हा लेख कोणत्याही एका पक्षाचा नाही, कोणत्याही एका समाजापुरता मर्यादित नाही. हा लेख आत्मविश्वास गमावलेल्या, लाचार आणि हतबल झालेल्या प्रत्येक स्त्रीसाठी आहे. जगण्याची उमेद हरवलेल्या प्रत्येक मनासाठी एक मशाल आहे. कारण नाभिक समाजाच्या गरीब कुटुंबातील एका मुलीने जिद्दीच्या जोरावर काय करू शकते, याची ही कहाणी आहे.
डॉ. अंजनाबाई मगर यांचे नाव आजच्या पिढीला कदाचित माहितही नसेल. पण जेव्हा एका अत्यंत गरीब घरातील मुलगी पुण्याच्या बी. जे. मेडिकल कॉलेजची डॉक्टर होते, जेव्हा ती मुंबईच्या कुर्ल्यासारख्या कष्टकऱ्यांच्या वस्तीत आपला दवाखाना थाटते, जेव्हा त्याच वस्तीतील लोक तिला दोन वेळा आमदार म्हणून विधानसभेत पाठवतात आणि जेव्हा याच महाराष्ट्राचे शासन तिला मुंबईच्या शेरीफच्या सर्वोच्च सन्मानाच्या खुर्चीवर बसवते, तेव्हा समजावे की हा प्रवास केवळ एका स्त्रीचा नाही, तर व्यवस्थेला दिलेले ठाम उत्तर आहे.
जिथे जन्माने नाकारले, तिथे कर्तृत्वाने स्वीकारले जाणे
२८ जून १९१९. अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील मालुंजे गाव. नाभिक समाजाच्या एका अत्यंत गरीब कुटुंबात एका मुलीचा जन्म झाला. जिथे दोन वेळच्या जेवणाची भ्रांत, तिथे मुलीच्या शिक्षणाचा विचार करणे हीच मोठी क्रांती होती. पण अंजनाबाईंच्या मनात वेगळीच आग होती. परिस्थितीने त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला, पण जिद्द हीच त्यांची खरी ओळख होती आणि शिक्षण हाच त्यांचा धर्म होता.
त्यांनी पुण्याच्या प्रतिष्ठित बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळवला. त्या काळात वैद्यकीय महाविद्यालयाच्या पायऱ्या चढणारी ती कदाचित आपल्या तालुक्यातील पहिली मुलगी असेल. पांढरा कोट अंगावर चढवताना त्यांनी केवळ स्वतःचे नशीब बदलले नाही, तर आपल्यासारख्या हजारो मुलींसाठी एक नवा दरवाजा उघडला.
डॉक्टर झाल्यावर १९४६ साली त्यांनी व्यवसायासाठी मुंबईतील कुर्ला निवडले. अनेकांनी श्रीमंत परिसर निवडला असता, पण त्यांनी निवडले कष्टकऱ्यांचे विश्व. धूर, धूळ, चाळी, पाण्यासाठी भांडणारी माणसे. तिथेच त्यांनी आपला दवाखाना थाटला. त्यांच्यासाठी डॉक्टरकी हा धंदा नव्हता, ती सेवा होती.
याच सेवेतून त्या लोकांच्या सुख-दुःखाशी एकरूप झाल्या. म्हणून १९५२ साली त्यांनी कुर्ला महिला मंडळाची स्थापना केली. या मंडळातून माँटेसरी, प्राथमिक व माध्यमिक कन्याशाळा सुरू झाल्या. ज्या माता चूल आणि मूल यात अडकल्या होत्या, त्यांच्यासाठी शिवणाचे वर्ग सुरू झाले. एका शिवण मशीनच्या घरघरातून अनेक संसारांना आर्थिक आधार मिळाला, अनेक स्त्रिया लाचारातून स्वाभिमानी झाल्या. १९५७ पासून त्या हरिजन एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्ष झाल्या आणि कुर्ला मध्यमवर्ग सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष म्हणून अनेकांचे हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण केले.
काळाच्या २० वर्षे पुढे असलेली दूरदृष्टी.
त्यांची दृष्टी किती दूरची होती याचे उत्तम उदाहरण म्हणजे १९४९ सालचे त्यांचे पाऊल. जेव्हा देशात कुटुंब नियोजनावर बोलणेही पाप मानले जाई, तेव्हा डॉ. मगर यांनी आपल्याच दवाखान्यात मोफत कुटुंब नियोजन केंद्र सुरू केले. त्या नशाबंदी मंडळ आणि प्रौढ शिक्षण मंडळाच्या सदस्या म्हणूनही कार्यरत होत्या.
१९६१ पासून सलग १७ वर्षे त्यांनी चिल्ड्रन्स एड सोसायटीचे अध्यक्षपद भूषवले. मानखुर्द येथे त्यांनी उभारलेली बालनगरी हा त्यांच्या त्यागाचा कळस होता. या बालनगरीचे उद्घाटन देशाचे तत्कालीन राष्ट्रपती फक्रुद्दीन अली अहमद यांच्या हस्ते झाले. पारनेर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी त्यांनी पारनेर योजना राबवली, त्या योजनेच्या त्या मुख्य प्रवर्तक होत्या. बालक वर्षानिमित्त त्यांनी राज्यभर महिलांसाठी तब्बल १०० शिबिरे घेतली.
