मुंबई – इराण अमेरिका युद्धामुळे डॉलरच्या तुलनेत रुपयाची मोठी घसरण झाली आहे, तर शेअर बाजारातील घसरणीमुळे रुपयावर दबाव वाढला आहे. भारतात आता गॅस दरवाढीनंतर आता डॉलरच्या तुलनेत रुपया ऐतिहासिक नीचांकीवर आला आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण सुरूच आहे. ती आतापर्यंतच्या नीचांकी पातळीवर पोहोचली आहे. ही घसरण रोखण्यासाठी आता आरबीआयने हस्तक्षेप सुरू केला आहे. युद्धामुळे पश्चिम आशियामध्ये निर्माण झालेल्या तणावाचा परिणाम आता भारताच्या अर्थव्यवस्थेवरही दिसू लागला आहे.
कच्च्या तेलाच्या दरात झालेल्या मोठ्या वाढीमुळे भारतीय रुपयावर दबाव निर्माण झाला आहे. डॉलरच्या तुलनेत भारताचा रुपया ऐतिहासिक नीचांकी पातळीवर घसरला आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयात मोठी घसरण नोंद झाली आहे. याशिवाय शेअर बाजारातील घसरणीमुळेही रुपयावर दबाव वाढल्याचे सांगितले जात आहे. बुधवारी रुपया डॉलरच्या तुलनेत ९२.०१ वर बंद झाला होता. आज तो आणखी घसरणीसह ९२.२५ वर उघडला होता. त्यानंतर घसरण सुरूच राहिली आणि एका टप्प्यावर ९२.३५ प्रति डॉलरपर्यंत रुपया घसरला आहे.
आज रुपया ०.३ टक्क्यांनी घसरून ९२.३५७५ या पातळीवर पोहोचला आहे. या आधीच्या ९२.३४७५ या विक्रमी नीचांकी पातळीचाही हा स्तर पार करण्यात आला होता. भारतातील रुपयाची घसरण अधिक वाढू नये म्हणून भारतीय रिझर्व्ह बँकेने शेअर बाजारात हस्तक्षेप केल्याचे समोर आले आहे. या हस्तक्षेपामुळे रुपयाची घसरण काही प्रमाणात थांबवण्यात मदत झाली आहे. जगभरातील 6 प्रमुख चलनांच्या तुलनेत डॉलरची ताकद दर्शवणारा डॉलर इंडेक्स ०.२४ टक्क्यांच्या वाढीसह 99.47 वर पोहोचला आहे.
पश्चिम आशियामधील तणावामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. आज ब्रेंट क्रूडचा दर पुन्हा १०० डॉलर प्रति बॅरलच्या वर गेला आहे. जगातील देशांनी २०० डॉलर प्रति बॅरल तेलासाठी तयार राहावे असे इराणने म्हटले आहे. भारत देश आपल्या गरजेपैकी मोठ्या प्रमाणात कच्चे तेल आयात करतो. तेल महाग झाल्याने भारताचा व्यापार तुटवडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याचा परिणाम रुपयाच्या मूल्यात होत आहे.
डॉलरच्या तुलनेत रुपयातील घसरण कायम राहिल्यास भारतीय अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होऊ शकतो. इलेक्ट्रॉनिक्स, कच्चे तेल आणि इतर आयात वस्तू महाग होण्याची शक्यता आहे. परदेशात शिक्षण घेणे अधिक खर्चिक होऊ शकते. मालवाहतूक खर्च वाढल्यामुळे अन्नधान्य आणि इतर वस्तूंचे दर वाढू शकतात.





