अमरावती – आदर्श नगर, राजेंद्र नगर तसेच सिपना कॉलेज रोड परिसरातील नाली व नालीवरील रस्त्यांच्या गंभीर समस्येबाबत नवजागरण मनिषी व क्रांतिकारी स्मरण समिती, अमरावती यांच्या वतीने मनपा आयुक्तांकडे लेखी तक्रार अर्ज सादर करण्यात आला आहे. परिसरातील नाल्यांची अयोग्य व्यवस्था आणि नालीवरील रस्त्यांची खराब अवस्था यामुळे स्थानिक नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
परिसरातील मुख्य रस्त्यालगत मोठी नाली असून संपूर्ण परिसरातील सांडपाणी या नाल्यात येऊन मिळते. मात्र रस्ते बांधकाम करताना नाल्यांवरील जुने रपटे न काढता त्यावरच दुसरे रपटे टाकण्यात आल्याने ‘डबल रपटे’ तयार झाले आहेत. त्यामुळे नाल्यातील पाण्याचा प्रवाह अडथळला जात असून पाणी साचून मुख्य रस्त्यावर येते. अनेक वेळा हे घाण पाणी नागरिकांच्या घरांमध्ये शिरत असल्याने नागरिकांना गंभीर अडचणींचा सामना करावा लागत आहे. यामुळे नाल्यांमधील साप, किडे तसेच घाण रस्त्यावर येण्याच्या घटना वाढल्या असून यापूर्वी सर्पदंशामुळे एका स्थानिक नागरिकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडल्याचेही नागरिकांनी सांगितले.

तसेच मुख्य नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर गाळ साचलेला असून पावसाळ्याच्या काळात नाल्यांमधील पाणी रस्त्यावरून वाहत नागरिकांच्या घरांमध्ये घुसते. त्यामुळे परिसरात दुर्गंधी, अस्वच्छता आणि डासांची वाढ होत असून नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. नाल्यांचे पाणी रस्त्यावर वाहत असल्याने नागरिकांना ये-जा करतानाही मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
या पार्श्वभूमीवर परिसरातील नागरिकांनी एकत्र येत नवजागरण मनिषी व क्रांतिकारी स्मरण समितीच्या माध्यमातून मनपा प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. तक्रार अर्जामध्ये नाल्यांची तातडीने साफसफाई करणे, पाण्याचा निचरा सुरळीत करण्यासाठी आवश्यक दुरुस्ती करणे तसेच नालीवरील खराब रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली आहे. नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित या गंभीर समस्येकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन योग्य ती कार्यवाही करावी, अन्यथा परिसरातील नागरिकांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

यावेळी गणेश मुंधरे, सतीश ढोरे, रुपेश वानखडे, धनंजय देशमुख, निलू दास, गुंजन दास, राहुल खोडके, कांडलकर काका, किशोर पेंढारकर तसेच नवजागरण मनिषी व क्रांतिकारी स्मरण समिती, अमरावतीचे पदाधिकारी, सदस्य आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते.





