आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीमुळे अनेक पोटाचे विकार वाढताना दिसत आहेत. त्यापैकी अम्लपित्त हा एक अत्यंत सामान्य पण त्रासदायक आजार आहे. चुकीचा आहार, अनियमित जीवनशैली, ताणतणाव आणि जंक फूडचे वाढते सेवन यामुळे अम्लपित्ताचा त्रास मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसतो. आयुर्वेदात अम्लपित्ताला पित्तदोषाच्या विकृतीमुळे निर्माण होणारा विकार मानले जाते.
आयुर्वेदानुसार जेव्हा शरीराच्या आमाशायातील पित्तदोष वाढतो आणि पित्तामध्ये आम्लता वाढते, त्यामुळे अम्लपित्त निर्माण होते. आधुनिक वैद्यकशास्त्रात याची तुलना अॅसिडिटी किंवा [अॅसिड रिफ्लक्सशी] केली जाऊ शकते. गॅस्ट्रोस्कोपी केल्यास गॅस्ट्रिक इरोजन्स आढळू शकतात. सोनोग्राफी केल्यास सोनोग्राफी नॉर्मल येऊ शकते.अम्लपित्ताचा मुख्य संबंध चुकीच्या आहार-विहाराशी आहे.
● अम्लपित्ताची प्रमुख कारणे –
अती तिखट, आंबट, तेलकट आणि मसालेदार पदार्थांचे जास्त सेवन करणे, जंक फूड, फास्ट फूड आणि कोल्ड ड्रिंक्सचे जास्त सेवन करणे, अनियमित जेवणाची वेळ असणे, उपाशी राहणे किंवा खूप उशिरा जेवणे, चहा, कॉफी, तंबाखू, मद्यपान, धुम्रपान यांचा अतिरेक करणे,
जेवण भरभर करणे किंवा प्रत्येक घास न चावता गिळणे, मानसिक ताणतणाव आणि चिंता असणे, अनिद्रेचा त्रास, झोप उखळ असणे किंवा रात्री उशिरापर्यंत जागरण करणे, पचायला जड, शिळ्या अन्नाचे वारंवार सेवन करणे.
● अम्लपित्ताची लक्षणे–
छातीत किंवा घशात जळजळ होणे, आंबट ढेकर येणे, उलटी किंवा मळमळ होणे, तोंडात कडवट किंवा आंबट चव येणे, पोटात जडपणा किंवा जळजळ होणे, भूक मंदावणे, डोकेदुखी, काही व्यक्तींमध्ये अर्ध डोकेदुखी आणि अशक्तपणा असणे, घशात जळजळ आणि अन्ननलिकेत त्रास होणे, गिळताना त्रास होणे.
ही लक्षणे दीर्घकाळ टिकल्यास पचनसंस्थेवर गंभीर परिणाम होऊ शकतात. त्यामुळे योग्य वेळी उपचार करणे आवश्यक आहे.
आयुर्वेदानुसार अम्लपित्त हा पित्तदोष वाढल्यामुळे होणारा विकार आहे. पित्तदोष वाढण्यामागे आहार आणि विहारातील चुका मुख्य कारण असतात. त्यामुळे आयुर्वेदात औषधोपचाराबरोबरच आहार-विहाराचे नियम पाळण्यावर विशेष भर दिला जातो.
●पथ्य (उपयुक्त आहार)-
अम्लपित्तामध्ये पित्तशामक व पचायला हलका आहार घेणे आवश्यक असते, तांदूळ, गहू, ज्वारी यांचा हलका व कमी प्रमाणात आहार घ्यावा, दूध, तूप आणि ताक घ्यावे, कोमट पाणी प्यावे, मूगडाळ खिचडी घ्यावी, डाळिंब, केळी, द्राक्षे यांसारखी फळे खावीत. वेळेवर आणि मर्यादित प्रमाणात आहार घ्यावा.
● अपथ्य (टाळावयाचे पदार्थ) –
अम्लपित्त वाढवणारे पदार्थ टाळणे अत्यंत आवश्यक आहे. अती तिखट, आंबट आणि मसालेदार पदार्थ टाळावेत. तेलकट आणि तळलेले पदार्थ घेऊ नयेत.
फास्ट फूड व पॅकेज्ड पदार्थ टाळावेत. जास्त चहा, कॉफी घेऊ नये. मद्यपान ,तंबाखू आणि धूम्रपान टाळावे.
उशिरापर्यंत जागरण व अनियमित जेवण टाळावे.
● अम्लपित्ताच्या उपचारासाठी आयुर्वेदात अनेक सुरक्षित व प्रभावी औषधे सांगितली आहेत. त्यामध्ये –
अविपत्तिकर चूर्ण, कमदुधा रस,
शंख भस्म,प्रवाळ पिष्टी,
आमलकी चूर्ण इत्यादी महत्त्वाच्या औषधी आहेत.
ही औषधे पित्तशामक असून पचनक्रिया सुधारण्यास मदत करतात. मात्र ही औषधे वैद्यकीय सल्ल्यानेच घ्यावीत.
● अम्लपित्ताच्या मुळ कारणावर उपचार करण्यासाठी आयुर्वेदातील पंचकर्म उपचार अत्यंत उपयुक्त ठरतात.
वमन कर्म – शरीरातील वाढलेला पित्तदोष बाहेर काढण्यासाठ अतिशय उपयुक्त चिकित्सा आहे.
विरेचन कर्म – पित्तदोष शुद्ध करण्यासाठी अत्यंत प्रभावी पंचकर्म चिकित्सा.
शिरोधारा – मानसिक ताण कमी करण्यासाठी अतिशय उपयोगी चिकित्सा आहे.
हे उपचार तज्ञ आयुर्वेदिक वैद्यांच्या मार्गदर्शनाखाली केल्यास उत्तम व कायमस्वरूपी परिणाम मिळतात.
अम्लपित्त हा आजच्या काळात अत्यंत सामान्य पण दुर्लक्षित केला जाणारा विकार आहे. योग्य आहार-विहार, ताणतणाव नियंत्रण आणि आयुर्वेदिक उपचार यांच्या मदतीने हा आजार सहज नियंत्रणात ठेवता येतो. आयुर्वेदाचा मूलमंत्र म्हणजे “निदानपरिवर्जन” म्हणजेच आजाराची कारणे टाळणे. जर आपण नियमित जीवनशैली, संतुलित आहार आणि आयुर्वेदिक पद्धती अवलंबल्या तर अम्लपित्तासारख्या विकारांपासून सहज बचाव करता येऊ शकतो.
●
लेखक –
डाॅ पंकज कावरे
आयुर्वेद, पंचकर्म तज्ञ
अमरावती.
7066652551





