सोमनाथपासून ते कन्याकुमारीपर्यंत आणि चेन्नईपासून ते अंदमानपर्यंत विविध समुद्रकिनाऱ्यांवर आजवर उभा राहिलो. ‘आसिंन्धुसिन्धुपर्यन्ता यस्य भारतभूमिका’ ही स्वा. सावरकरांची ओळ आठवली नाही असे एकदाही झाले नाही. मातृभू आणि पितृभू असलेल्या भारताला पुण्यभू बनविण्यात तिन्ही दिशांना असलेल्या या सागरांचा मोठा वाटा आहे. संजीव सन्याल यांचे ‘दि ओशन ऑफ चर्न’ यांचे पुस्तक समुद्रांवरच्या वर्चस्वामुळे पुण्यभू बनत गेलेल्या, समृद्ध झालेल्या आपल्या भारताची कथा आहे. हिंदी महासागराने घडविलेल्या मानवी इतिहासाची ही कथा आहे.
आफ्रिकेच्या किनारपट्टीपासून ते ओमानपर्यंत आणि अंदमानपासून आग्नेयेकडील बेटांसह चीन, जपानपर्यंत समुद्राच्या साथीने वावरणाऱ्या मानवसमुहांची ही कथा आहे. देशोदेशीचे व्यापारी, बदलणारे तंत्रज्ञान, अर्थकारण आणि त्यामुळे बदललेले सत्ताकारण, समुद्री प्रवासाचे ताणेबाणे, उदयास आलेल्या आणि अस्ंतगत होत गेलेल्या सत्ता या सगळ्यांचा साक्षीदार हा हिंदी महासागर आहे.
हजारो वर्षांपूर्वी समुद्रात झालेली स्थित्यंतरे, सरकलेले भूभाग, पर्यावरणीय बदल आणि मानवी आकांक्षा यामुळे माणसाची स्थित्यंतरे सुरू झाली. पुस्तकाची कथा येथून सुरू होते आणि दुसऱ्या महायुद्धाच्या अखेरीस समुद्रावर राज्य करण्याच्या इंग्रजी साम्राज्याच्या अस्तापर्यंत येऊन थांबते. या दरम्यान, आपल्याला शतकानुशतके समुद्र ओलांडून जाणारे हिंदू व्यापारी, राज्यकर्ते भेटतात. त्यांनी व्यापारातून कमावलेली प्रचंड संपत्ती, आग्नेय आशियात निर्माण केलेले राजकीय आणि सांस्कृतिक साम्राज्य यांची विस्तृत माहिती मिळत जाते.
‘भारतात समुद्र ओलांडून जाणे निषिद्ध होते’ हे वाक्य अत्ंयत सरधोपटपणे वापरले जाते. मात्र, भारतीयांनी समुद्री व्यापार कैक शतके अत्यंत प्रभावीपणे केला, याचे दाखले पानोपानी हे पुस्तक देते. पल्लव, खारवेल, चोल, पांड्य, डचांना दे माय ठरणीठाय करणारा त्रावणकोरचा मार्तंडवर्मा, हे आणि असे असंख्य उदाहरणं आपल्याला नवी माहिती देत जातात. जी बाब लढाईंची, तीच व्यापारांची, मुत्सद्देगिरीची, तंत्रज्ञानाची आणि भारतीय बुद्धिमत्तेची. सन्याल अत्यंत रंजकपणे ही गोष्ट सांगतात.
पुस्तकात सगळ्या संस्कृती डोकावत असल्या तरी पुस्तकाची खरी चव ही भारतीय मसाल्यांचीच आहे. पण, ते केवळ भारताबद्दलच बोलते असे नाही. युरोप, अरब, इंडोनेशियासहिता आग्नेयेकडची बेटे, चीन, जपान या सगळ्यांचे असंख्य ऐतिहासिक संदर्भ या पुस्तकात येतात. तमिळ प्रभाव असलेली ब्राह्मी लिपी आग्नेयेकडच्या अनेक देशांनी त्यांच्या भाषेकरिता स्वीकारला हा संदर्भ भारतीयांच्या बहुमुखी प्रभावाचे जागते उदाहरण. मद्रासचा इंग्लिश गव्हर्नर एलिहु येल याला भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली इस्ट इंडिया कंपनीने काढून टाकले होते. याच भ्रष्टाचाराच्या पैशातून त्याने अमेरिकेतील प्रसिद्ध विद्यापीठाला प्रचंड पैसा दिला. त्याचेच नाव या विद्यापीठाला मिळाले, ते विद्यापीठ म्हणजे प्रख्यात ‘येल युनिव्हर्सिटी’. हिंदी महासागरातील पैसा कुठवर पोहोचला, ते बघा!
वेळ आणि समुद्रातीत वातावरण कधीही बदलू शकते. भारतीय महासागराने काळाच्या या प्रचंड तुकड्यात अनेकांची वेळ बदलताना पाहिली आहे. यानंतर, ज्या ज्यावेळी समुद्राच्या काठावर उभे राहील त्या त्या वेळी संजीव सन्याल यांनी केलेले हे समुद्रमंथन सातत्याने आठवत राहील. भारतीय समुद्राकडे अधिक डोळसपणे बघता येईल.
लेखक –
मंदार मोरोणे, नागपूर.
संपर्क – ७७७५०९५९८६
(संकलन – विवेक गं. राऊत)
Author: विवेक गंगाधरराव राऊत
मुख्य संपादक सा. रयत रक्षक, महाराष्ट्र. रयत रक्षक न्यूज, महाराष्ट्र.





