युद्धाची झळ आता पोहोचली सर्वसामान्यांच्या घरापर्यंत, सिलेंडरनंतर आता खाद्यतेलाच्या किमती वाढल्या; गेल्या 10 दिवसात 15 लिटर च्या डब्या मागे 100 ते 150 रुपयांची वाढ

SHARE:

नवी दिल्ली – आखाती देशात युद्धामुळे एकीकडे इंधन आणि गॅसचा पुरवठा बाधित झाल्याने सर्वत्र टंचाई निर्माण झाली आहे. घरगुती गॅसचे दर वाढले असताना आता खाद्य तेलाचे दर देखील वाढले आहेत. गेल्या १० दिवसांत खाद्यतेलाच्या दरामध्ये मोठी वाढ झाली आहे. १५ लिटरच्या डब्यामागे तब्बल १०० ते १२५ रुपयांची वाढ झाली आहे. यामुळे मध्य-पूर्वेतील युद्धाची झळ आता थेट सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघरापर्यंत पोहोचली असल्याचे दिसून येत आहे.

इराण आणि अमेरिका- इस्राईल युद्धाने आखाती देशात व्यापार बंद पडला आहे. होर्मुज सामुद्रधुनीतून वाहतूक होणारी सर्व जहाजे इराणच्या निशाण्यावर असल्याने या मार्गातील वाहतूकीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे इंधन आणि नैसर्गिक वायूची वाहतूक अडचणीत आली आहे. त्यातच आता खाद्य तेलाच्या दरांवर देखील या घटनेची झळ बसू लागली आहे. गेल्या आठ ते दहा दिवसांत खाद्य तेलाच्या दरात मोठी भाव वाढ झाली आहे. जवळपास १५ लिटरच्या डब्यामागे आठ दिवसात १०० ते १२५ रुपये वाढले असून पुढल्या काळात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

भारतामध्ये तेलबियांचे उत्पादन मर्यादित प्रमाणात होत असल्याने भारत मोठ्या प्रमाणात खाद्य तेल आयात करतो. सोयाबीन तेल, पामोलिन तेल आणि सूर्यफूल तेल यांसारख्या खाद्यतेलांची मोठ्या प्रमाणावर आयात मलेशिया, इंडोनेशिया, अर्जेंटिना आणि ब्राझील या देशांमधून केली जाते. मात्र, सध्या मध्यपूर्वेत निर्माण झालेल्या तणावामुळे समुद्री मार्गावरील वाहतूक खर्च वाढला आहे. त्यामुळे आयात होणाऱ्या खाद्यतेलांच्या किमतींमध्ये वाढ झाली आहे.

व्यापाऱ्यांच्या मते, सध्या परदेशातून येणाऱ्या तेलाच्या मालाला नेहमीपेक्षा सुमारे आठ दिवसांचा अधिक कालावधी लागत आहे. वाहतुकीतील अडथळे, जहाजांच्या मार्गातील बदल आणि वाढलेला विमा खर्च यामुळे आयात महाग झाली आहे. परिणामी, देशांतर्गत बाजारातही खाद्यतेलांच्या किमती वाढताना दिसत आहेत.
या परिस्थितीचा परिणाम किरकोळ बाजारातही जाणवू लागला आहे. घरगुती वापरासाठी घेतल्या जाणाऱ्या सोयाबीन, पाम तेल आणि सूर्यफूल तेलाच्या किमती वाढल्याने सर्वसामान्य ग्राहकांवर आर्थिक ताण वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, आयात होणाऱ्या तेलाच्या किमती वाढल्यामुळे देशांतर्गत तयार होणाऱ्या खाद्यतेलांची मागणी वाढल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

व्यापारी आणि बाजार विश्लेषकांच्या मते, सध्याची परिस्थिती युद्धावर अवलंबून आहे. जर आखातातील तणाव लवकर कमी झाला आणि समुद्री वाहतूक पुन्हा सुरळीत झाली तर गुढी पाडव्यानंतर खाद्यतेलांच्या किमतींमध्ये काही प्रमाणात घट होण्याची शक्यता आहे. मात्र युद्ध दीर्घकाळ चालू राहिल्यास खाद्यतेलांच्या किमती आणखी वाढू शकतात.

Leave a Comment

अधिक वाचा