. आपले प्रगल्भ व विद्रोही विचार सा. रयत रक्षक व रयत रक्षक न्यूज, महाराष्ट्र च्या माध्यमातून आमच्या वाचकांसाठी नेहमी मांडत असतात.





