राजस्थान – देशभरात अनु.जातींवरील अत्याचार आणि छळ थांबून राहिलेला नाही. सामान्य लोक नाही तर आता उच्च शिक्षित लोकांना देखील जातीय भेदभावाचा सामना करावा लागत आहे. जातीय भेदभाव आणि छळामुळे राजस्थानात एका डॉक्टरने आत्महत्या केल्याची घटना ताजी असताना आता केरळमधून अशीच एक घटना समोर आली आहे. केरळमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणार्या एका २२ वर्षीय अनु.जातीच्या विद्यार्थ्याने आपलं जीवन संपवलं. महाविद्यालयातील शिक्षकांनी त्याच्या जातीवरून, रंगावरून छळ केल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे. निथिन राज आरएल असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून तो कन्नूरच्या अंजाराकंडी येथील महाविद्यालयात बीडीएसच्या पहिल्या वर्षाचा विद्यार्थी होता.
तिरुवनंतपुरममधील उझामलक्कल गावचा रहिवासी असलेला निथिन राज आरएल, शुक्रवारी कन्नूर डेंटल कॉलेजच्या कॅम्पसमधील एका इमारतीवरून पडून मरण पावला. त्याला तातडीने मेडिकल कॉलेजच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, जिथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. निथिनच्या मृत्यूमध्ये घातपाताचा प्रकार असावा, असा संशय कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, नितीनच्या छळाचा आरोप समोर आल्यानंतर महाविद्यालय व्यवस्थापनाने एका विभागप्रमुखाला आणि एका सहयोगी प्राध्यापकाला निलंबित केले असून, आरोपांची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. रविवारी नितीनची एक ऑडिओ क्लिप समोर आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे, ज्यामध्ये त्याला शिक्षकांकडून अपमान आणि छळाचा सामना करावा लागल्याचा आरोप आहे.
त्यामध्ये नितीन असे म्हणताना ऐकू येतो की, एका शिक्षकाने माझा उघडपणे अपमान केला आणि मला त्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागला. माझ्या उत्तरपत्रिकांमधील काही स्पेलिंगच्या चुका दाखवून त्या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांमध्ये वाटण्यात आल्या. काल, मी त्याच्या वर्गात असताना, त्याने माझ्या आईची खिल्ली उडवली… स्टाफ रूममधून बाहेर आल्यावर शिक्षकाने मला मूर्ख म्हटले. स्टाफ रूम हे असे ठिकाण आहे जिथे आमच्यावर सामूहिक हल्ले होतात. शिक्षकाने मला धमकी दिली की जर मी काही बोललो तर माझे हातपाय तोडले जातील.
नितीनची बहीण, निकिता म्हणाली की तिच्या भावाला त्याच्या रंगावरून, जातीवरून आणि आई-वडिलांच्या व्यवसायावरून वारंवार अपमानाला सामोरे जावे लागत होते. त्याने मला सांगितले होते की, विभागप्रमुख त्याला ‘वेडा कुत्रा’ म्हणून हिणवत असत. वर्गातही त्याचा अपमान केला जात असे. जेव्हा वर्गात नितीनचा अपमान होत असे, तेव्हा विभागप्रमुख इतर विद्यार्थ्यांना हसवत असत. यापूर्वी इतर विद्यार्थ्यांनीही विभागप्रमुखांविरुद्ध तक्रार केली होती, पण त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही.
निकीता पुढे म्हणाली कि इमारतीवरून पडण्याच्या दोन तास आधी नितीन आमच्याशी बोलला होता. आम्हाला काहीतरी घातपाताचा संशय आहे आणि त्याला नक्की काय झाले हे आम्हाला जाणून घ्यायचे आहे. तो कॉलेजच्या इमारतीवरून नाही, तर त्याच कॅम्पसमधील मेडिकल कॉलेजच्या इमारतीवरून पडला होता, असे ती म्हणाली.
कन्नूर पोलिसांनी सुरुवातीला अनैसर्गिक मृत्यूचा गुन्हा दाखल केला होता. मात्र, रविवारी त्यांनी या प्रकरणात बीएनएसच्या कलम १०८ अंतर्गत आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचे आरोप जोडले. एससी/एसटी (अत्याचार प्रतिबंध) कायद्यातील तरतुदीही लागू करण्यात आल्या. या प्रकरणी दोन प्राध्यापकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी सहायक पोलीस आयुक्त हरिप्रसाद यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले आहे.
नितीनच्या मृत्यूमुळे राज्यात व्यापक आंदोलने सुरू झाली आहेत. राज्य मानवाधिकार आयोगाने या घटनेसंदर्भात कन्नूर शहर पोलीस आयुक्तांकडून अहवाल मागवला आहे.