१९६७ साली त्यांच्यावर राज्य समाज कल्याण मंडळाचे अध्यक्षपद सोपवले गेले. सलग ११ वर्षे त्यांनी ही धुरा वाहिली. श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाच्या सिनेट सदस्या म्हणून त्यांनी स्त्री उच्च शिक्षणाची चळवळ पुढे नेली. १९६५ साली न्यूझीलंडमधील वेलिंग्टन येथे भरलेल्या राष्ट्रकुल संसदीय परिषदेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याचा मान त्यांना मिळाला.
कुर्ल्याच्या आमदार ते मुंबईच्या शेरीफ
१९५७ आणि १९६२ साली काँग्रेसच्या तिकिटावर कुर्ल्याच्या जनतेने त्यांना दोन वेळा आमदार म्हणून विधानसभेत पाठवले. १९६७ पर्यंत आमदार आणि विधानमंडळ काँग्रेस पक्षाच्या सचिव म्हणून त्यांनी काम केले.
..आणि १९७७ साली तो ऐतिहासिक क्षण आला. महाराष्ट्र शासनाने त्यांची मुंबईच्या शेरीफ पदी नियुक्ती केली. अधिकृत नोंदीनुसार त्या ९४ व्या शेरीफ, पण १९७२ साली एकाच वर्षी दोन नियुक्त्या झाल्याने त्यांना मुंबईच्या ९३ व्या शेरीफ म्हणूनही गौरवले जाते. शेरीफ – महापौरांनंतर दुसरा नागरी मान.
२५ मे १९८५ रोजी या सेवायज्ञाची ज्योत मालवली. २६ जून १९८५ रोजी विधानसभेत त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
आज सार्वजनिक जीवनात येऊ पाहणाऱ्या प्रत्येक तरुण-तरुणीपुढे एक मोठे आव्हान असते. परिस्थिती गंभीर असते, घरची जबाबदारी असते, पैशाची चणचण असते, समाजाचे टोमणे असतात. अशा वेळी अनेकजण माघार घेतात.
अशा प्रत्येकासाठी डॉ. अंजनाबाई मगर यांचे जीवन हा एक दीपस्तंभ आहे. त्यांच्यापुढेही हीच आव्हाने होती, किंबहुना त्याहून कितीतरी पटीने मोठी आव्हाने होती. पण त्या घाबरल्या नाहीत, त्या थांबल्या नाहीत. त्यांनी स्वतःवर विश्वास ठेवला आणि लोकसेवेमध्ये स्वतःला वाहून घेतले.
त्यांनी कधी शॉर्टकट शोधला नाही. त्यांनी लोकशाही मार्ग सोडला नाही. त्यांनी शिक्षणाची कास धरली, सेवेची कास धरली, संघटनेची कास धरली. आणि म्हणूनच एका छोट्या दवाखान्यापासून सुरू झालेला प्रवास विधानसभेपर्यंत आणि राजभवनापर्यंत पोहोचला.
आज आपल्याला त्यांच्याकडून हेच शिकायचे आहे. परिस्थितीला दोष देत बसण्यापेक्षा, परिस्थितीशी दोन हात करायला शिकूया. लोकसेवेला वाहून घेऊया आणि योग्य कास धरून, लोकशाही मार्गाने आपली लढाई कायम ठेवूया. याच दरम्यान एक छोटा प्रश्न मनात येतोच – एवढ्या कर्तुत्ववान अंजनाबाई मगर यांच्या नावाने एखादी मोठी चळवळ, एखादा पुरस्कार का राबवला जाऊ नये? हा प्रश्न आरोपी करण्यासाठी नाही, तर एका प्रेरणेला पुन्हा प्रकाशात आणण्यासाठी आहे.
चला, आपण सर्वजण मिळून अंजनाबाई मगर यांचा वारसा जपूया. हेच त्यांना खर अभिवादन असेल…
लेखक –
ॲड. गोविंद दळवी, नांदेड.
संपर्क – ९८८१२८३८०२
Author: प्रा. गोविंद दळवी
लेखक मागील गेल्या 15 ते 20 वर्षापासून शिव, फुले, शाहू, आंबेडकर विचारधारेवर सामाजिक क्षेत्रामध्ये कार्य करतात. ते एक उत्कृष्ट लेखक, व्याख्याते व विद्रोही विचारवंत असून त्यांनी आपल्या लेखणीतून बरेचशे विषय समाजापर्यंत मांडण्याचा प्रयत्न केला आहे. विविध पुरोगामी संघटनेच्या माध्यमातून महापुरुषांच्या विचारांना समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम ते नेहमी करत असतात. त्यांनी अनेक विषयांचा अभ्यास करून असंख्य पदवी प्राप्त केली आहे. सध्या ते वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून महाराष्ट्रभर राजकीय दृष्टिकोनातून सामाजिक सेवेचा वसा चालवत आहेत. आपले प्रखर विचार व महापुरुषांचा वैचारिक वारसा समाजापर्यंत पोहोचवण्याचं कार्य ते सा. रयत रक्षक व रयत रक्षक न्यूज, महाराष्ट्र च्या माध्यमातून नेहमी करत असतात.





