संत कृपा झाली l इमारत फळा आली ll

SHARE:

तुका म्हणे, शोभा सांगे…

       महाराष्ट्राला  ज्ञानेश्वरांपासून तुकारामापर्यंतमोठी संत परंपरा लाभलेली आहे. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, यासारख्या साध्या विधानाला वचनाचा दर्जा प्राप्त व्हावा, इतकी यथार्थता या साध्या विधानात दडलेली आहे. महाराष्ट्रास मराठी भाषिक संतांची आणि मराठी संत वांड्मयाची फार मोठी परंपरा लाभलेली आहे.

ज्ञानेश्वरांच्या पूर्वीही वारकरी पंथ आणि पंढरपूरच्या वारीची प्रथा होती. संतांनी समाजाला जगण्याचा मार्ग दाखवला. भक्तीच्या  प्रेरणा दिल्या. मरगळ आलेल्या समाजात चैतन्य ओतले. मुळातल्या नाथ पंथीय ज्ञानेश्वरांनी वारकरी पंथाच्या बळावर महाराष्ट्रात पुरते  ऐक्य घडवून आणले.

  बारावे ते सतराव्या शतकापर्यंत महाराष्ट्रात सकस संत वांड्मय निर्माण झाले. ह्या कालावधीतील वारकरी संप्रदायातील मुख्य आचार्य म्हणून ज्ञानेश्वर ओळखले जातात. या संत मालिकेत सर्वात लोकप्रिय असलेले संत म्हणजे तुकाराम महाराज आहेत. महाराष्ट्रातील संत मंडळीतील शिरपेचातील मुगुटमणी खरा वेदांत सामान्यांना समजेल अशा सोप्या भाषेत सांगणारे, सामान्यांचा असामान्य संत म्हणजे संत शिरोमणी तुकाराम महाराज. त्यांनी आपल्या रसाळ वाणीने, रसाळ काव्य रचनेने आणि व्यवहार सुलभ दृष्टांतानी मराठी भाषेच्या गळ्यातील अलंकार अभंगवाणीने सजवला. ज्ञानेश्वर ते तुकाराम यांच्या दरम्यान संत नामदेव, जनार्दन, एकनाथ होऊन गेले. त्यांनीही भागवत धर्माचे फार मोठे काम केले आहे.

संत बहिणाबाई म्हणतात…

संत कृपा झाली l
इमारत फळा आली ll
ज्ञानदेवे  रचला पाया l
उभारिले देवालया ll
नामा तयाचा किंकर l
तेणे रचिले ते आवार ll
जनार्दन एकनाथ l
खांब दिधला भागवत ll
तुका झालासे कळस l
भजन करा सावकाश ll
बहिणी म्हणे फडकती ध्वजा l
निरूपण केले वोजा ll

    बहिणाबाईंच्या या अभंगाने  संतांच्या या कार्याला नव्याने उजाळा मिळाला.

  संत पदाला पोचलेली व्यक्ती दुसऱ्या संतांचा आदर करते. तुकारामही या गोष्टीला अपवाद नवते. तुकारामांना ज्ञानदेवाविषयी व सर्व संतांविषयी पराकोटीचा आदर होता. अपार्थिवाचे गाणे गाणाऱ्या ज्ञानेश्वरांना तुकारामानी,

ज्ञानियाचा राजा गुरु महाराव |
म्हणती ज्ञानदेव ऐसे तुम्हा ||
म्हटले आहे.

भागवत धर्माचा पाया ज्ञानेश्वरांनी रचला असला तरी त्याचे कळस तुकाराम झालेले आहेत. ही गोष्ट सूर्य प्रकाशा इतकी सत्य आहे. या बद्दल रामेश्वर भट्ट म्हणतात,

भक्तीज्ञान आणि वैराग्ये आगळा l
ऐसा नाही डोळा देखियेला ll

आत्मज्ञान, संत समागम, गुरुकृपा, आणि भक्ती हे तुकारामांचे स्थायी गुण आहेत. त्यांच्या वाणीचा परिणाम श्रेष्ठांपासून कनिष्ठांपर्यंत एकसारखा झाला. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात त्यांच्या अभंगवाणीचे पडसाद उमटले आणि वारकरी पंथाला खऱ्या अर्थाने त्यांनी कळसापर्यंत पोचवून बहिणाबाईंचे बोल खरे ठरवले. धन्य ते तुकोबा.

