‘मिशन लक्षवेध’ अंतर्गत आर्चरी व बॅडमिंटन खेळाडूंसाठी सुवर्णसंधी; 21 व 22 जुलै रोजी निवड चाचणी

SHARE:

अमरावती : ऑलिम्पिक स्तरावर महाराष्ट्राचे नाव क्रीडा क्षेत्रात उज्ज्वल करण्यासाठी राज्य शासनामार्फत ‘मिशन लक्षवेध’ ही महत्त्वाकांक्षी योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत अमरावती जिल्ह्यात ‘जिल्हा क्रीडा प्रतिभा विकास केंद्र’ सुरू करण्यात येत असून, आर्चरी (तिरंदाजी) आणि बॅडमिंटन या दोन खेळांसाठी प्रत्येकी 20 गुणवंत खेळाडूंची निवड केली जाणार आहे. या विशेष अनिवासी प्रशिक्षणासाठी पात्र खेळाडूंची निवड चाचणी 21 आणि 22 जुलै 2026 रोजी अमरावतीत आयोजित करण्यात आली आहे.

या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे निवड झालेल्या खेळाडूंचा पूरक आहार, गणवेश, क्रीडा साहित्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांचा प्रवास खर्च, प्रशिक्षक आणि वैद्यकीय विम्यासह सर्व खर्च शासनामार्फत केला जाईल. या चाचणीत सहभागी होण्यासाठी खेळाडूचे वय 21 वर्षांखालील असावे आणि त्याने शालेय किंवा अधिकृत संघटनेच्या क्रीडा स्पर्धांमध्ये किमान राज्य स्तरावर सहभाग किंवा पदक मिळवलेले असावे. इच्छुक खेळाडूंनी आपले अर्ज जन्म दाखला, रहिवासी प्रमाणपत्र, आधार कार्ड आणि क्रीडा कामगिरीच्या प्रमाणपत्रांसह 20 जुलै 2026 पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अमरावती येथे प्रत्यक्ष सादर करणे आवश्यक आहे.

निवड चाचणी 21 व 22 जुलै रोजी सकाळी 9 वाजता सुरू होईल. यामध्ये आर्चरीची चाचणी जिल्हा क्रीडा संकुल, मार्डी रोड (तपोवन गेटजवळ) येथे, तर बॅडमिंटनची चाचणी विभागीय क्रीडा संकुल, मोर्शी रोड येथे घेतली जाईल. ही निवड प्रक्रिया क्रीडा कार्यकारी अधिकारी श्रीमती ममता कोळमकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र खेळाडूंनी या सुवर्णसंधीचा लाभ घेऊन चाचणीला उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी केले आहे.

(स्रोत – जिल्हा माहिती कार्यालय, अमरावती.)

आकाश रमेशराव दानखडे
Author: आकाश रमेशराव दानखडे

लेखक अमरावती जिल्ह्याचे प्रतिनिधी असून सामाजिक व राजकीय क्षेत्रात त्यांचे चांगले वलंय आहे. मागील ८ वर्षांपासून ते सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत.

Leave a Comment

अधिक वाचा