नवी दिल्ली – एकीकडे लहरी हवामान, अवकाळी पाऊस, बियाणे आणि खतांच्या वाढलेल्या किमती, शेतमालाला भाव नसणे आदि कारणामुळे देशभरात शेतकरी आत्महत्या करत आहेत. दुसरीकडे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी शेतकऱ्यांचे उत्पन्न तीन ते चार पटीने वाढल्याचा दावा केला आहे. मंगळवारी, लोकसभेतील प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान, टीएमसी खासदार सौगत रॉय यांनी शेतकऱ्यांच्या उत्पन्नाबाबत प्रश्न उपस्थित केलेल्या प्रश्नाच्या उत्तरात केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी हा दावा केला.
केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दावा केला की देशातील अनेक शेतकऱ्यांचे उत्पन्न केवळ दुप्पटच नाही, तर कित्येक पटींनी वाढले आहे. शिवराज सिंह चौहान म्हणाले की शेतकऱ्यांचे उत्पन्न केवळ दुप्पटच नाही, तर दोन ते तीन पटींनी आणि काही प्रकरणांमध्ये तब्बल आठ पटींनी वाढले आहे.
मध्य प्रदेशचे उदाहरण देत ते म्हणाले की तेथील शेतकरी पूर्वी विजेच्या खराब परिस्थितीमुळे केवळ एकच पीक घेऊ शकत होते. वीज दुर्मिळ होती आणि अनेकदा जात असे. कधीकधी फक्त विजेची बिले मिळत असत. सरकारने सिंचन सुविधांचा विस्तार केला असून २४ तास वीजपुरवठा केला आहे. परिणामी, मध्य प्रदेशातील शेतकरी आता वर्षातून तीन पिके घेत असून, त्यामुळे त्यांच्या उत्पन्नात वाढ झाली आहे.
मंत्र्यांनी कृषी अर्थसंकल्पातील वाढीचाही उल्लेख केला. त्यांनी सांगितले की मागील कृषी अर्थसंकल्प १९,३०६ कोटी रुपये होता, जो आता वाढवून १ लाख ३० हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त करण्यात आला आहे. कृषी आणि संलग्न क्षेत्रांचा एकत्रित विचार केल्यास, एकूण अर्थसंकल्प ५ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त झाला आहे.
उत्पादनाच्या आकडेवारीवर चर्चा करताना, शिवराज सिंह चौहान म्हणाले की पूर्वी उत्पादन सुमारे १४ टक्के होते, ते आता ४४ टक्क्यांपर्यंत वाढले आहे. ते म्हणाले कि केंद्र सरकार शेतकऱ्यांना सन्मान निधीच्या स्वरूपात वार्षिक ६,००० रुपयांची मदत देत आहे. याशिवाय, किसान क्रेडिट कार्डद्वारे शेतकऱ्यांना कर्जदेखील सहज उपलब्ध करून दिले जात आहे.
एकीकडे केंद्र सरकार शेतकर्यांचे उत्पन्न तीन ते चार पटीनेच नाही तर काही प्रकरणांमध्ये तब्बल आठ पटींनी वाढले आहे. मात्र दुसरीकडे शेतकर्यांच्या आत्महत्या सुरूच आहे. महाराष्ट्रामध्ये गेल्या वर्षीच्या पहिल्या नऊ महिन्यांत ७८१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. राज्याचे मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी ही माहिती विधान परिषदेत लेखी उत्तरात दिली होती.
राष्ट्रीय गुन्हे नोंदणी ब्युरोच्या (एनसीआरबी) २०२३ च्या आकडेवारीनुसार, भारतातील प्रत्येक दोन शेतकरी आत्महत्यांपैकी एक महाराष्ट्रात होते. गेल्या पाच वर्षांमध्ये महराष्ट्रात एकूण ६,६६९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. यापैकी ४,१५० शेतकरी आणि २,५१९ शेतमजूर होते. अशीही माहिती मंत्री जाधव यांनी दिली होती.
चालू वर्षात गेल्या महिन्यापर्यंत पश्चिम विदर्भ व मराठवाडा विभागात १ हजार ९८७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. या विभागात दररोज सरासरी ३ शेतकऱ्यांनी आपली जिवन यात्रा संपवली आहे, अशी धक्कादायक माहिती देखील राज्याच्या विधानसभेत विचारलेल्या एका प्रश्नातून पुढे आली आहे. सन २०२४ पूर्वीच्या १० वर्षात एक लाख ७४ हजार शेतकर्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत.
स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींनुसार शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादन खर्चाच्या किमान दीडपट मोबदला देण्याचे, २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे, शेतकऱ्यांची कर्जे माफ करण्याचे आश्वासन देऊन मोदी सरकार सत्तेवर आले. दुर्दैवाने, मोदी यापैकी एकही आश्वासन पूर्ण करण्यात अयशस्वी ठरले, असा विरोधी पक्षांचा आरोप आहे. आता केंद्रीय कृषी मंत्री म्हणत आहेत कि शेतकर्यांचे उत्पन्न तीन ते चार पटीने वाढले. खरच जर शेतकर्यांचे उत्पन्न वाढले तर ते आत्महत्या का करत आहे, असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे.





