बालविवाहानंतर परिवाराच्या शारीरिक व मानसिक छळामुळे अल्पवयीन मुलीची आत्महत्या; ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

SHARE:

सोलापूर – जिल्ह्यात बालविवाहानंतर अल्पवयीन मुलीने आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. तर या प्रकरणात ५  जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलीचा बालविवाह करण्यात आला होता. सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातून ही धक्कादायक घटना समोर आली आहे. देशात बालविवाहाला कायद्याने बंदी आहे. तरीही सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढ्यातील एका गावात अल्पवयीन मुलीचा बालविवाह केला होता.

मात्र, अल्पवयीन मुलीचा बालविवाह झालाच कसा? या प्रकरणात पोलिसांनी चौकशी करुन कडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. मंगळवेढा तालुक्यातील बावची-निंबोणी परिसरात अल्पवयीन मुलीचा बालविवाह झाला होता. यानंतर ४  महिन्यातच अल्पवयीन नवविवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ करण्यात आला आहे. यातून अल्पवयीन नवविवाहितेने रोजच्या मानसिक व शारीरिक त्रासाला कंटाळुन आत्महत्या केली आहे.

याबाबत आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी ५  जणांविरुद्ध मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर यामध्ये अल्पवयीन मुलीच्या पती व सासऱ्यास पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना न्यायालयाकडून पोलीस कोठडी ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याबाबत मंगळवेढा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे व त्यांचे पोलिस पथक तपास करत आहे.

मात्र ४  महिन्यापूर्वी या बालविवाहास कोण कोण जबाबदार होते? या सर्वांवर कडक कारवाई केली तर असे धक्कादायक प्रकार पुन्हा घडणार नाहीत, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात आली आहे. या घटनेवर मंगळवेढा परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. या प्रकरणात अधिक तपास मंगळवेढा ग्रामीण पोलिस करत आहेत.

Leave a Comment

अधिक वाचा