हनी ट्रॅपमध्ये अडकवणारी तृतीयपंथी वकील पवन यादव उघडकीस; मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या आक्षेपार्ह चित्रफितीचे गूढ उकलले

SHARE:

मुंबई – राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या एका आक्षेपार्ह चित्रफितीने समाजमाध्यमांवर मोठी खळबळ उडवून दिली आहे. या प्रकरणामागे पवन यादव या तृतीयपंथी वकील असल्याचा आणि तिनेच खंडणीसाठी हा हनी ट्रॅप रचल्याचा धक्कादायक खुलासा तिचा सख्खा भाऊ रवी यादव याने केला आहे. दोन दिवसांपूर्वी सुमारे १० मिनिटे कालावधीची ही आक्षेपार्ह चित्रफीत व्हायरल झाली. मात्र, या गंभीर प्रकरणानंतरही स्वतः नरहरी झिरवाळ आणि त्यांचा अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांनी पूर्णपणे मौन धारण केले असून अद्याप पोलिसांत कोणतीही तक्रार दाखल केलेली नाही.

या प्रकरणावरून राजकीय वर्तुळात जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी झिरवाळ यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी केली आहे. तर दुसरीकडे, काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी असा दावा केला आहे की, राष्ट्रवादी काँग्रेस मधीलच एका माजी मंत्र्याला झिरवाळ यांचे मंत्रिपद हवे असल्याने त्यांना जाणीवपूर्वक लक्ष करण्यासाठी ही चित्रफीत तयार करण्यात आली असावी.

मुंबई मधील दिंडोशी व बोरीवली न्यायालय येथे काही काळ वकिली करणारी पवन यादव ही स्वतःला देशातील दुसरी व महाराष्ट्रातील पहिली महिला तृतीयपंथी वकील मानते. पूर्वी ती महिला काँग्रेसच्या तृतीयपंथी सेलची प्रमुख होती. मात्र, २०२२ मध्ये तिने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षात प्रवेश केला, अशी माहिती काँग्रेसच्या प्रदेश महिला अध्यक्षा संध्या सवालाखे यांनी दिली. सध्या महाराष्ट्र राज्य तृतीयपंथी हक्क संरक्षण आणि कल्याण मंडळ याची आपण विधी सल्लागार असल्याचे ती सांगते. तसेच, तिने सारथी फाऊंडेशन सोबतही काम केले असून तिला महाराष्ट्राची पहिली तृतीयपंथी विधान परिषद आमदार होण्याची प्रबळ इच्छा आहे.

दरम्यान, पवन यादव हिची अनेक बड्या नेत्यांसोबतची छायाचित्रे समोर आली आहेत. यात एकनाथ शिंदे, मंत्री शंभूराज देसाई, खासदार रविंद्र वायकर, नाना पटोले, मंत्री संजय शिरसाट आणि आमदार हिरामण खोसकर या दिग्गजांचा समावेश आहे.

व्हायरल झालेली ही चित्रफीत सुमारे ७ महिने जुनी असल्याचे समजते. नरहरी झिरवाळ यांच्या शयनकक्षात हा प्रकार घडला असून, झिरवाळ गाढ झोपेत असताना पवन यादव त्यांच्या शेजारी जाऊन झोपली व दुसऱ्या एका व्यक्तीने हे चित्रीकरण केले. हा संपूर्ण कट केवळ खंडणी उकळण्याच्या उद्देशाने रचला गेल्याचे स्पष्ट दिसत आहे.

Leave a Comment

अधिक वाचा