जालियनवाला बाग हत्याकांड स्मृतीदिनानिमित्त श्रद्धांजली कार्यक्रम; परिसरातील नागरिक, युवक व सामाजिक कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून व विचार व्यक्त करून श्रद्धांजली अर्पण केली

SHARE:

अमरावती – भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील काळा दिवस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जालियनवाला बाग हत्याकांड स्मृतीदिनानिमित्त नवजागरण मनीषी व क्रांतिकारी स्मरण समिती, अमरावती यांच्या वतीने छत्री तलाव परिसर, दत्तूर नगर येथे भावपूर्ण श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

सकाळी ७ वाजता पार पडलेल्या या कार्यक्रमात नागरिक, युवक व सामाजिक कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून शहीदांना विनम्र अभिवादन केले. कार्यक्रमाची सुरुवात शहीद स्मारकास पुष्पहार अर्पण करून क्रांतिकारी गीताने करण्यात आली. यानंतर शहीदांच्या स्मृतीप्रित्यर्थ पुष्पचक्र अर्पण करण्यात आले.
यावेळी वक्त्यांनी भगत सिंह व उधम सिंह यांच्या कार्याचा विशेष उल्लेख केला. १३ एप्रिल १९१९ रोजी अमृतसर येथील जालियनवाला बागेत हजारो निरपराध नागरिक एकत्र आले असताना ब्रिटिश अधिकारी रेजिनाल्ड डायर यांच्या आदेशावरून अंधाधुंद गोळीबार करण्यात आला. या भीषण घटनेत शेकडो नागरिक ठार झाले तर हजारो जखमी झाले. या घटनेने भारतीय स्वातंत्र्य चळवळीला निर्णायक वळण मिळाले, असे वक्त्यांनी नमूद केले.

वक्त्यांनी पुढे सांगितले की, या हत्याकांडाचा प्रभाव देशातील अनेक तरुण क्रांतिकारकांवर झाला. अन्याय, असमानता व शोषणाविरुद्ध एकजुटीने आवाज उठवण्याची गरज आजही तितकीच महत्त्वाची आहे. शहीदांच्या विचारांवर चालत समाजात समता, बंधुता व न्याय प्रस्थापित करण्याचा संकल्प उपस्थितांनी व्यक्त केला.
कार्यक्रमादरम्यान जालियनवाला बाग हत्याकांडावर आधारित माहितीपर पॉम्प्लेटचे वितरण करण्यात आले.

कार्यक्रमाचा समारोप “इन्कलाब जिंदाबाद” व “जालियनवाला बाग हत्याकांड के शहीद अमर रहे” या घोषणांनी उत्स्फूर्त वातावरणात करण्यात आला. या कार्यक्रमास नवजागरण मनीषी व क्रांतिकारी स्मरण समितीचे अध्यक्ष मा. गणेश मुंधरे, सचिव मा. सतीश ढोरे, सदस्य मा. किशोर पेंढारकर, मा. रुपेश वानखडे, मा. प्रियंका मुंधरे, मा. दीपाली ढेवले, मा. राहुल खोडके, मा. रुपाली खोडके, मा. नीलू दास, मा. गुंजन दास तसेच कांचन गजबिये, रायकर गुरुजी, सुनीता पंडित, वंदना राऊत, अर्चना सवई, दीपक पंडित, राखी पालिवार, चंदा माहुरकर, बाम्बल साहेब, अरुण बोरकर, मुकुंद गोटे, धनराज रामटेके यांसह अनेक नागरिक उपस्थित होते.

Leave a Comment

अधिक वाचा