भगवतधर्म खऱ्या अर्थाने पुढे नेणाऱ्या संत तुकारामाची अभंगगाथा काही वितुष्ट शक्तींनी इंद्रायणीच्या डोहात बुडविली. असे म्हणतात तेरा दिवस अन्न पाणी न घेता संत तुकाराम इंद्रायणी काठी बसून होते. तेराव्या दिवशी तुकारामाची गाथा इंद्रायणीच्या पाण्यावर तरंगू लागली. तो दिवस 21 मार्च  हा मानला जातो. ही गाथा इंद्रायणीवर तरंगली याचा अर्थ ती गाथा लोकांनी तोंडपाठ  केलेली असावी, म्हणजे जनप्रवाहानेच ती तारली असावी. संत तुकारामाच्या देहू गावी भक्ती शक्ती सत्संग परिवाराच्या वतीनेआजही गाथा पठनाचा हा नित्य कार्यक्रम दरवर्षी 21 मार्च रोजी  होत असतो..लोक इंद्रायणीच्या पात्रात जेवढा वेळ उभे राहणे शक्य होईल तेवढा वेळ उभे राहून गाथा म्हणतात. तुकारामांच्या अभंगाना जितकी लोकप्रियता लाभली तितकी अन्य संतांच्या अभंगाना खचितच लाभली असेल. म्हणूनच तुकारामाच्या शिष्या संत बहिणाबाईंनी तुका झालासे कळस... असे सार्थ उदगार काढलेले आहेत.

लेखक –
प्रा. डॉ. शोभा माधव गायकवाड
राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक,
साहित्यिक व कवी, अमरावती.
संपर्क – ९४२३२७९४३२

डॉ. शोभा माधव गायकवाड
Author: डॉ. शोभा माधव गायकवाड

लेखिका या एक उत्कृष्ट शिक्षक, प्राध्यापक, विद्यार्थी मार्गदर्शक, संत साहित्याच्या अभ्यासक, कवी, अभंगकार, समाजप्रबोधनकर्त्या, सामाजिक कार्यकर्त्या म्हणून अमरावती शहरातील प्रतिष्ठित नागरिक आहेत. त्यांनी ग्राहक पंचायत, अंधश्रद्धा निर्मूलन, जेष्ट नागरिक मंडळ अश्या विविध संघटनेच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात योगदान दिले आहे तसेच विविध पुरोगामी संघटनेच्या माध्यमातून त्या सामाजिक क्षेत्रात सुद्धा कार्यरत आहेत. त्यांनी M.A., B.Ed., M.Ed., M.Phil., D.S.M., B.J., SET, Post Graduate In Yoga Therapy, P.hd., ग्रामगिताचार्य अश्या विविध विषयांची उपलब्धी प्राप्त केली आहे. त्यांचे असंख्य पुस्तकांचे वाचन असून स्वतः 30 पुस्तकांचे लिखाण करून प्रकाशित केलेले आहे. 2024 साली एकाच दिवशी 10 पुस्तके प्रकाशित करण्याचा विक्रम सुद्धा त्यांच्या नावे आहे. 2010 साली त्यांच्या अतुलनीय कार्याबद्दल 'उत्कृष्ट शिक्षक' म्हणून राष्ट्रपती च्या हस्ते त्यांना पुरस्कार देण्यात आला आहे. त्याच बरोबर विविध पुरस्कारांच्या सुद्धा त्या मानकरी आहेत. मागील गेल्या दोन वर्षांपासून त्या सा. रयत रक्षक, महाराष्ट्र व रयत रक्षक न्यूज, महाराष्ट्र च्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, ऐतिहासिक अश्या विविध विषयांवर लिखाण करून आपले विचार त्या जनतेपुढे मांडत असतात.

Leave a Comment