महाराष्ट्रातील एक थोर व लोकप्रिय लोकशाहीर अमर शेख यांच्या वाचकांसाठी दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी असलेल्या ५७ व्या स्मृतिदिनानिमित्त साहित्यिक व अभंगकार प्रा. अरुण बाबारावजी बुंदेले यांचा लेख वाचकांसाठी येथे प्रकाशित करीत आहोत.
लोकशाहीर….
महाराष्ट्रातील एक थोर व लोकप्रिय लोकशाहीर, कामगार पुढारी, क्रांतिकारी विचार आणि बुलंद आवाजाच्या जोरावर संयुक्त महाराष्ट्राची चळवळ गाजवणारे महान लोकशाहीर, स्वातंत्र्यसैनिक, अभिनेते, महाराष्ट्राच्या क्रांतिकारी लढ्यात व सांस्कृतिक इतिहासात ज्यांचे नाव सुवर्णाक्षरांनी कोरले गेले आहे असे लोकशाहीर अमर शेख यांच्या दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी असलेल्या ५७ व्या स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन ॥
लोकशाहीर अमर शेख हे महाराष्ट्रातील एक अत्यंत लोकप्रिय आणि ख्यातनाम लोकशाहीर होते. त्यांचा जन्म दि. २० ऑक्टोबर १९१६ रोजी सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथे झाला. त्यांचे मूळ नाव मेहबूब हुसेन पटेल असे होते. त्यांच्या वडिलांचे नाव हुसेन शेख आणि आईचे नाव मुनेरबी होते. त्यांचा जन्म अत्यंत गरीब आणि हलाखीच्या परिस्थितीत असणाऱ्या मुसलमान कुटुंबात झाला होता. अमर शेख यांना त्यांच्या आईकडून काव्यलेखनाचा आणि मराठी लोकगीतांचा समृद्ध वारसा लाभला. त्यांच्या आई मुनेरबी या अशिक्षित असूनही विद्वानांना लाजवेल असे काव्य रचत, म्हणून त्यांना ‘दुसऱ्या बहिणाबाई’ म्हटले जायचे.
अमर शेख यांना निसर्गाने विलक्षण पल्लेदार आणि अतिशय पहाडी, बुलंद आवाज दिला होता. गरिबीमुळे त्यांनी सुरुवातीच्या काळात बसचालकासोबत क्लिनर आणि गिरणी कामगार म्हणूनही काम केले. मुंबईत गिरणी कामगारांच्या संपात पुढाकार घेतल्यामुळे त्यांना विसापूरच्या तुरुंगात जावे लागले होते. तुरुंगात त्यांची भेट कम्युनिस्ट नेते कॉम्रेड रघुनाथ कऱ्हाडकर यांच्याशी झाली, ज्यांच्या प्रभावामुळे ते कम्युनिस्ट चळवळीत आले. पोलिसांचा ससेमिरा चुकवून ते कोल्हापूरला गेले आणि तिथे मास्टर विनायकांच्या स्टुडिओत काम करू लागले. कोल्हापूरमध्येच त्यांच्या मित्रांनी त्यांचे ‘मेहबूब’ बदलून ‘अमर शेख’ असे नवीन नामकरण केले.
सन १९३०-३२ च्या सुमारास त्यांनी भारताच्या राष्ट्रीय स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय सहभाग घेतला. त्यांनी डाव्या विचारसरणीच्या प्रेरणेने ‘लाल बावटा कला पथकाची’ स्थापना केली. या कला पथकात त्यांना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि शाहीर द. ना. गव्हाणकर यांची भक्कम साथ मिळाली. अमर शेख, अण्णाभाऊ साठे आणि गव्हाणकर या त्रिकुटाने ढोलकीच्या थापावर संपूर्ण महाराष्ट्रात क्रांतीची ज्वाला पेटविली. अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेल्या प्रसिद्ध ‘माझी मैना गावावर राहिली’ या छक्कडला (उत्स्फूर्त, जोशपूर्ण, वेगवान आवाजातील गाणे) अमर शेख यांनीच आपला बुलंद आवाज दिला होता. त्यांनी आपल्या शाहिरीच्या माध्यमातून संयुक्त महाराष्ट्र चळवळ प्रचंड प्रमाणात गाजविली आणि यशस्वी केली. केवळ महाराष्ट्रच नव्हे, तर गोवा मुक्ती संग्रामात देखील त्यांनी मोलाचे योगदान दिले. चीन आणि पाकिस्तानच्या युद्धाच्या वेळी त्यांनी आपल्या शाहिरीच्या कार्यक्रमांतून देशासाठी लाखोंचा निधी गोळा केला. पोवाडे, लावण्या, लोकगीते आणि लोकनाट्ये यांद्वारे त्यांनी समाजातील अन्यायाविरुद्ध आणि शोषणाविरुद्ध आवाज उठवला. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, उधमसिंग आणि होळकर यांच्यावर अत्यंत प्रभावी पोवाडे रचले व गायले.
‘कलश’ (१९५८) आणि ‘धरतीमाता’ (१९६३) हे त्यांचे गाजलेले काव्यसंग्रह आहेत. ‘अमरगीत’ हा त्यांचा गीतसंग्रह आणि ‘पहिला बळी’ हे त्यांनी लिहिलेले प्रसिद्ध नाटक आहे. त्यांनी ‘युगदीप’ आणि ‘वख्त की आवाज’ या मासिकांचे यशस्वी संपादन देखील केले. स्वतः श्रमिक असल्याने उपेक्षित, कामगार आणि कष्टकरी समाजाच्या उद्धारासाठी त्यांनी आपली लेखणी व वाणी अर्पण केली. त्यांचा विवाह ज्योती (पूर्वाश्रमीच्या कुसुम जयकर) यांच्याशी १९४७ मध्ये झाला आणि प्रसिद्ध कवयित्री मल्लिका अमर शेख या त्यांच्या कन्या आहेत. अशा या महान क्रांतिकारी लोकशाहीराचे दि. २९ ऑगस्ट १९६९ रोजी निधन झाले. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आजही विविध संस्थांतर्फे ‘राष्ट्रशाहीर अमर शेख पुरस्कार’ देऊन मान्यवरांचा गौरव केला जातो.
आज दि. २९ ऑगस्ट २०२६ ला असलेल्या ५७ व्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन ॥
लेखक –
प्रा. अरुण बाबारावजी बुंदेले
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जीवन गौरव पुरस्कार प्राप्त, अमरावती.
संपर्क – ८०८७७४८६०९
Author: प्रा. अरुण बाबारावजी बुंदेले
लेखक एक उत्कृष्ट शिक्षक, प्राध्यापक, विद्यार्थी मार्गदर्शक, साहित्यिक, कवी, अभंगकार, समाजप्रबोधनकर्ते असून अमरावती शहरातील प्रतिष्ठित नागरिक आहेत. सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक विषयावरील बारा पुस्तकांचे लेखक असून बावीस पुरस्कारांचे मानकरी आहेत. सामाजिक क्षेत्रातील असंख्य अश्या पुरस्कारांचे ते मानकरी आहेत. सोबतच विविध पुरोगामी सामाजिक संघटनेच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात अग्रेसर आहेत. मागील गेल्या दोन वर्षांपासून ते सा. रयत रक्षक, महाराष्ट्र व रयत रक्षक न्यूज, महाराष्ट्र च्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक अश्या विविध विषयांवर लिखाण करून आपले विचार ते जनतेपुढे मांडत असतात.





