सोनम वांगचुक यांची होणार सुटका; केंद्र सरकारकडून एनएसए अंतर्गत कारवाई रद्द

SHARE:

नवी दिल्ली – केंद्रीय गृह मंत्रालयाने आज एक मोठी घोषणा करत लडाखमधील सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांची कोठडी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत (एनएसए) प्राप्त अधिकारांचा वापर करून हा निर्णय घेतला आहे.

सोनम वांगचुक हे २६ सप्टेंबर २०२५ पासून तुरुंगात होते. लडाखमध्ये शांतता, स्थिरता आणि परस्पर विश्वासाचे वातावरण निर्माण करण्यासाठी वांगचुक यांची सुटका करण्याचा निर्णय घेतल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, सोनम वांगचुक यांची पत्नी गीतांजली आंगमो यांनी त्यांच्या अटकेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. या याचिकेवर १७ मार्च रोजी सुनावणी होणार होती, परंतु त्यापूर्वीच सरकारकडून त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

निवेदनात नेमकं काय?
मंत्रालयाने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, “लडाखमधील लोकांच्या आकांक्षा आणि चिंता दूर करण्यासाठी प्रशासन स्थानिक नेत्यांशी सातत्याने चर्चा करत आहे. मात्र, सध्या सुरू असलेल्या बंद आणि आंदोलनांमुळे तिथल्या शांतताप्रिय समाजावर आणि अर्थव्यवस्थेवर विपरित परिणाम झाला आहे.

लडाखमध्ये शांतता, स्थिरता आणि परस्पर विश्वासाचे वातावरण निर्माण करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे, जेणेकरून सर्व भागधारकांशी सकारात्मक आणि अर्थपूर्ण चर्चा होऊ शकेल. हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून सरकारने आपल्या अधिकारांचा वापर करत सोनम वांगचुक यांची कोठडी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.”

काय आहेत आरोप?

लडाखला राज्याचा दर्जा मिळावा आणि संविधानाच्या सहाव्या अनुसूचीमध्ये त्याचा समावेश व्हावा, या मागणीसाठी गेल्या वर्षी लेहमध्ये हिंसक निदर्शने झाली होती. या हिंसाचारात चार जणांचा मृत्यू झाला होता.

सोनम वांगचुक यांना गेल्या वर्षी २६ सप्टेंबर २०२५ रोजी राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत (एनएसए) ताब्यात घेण्यात आले होते. २४ सप्टेंबर रोजी लेहमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेची गंभीर स्थिती निर्माण झाल्याने जिल्हा दंडाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली होती.

या घटनांना प्रवृत्त केल्याचा आणि हिंसा भडकवल्याचा ठपका ठेवत सरकारने वांगचुक यांना ताब्यात घेतले होते. वांगचुक यांनी आतापर्यंत त्यांच्यावरील अटकेच्या कालावधीचा अर्ध्याहून अधिक काळ तुरुंगात घालवलाआहे. सध्या ते राजस्थानमधील जोधपूर केंद्रीय कारागृहात बंदिस्त आहेत.

कोण आहेत सोनम वांगचुक ?

लडाखचे अभियंता, शिक्षक आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक हे शिक्षण आणि पर्यावरणीय मुद्द्यांमध्ये दीर्घकाळ सक्रिय आहेत. त्यांनी शिक्षण सुधारण्यासाठी आणि लडाखमधील स्थानिक पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी अनेक मोहिमा राबवल्या आहेत.

‘थ्री इडियट्स’ या चित्रपटातील आमिर खानची व्यक्तिरेखा फुनसुक वांगडू ही सोनम वांगचुक यांच्यापासून प्रेरित होती. गेल्या काही काळापासून त्यांनी लडाखशी संबंधित राजकीय आणि संवैधानिक मुद्द्यांवर भूमिका घेतली आहे. त्यांनी लडाखसाठी संवैधानिक संरक्षण, पर्यावरण संरक्षण आणि स्थानिक लोकांच्या हक्कांसाठी अनेक निदर्शनेही केली.

Leave a Comment

अधिक वाचा