अमरावती : राष्ट्रीय कृषी विकास योजना (प्रति थेंब अधिक पीक) अंतर्गत जिल्ह्यातील अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी ठिबक व तुषार सिंचन संच खरेदी करण्यासाठी शासनामार्फत संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. विविध शासकीय योजनांच्या समन्वयातून या प्रवर्गातील शेतकऱ्यांना आता तब्बल शंभर टक्के अनुदान मिळणार आहे. या योजनेचा मुख्य उद्देश पाणीबचत करून पिकांची उत्पादकता वाढवणे आणि वंचित घटकांतील शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे हा आहे.
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना 55 टक्के, तर इतर शेतकऱ्यांना 45 टक्के अनुदान दिले जाते. यामध्ये आणखी भर घालत मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेतून अल्प व अत्यल्प भूधारकांना 25 टक्के आणि इतर शेतकऱ्यांना 30 टक्के पूरक अनुदान मिळते. याशिवाय, उर्वरित रक्कम जिल्हा परिषदेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन मिशन आणि बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेच्या माध्यमातून (अल्प व अत्यल्प भूधारकांसाठी 10 टक्के आणि इतरांसाठी 15 टक्के) पूरक अनुदान असे एकूण 90 टक्के म्हणून दिली जाते. यामुळे शेतकऱ्यांवर कोणताही आर्थिक भार पडणार नसून त्यांना एकूण 100 टक्के अनुदान प्राप्त होईल.
या शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांकडे स्वतःच्या मालकी हक्काचा चालू 7/12 उतारा, 8-अ उतारा असणे तसेच शेतात ओलीताची (पाण्याची) शाश्वत सोय असणे बंधनकारक आहे. पात्र व गरजू शेतकऱ्यांनी शासनाच्या अधिकृत महाडीबीटी पोर्टलवर (mahadbt.maharashtra.gov.in) जाऊन ऑनलाईन पद्धतीने त्वरित अर्ज सादर करावेत. अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेऊन आपले शेती उत्पादन वाढवावे, असे आवाहन अमरावतीच्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अर्चना निस्ताने यांनी केले आहे.
(स्रोत – जिल्हा माहिती कार्यालय, अमरावती.)
Author: आकाश रमेशराव दानखडे
लेखक अमरावती जिल्ह्याचे प्रतिनिधी असून सामाजिक व राजकीय क्षेत्रात त्यांचे चांगले वलंय आहे. मागील ८ वर्षांपासून ते सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत.





